गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 डिसेंबर 2020

‘कोविड’ महामारीच्या सावटाखाली आज जिल्हा पंचायत निवडणुकीतील मतदानाला सकाळी ८ वाजल्यापासून रूवात झाली आहे. मतदारांनी मतदानासाठी यावे, यासाठी त्यांना मतदानाची उद्याही आठवण करून देण्याची व्यवस्था अनेक उमेदवारांनी केली आहे.

पणजी  : ‘कोविड’ महामारीच्या सावटाखाली आज जिल्हा पंचायत निवडणुकीतील मतदानाला सकाळी ८ वाजल्यापासून रूवात झाली आहे. मतदारांनी मतदानासाठी यावे, यासाठी त्यांना मतदानाची उद्याही आठवण करून देण्याची व्यवस्था अनेक उमेदवारांनी केली आहे. ‘कोविड’ महामारीच्या काळात राज्यात होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
 

 

विशेष सावधगिरी

मतदान केंद्राबाहेर दोन मीटरवर वर्तुळे काढण्यात आली आहेत. त्या वर्तुळातच मतदारांना उभे राहावे लागणार आहे. मतदान केंद्रातील कर्मचारी हातमोजे घालून वावरणार असून पुरेसे शाररिक अंतर पाळून मतदान केल्यानंतरची शाई बोटाला लावण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर आज कर्मचारी पोहोचले असून उद्या सकाळी ८ वाजता मतदान सुरू होण्याआधी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समोर मतदानाचे प्रात्यक्षिक सात ते साडेसात यावेळेत केले जाणार आहे. अधिकृतपणे प्रचारावर बंदी असली, तरी आज दिवसभर अनेक नेत्यांनी दौरे सुरूच ठेवले होते. कुठल्या तरी वाड्यावर, कुणाच्या तरी घरी शेजाऱ्यांना बोलावून कोणाला मतदान करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात येत होते. जाहीर प्रचार होत नसला तरी आजच्या दिवसभरात राज्यभरात अशा बैठकांचे पेव फुटले होते.

शिक्का हाताळणीनंतर निर्जंतूक करणार

मतदान हे मतपत्रिकेवर शिक्का मारून केले जाणार आहे. एकदा मतदाराने शिक्क्याची हाताळणी केल्यानंतर तो शिक्का निर्जंतूक केला जाणार का? अशी विचारणा आज मतदार करत होते. एका मतदान केंद्रावर सरासरी आठशे मतदार असल्याने एका मतदाराला दोन मिनिटांचा कालावधी मतदानासाठी लागल्यास १६०० मिनिटे लागणार आहेत. याचा अर्थ २६ तास लागतील. सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत ४८० मिनिटे मतदानासाठी मिळणार आहेत. त्यामुळे मतदानाचा वेग वाढवण्यासाठी एक मतदार जास्तीत जास्त मिनिटभरात मतदान करून मतदान केंद्राबाहेर पडेल, अशी व्यवस्था करण्यात कर्मचाऱ्यांची कसोटी लागणार आहे.

 

कोविडबाधितांसाठी..

कोविडची लागण होऊन इस्पितळात वा गृह अलगीकरणात असलेल्यांना मतदान करायचे असल्यास त्यांना दुपारी ४ ते सायंकाळी ५ यावेळेत करता येणार आहे. त्‍यासाठी स्थानिक मतदार अधिकाऱ्याकडे कोविड लागण झालेल्या व्यक्तींची नावे व पत्ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या अधिकाऱ्यांनी अशा मतदारांशी संवाद साधून ते मतदानासाठी येण्यास इच्छूक आहेत की नाही, हे जाणून घेतले आहे. इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाकडून पीपीई कीट पुरवले जाणार आहे. ते परिधान करूनच त्यांना मतदान केंद्रावर यावे लागेल. साधारणतः सातशे जण या पद्धतीने राज्यभरात मतदान करतील अशी सरकारी यंत्रणेची अपेक्षा आहे.

निवडणुकीवेळी चोख पोलिस बंदोबस्त 

राज्यात उद्या १२ डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी चोख पोलिस बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर आज संध्याकाळपासूनच ठेवण्यात आला आहे. सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जिल्हा व आयआरबी पोलिस केंद्रावर तैनात केले आहेत.
(सविस्तर वृत्त पान ४ वर)

 

 

मतदारांसाठी...
मतदान केंद्रात जाणाऱ्या मतदाराने मुखावरण वापरणे बंधनकारक आहे. अन्यथा मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नाही. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मतदाराच्या शरीराचे तापमान थर्मन गनने तपासले जाणार आहे. ते मर्यादेत असल्यास त्या मतदाराला मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. शरीराच्या तापमानाने मर्यादा ओलांडल्यास तेथील मंडपातच मतदाराला सावलीत १० मिनिटे बसवले जाणार आहे. त्यानंतर पुन्हा शरीराचे तापमान नोंदवले जाणार आहे. ते मर्यादेत असल्यास मतदान करण्यास जाऊ दिले जाईल किंवा दुपारी चार नंतर मतदानास येण्याचा सल्ला दिला जाणार आहे

संबंधित बातम्या