गोव्यात गिधाडांवर संक्रांत

अंकिता गोसावी
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

गोव्यात एकेकाळी गिधाडांचा वावर खूप दिसायचा. ही गिधाडे उसगाव येथील मांस प्रकल्पाच्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात दिसायची आणि गोव्यात येणारे पक्षीप्रेमी पर्यटक त्यांना पाहण्यासाठी तिथे हजेरीही लावायचे. त्याशिवाय जेथे खास करून खाटिकांचा व्यवसाय चालतो तेथे वा एखादे जनावर मृत होऊन पडले असते तिथेही गिधाडे फिरताना दिसायची.

पणजी - गोव्यात एकेकाळी गिधाडांचा वावर खूप दिसायचा. ही गिधाडे उसगाव येथील मांस प्रकल्पाच्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात दिसायची आणि गोव्यात येणारे पक्षीप्रेमी पर्यटक त्यांना पाहण्यासाठी तिथे हजेरीही लावायचे. त्याशिवाय जेथे खास करून खाटिकांचा व्यवसाय चालतो तेथे वा एखादे जनावर मृत होऊन पडले असते तिथेही गिधाडे फिरताना दिसायची. मात्र आता त्यांची संख्या मागील तीस वर्षांत झपाट्याने कमी झालेली असून याला कारणीभूत असलेल्या विविध घटकांमध्ये जनावरांना देण्यात येणारी औषधे हे एक कारण असल्याचे दिसून आले आहे.

या परिस्थितीची जाणीव सरकारलाही झाली असून‌ गिधाडांच्या संवर्धनासाठी प्राथमिक पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन संचालनालयाने अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) गोव्यातील पाळीव जनावरांवरील उपचारांच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या काही औषधांवर बंदी घालण्याचा विचार करावा, अशी विनंती केली आहे. यात केटोप्रोफेन व एसेक्लोफेनाक या औषधांचा समावेश आहे.

ही दोन्ही औषधे बिगरस्टेरॉइड आणि सूज कमी करणारी असून पशुवैद्यकांकडून प्राण्यांच्या वेदना आणि जखमांवर तसेच काही आजार ठीक करण्यासाठी पाळीव गुरे, बकऱ्या आणि इतर काही प्राण्यांवर त्यांचा वापर केला जातो, पण ही औषधे गिधाडे आणि अन्य काही पक्ष्यांसाठी बाधक व बरीच विषारी ठरतात असे दिसून आले आहे. दक्षिण आशियातील गिधाडांसह तीन प्रजातींच्या घटत्या संख्येस ही बाब कारणीभूत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. भारतामध्येही गिधाडांच्या संख्येत तीव्र घट झालेली असून अनेक संशोधकांनी ही गोष्ट नजरेस आणून दिलेली  आहे.

गोव्यातही बऱ्यापैकी गिधाडे दिसून यायची आणि त्यात इजिप्शियन गिधाडांचा समावेश असायचा. उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पाच्या ठिकाणी तर ही गिधाडे हमखास दिसून यायची. प्राण्यांची कत्तल केल्यानंतर जनावरांचे जे टाकाऊ भाग प्रकल्पाच्या बाहेर टाकून दिले जायचे त्यावर त्यांची गुजराण व्हायची. हा प्रकार आता बंद झालेला आहे आणि आता या ठिकाणीच नव्हे,  तर अन्य भागांमध्ये देखील फारच कमी गिधाडे दिसून येतात आणि याची चुटपूट पक्षीप्रेमींना लागून राहिलेली आहे.

वन्यप्राण्यांच्या बाबतीत संशोधन करणाऱ्या राजस्थान येथील एका ज्येष्ठ संशोधकाने जनावरांवर वापरल्या जाणाऱ्या बिगरस्टेराईड आणि सूज कमी करणाऱ्या वरील प्रकारच्या औषधांच्या विरोधात याचिका गुदरलेली असून त्याच्या अनुषंगाने केंद्रीय पशुसंवर्धन खात्याने राज्याच्या पशुसंवर्धन खात्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन खात्याने पुढील आवश्यक कृतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला एक पत्र पाठविले आहे, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली.

तज्ज्ञांच्या मते वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वापरले जाणारे डायक्लोफेनाक हे औषध दाखल झाल्यानंतर गिधाडांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला. सदर औषधाचा गुरांवर विषप्रयोग करण्यासाठी होणारा उपयोग आणि गुरांचे मृत अवशेष खाणाऱ्या मोठ्या पक्ष्यांवर त्यामुळे होणारा परिणाम हे लक्षात घेऊन भारताने २००६ सालात डायक्लोफेनाकवर बंदी घातली. त्याचप्रमाणे तमिळनाडूने केटोप्रोफेन या औषधावर पाच वर्षांपूर्वी तीन जिल्ह्यांमध्ये बंदी घातलेली आहे.

गोव्यातील वातावरण चांगले असून त्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्रातून गिधाडे व इतर पक्षी येथे दाखल होतात. गोव्यात शासकीय पातळीवर जे वरील पाऊल उचलण्यात आलेले आहे त्याचे पक्षीप्रेमी व या क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे. अन्य राज्यांनीही असेच पाऊल उचलल्यास केंद्र सरकारवर दबाव येऊन गिधाडांच्या संवर्धनालाच्या बाबतीत त्याची मोलाची मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

भारतात आढळतात गिधाडांच्या ९ जाती
जगात गिधाडाच्या जवळजवळ २३ जाती आढळतात आणि त्यापैकी ९ भारतामध्ये सापडतात. गिधाडांचे संवर्धन करण्याची गरज केंद्रालाही पटलेली असून त्याकरिता एक योजना आखण्यात आलेली आहे. २०२० ते २५ अशा कालावधीसाठीच्या या योजनेच्या अंतर्गत २०७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याअंतर्गत अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या तीन गिधाडांच्या जातींचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आलेले आहे. त्यात ओरियंटल या पांढऱ्या रंगाच्या पाठीच्या तसेच बारीक चोचीच्या व लांब चोचीच्या गिधाडांचा समावेश होतो.

गोव्यात गिधाडे झाली दुर्मिळ
अलीकडच्या काळात गिधाडे गोव्यात आणि पश्चिम भारताच्या उर्वरित किनारपट्टी भागातही फारशी आढळत नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात फारच कमी गिधाडे दिसून आलेली आहेत. एरव्ही पश्चिम घाटात आणि खास करून म्हादई खोऱ्यात गिधाडे आढळून यायची, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ पक्षीप्रेमी सांगतात. गिधाडांचे खाद्य सहसा मृत जनावरे वा जनावरांचे टाकण्यात आलेले टाकावू मांस, अवशेष हे असते, पण अलीकडच्या काळात टाकाऊ मांस उघड्यावर टाकणे बंद झालेले आहे. तसेच गिधाडांची भूक शमवण्यासाठी त्यांना भलेमोठे मृत जनावर लागत असते. पश्चिम घाटात आता हत्ती व इतर मोठी जनावरे कमी झालेली असून तेही घटत्या संख्येस कारणीभूत ठरलेले आहे.

  • गिधाडांच्या घटत्या संख्येची दखल घेऊन राज्य सरकारकडूनही पावले उचलण्यास प्रारंभ
  • काही औषधांचा वापर रोखण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन खात्याकडून एफडीएला पत्र
  • केटोप्रोफेन व एसेक्लोफेनाक या औषधांचा

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या