व्हीपीके’च्या ठेवीदारांनी घेतला धसका 

vpk
vpk

पणजी

गेल्या दोन दशकाहून अधिक काळ व्हीपीके अर्बन सहकारी पतसंस्थेचा व्यवहार सुरळीत आहे असे वाटत असतानाच सहकार निबंधकांनी त्यांच्यावर निर्बंध घातल्यापासून ठेवीदारांनी धसका घेऊन ठेवीचे पैसे काढण्यासाठी रांगा लावत आहेत. गेल्या तीन दिवसांत या पतसंस्थेच्या ठेवीधारकांना सुमारे ५ कोटींचे वितरण करण्याची नामुष्की आली आहे. पतसंस्थेला त्यांची बाजू मांडण्यासाठी सहकार निबंधकांनी उद्या १६ जून रोजी सुनावणी ठेवली आहे. 
गोवा राज्य सहकारी बँकेपाठोपाठ सहकार क्षेत्रात व्हीपीके अर्बन सहकारी पतसंस्थेने राज्यात ४० शाखा उघडून व्यवहारात वाढ केली होती. गेल्या दोन दशकाच्या काळात लोकांचा विश्‍वासही संपादन केला होता. त्यामुळे या पतसंस्थेकडे सुमारे ८०० कोटीहून अधिक ठेवी जमा झाल्या होत्या. त्यामुळे या पतसंस्थेचा व्यवहार एखाद्या बँकेप्रमाणे सुरू होता व सुमारे ५५० कोटींची कर्जेही दिली आहेत. मात्र, या पतसंस्थेने काही कर्जे कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून दिल्याने ती अडचणीत आली आहे. सहकार निबंधकांनी या पतसंस्थेच्या खातेधारकाला किंवा ठेवीदाराला एका महिन्याला फक्त २० हजार रुपये वितरित करण्यास निर्बंध घातले आहेत व त्याची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून लोकांनी या पंतसस्थेच्या कार्यालयाबाहेर पैसे काढण्यासाठी रांगा लावत आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे दोन कोटींहून अधिक रक्कम खातेधारक व ठेवीदारांनी काढली. सहकार निबंधकांच्या आदेशानुसार प्रत्येकाला फक्त २० हजार रुपयेच देण्यात आले. 
मडगाव व म्हापसा अर्बन सहकारी बँकांचे उदाहरण लोकांसमोर असल्याने या पतसंस्थेचा कोणीही खातेधारक वा ठेवीधारक हा धोका पत्करण्यास तयार नाही. या ठेवीदारांना पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे ठेवीदार ऐकण्यास तयार नसल्याने त्यांच्यावर सक्तीही करता येत नाही. या निर्बंधामुळे खातेधारक व ठेवीदारांना फक्त २० हजार रुपये काढणे शक्य असल्याने त्यांना त्यांचे पैसे सर्व मिळेपर्यंत ही पतसंस्था डबघाईस येईल अशी शंका वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांना समजावण्याच्या पलिकडे आहे. पतसंस्थेत पैसे काढण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे व्यवस्थापनाची बरीच तारांबळ उडाली आहे. या पतसंस्थेने इतर बँकांमध्ये ठेवीच्या रक्कमा ठेवल्या आहेत त्यावर कर्ज काढून खातेधारकांना व ठेवीदारांना रक्कम देण्याची पाळी आली आहे. त्यामुळे ही परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास पतसंस्थेची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती पतसंस्थेतील सूत्राने दिली. 


कथित गैरव्यवस्थापन व गैरव्यवहारप्रकरणी सहकार निबंधकांनी व्हीपीके अर्बन सहकारी पतसंस्थेवर अनेक निर्बंध घातले आहेत. हा निर्बंध घालणारा आदेश अंतरिम आहे. पतसंस्थेला त्यांची बाजू मांडण्यासाठी उद्या १६ जूनला दुपारी ३.३० वा. निबंधकांनी सुनावणी ठेवली आहे. पतसंस्थेतर्फे आदेशात नमूद करण्यात आलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जाईल. या निर्बंधामध्ये शिथिलता वा त्यावर शिक्कामोर्तब या दोन्हीपैकी एक निर्णय होऊ शकतो.  

 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com