फर्मागुढी किल्ल्याची भिंत ढासळली

Dainik Gomantak
मंगळवार, 16 जून 2020

किल्ल्याच्या भिंती व बुरुज ढासळल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, पाऊस सुरू झाला की पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार होत असून किल्ल्याचा कुठला भाग कोसळेल हे सांगता यायचे नाही.

फोंडा,

फर्मागुढी येथील शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा काही भाग दोन दिवसांपूर्वी ढासळला असून एका भिंतीला मोठा तडा गेल्याने किल्ल्याला धोका निर्माण झाला आहे.
फर्मागुढीच्या या शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा असलेल्या किल्ल्याचे काही बुरुज व भिंती कोसळण्याचे प्रकार अलीकडच्या काळात घडू लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी या किल्ल्याची एक मोठी भिंत ऑगस्ट महिन्यात भर पावसात कोसळली होती. आता नुकताच पाऊस सुरू झाल्याने किल्ल्याच्या मागच्या बाजूच्या भिंतीचा काही भाग कोसळला असून त्यामुळे हा धोका निर्माण झाला आहे.
किल्ल्याच्या भिंती व बुरुज ढासळल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, पाऊस सुरू झाला की पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार होत असून किल्ल्याचा कुठला भाग कोसळेल हे सांगता यायचे नाही.
दरम्यान, गेल्या वर्षी या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्याबाबत माहिती देण्यात आली होती. सुमारे ३८ कोटी रुपयांचा खर्च करून हा किल्ला पर्यटनदृष्ट्या नूतनीकृत करण्याचा संकल्प तत्कालीन बांधकाममंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सोडला होता. त्यापूर्वी प्रियोळचे आमदार तथा कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनीही किल्ल्याच्या नूतनीकरणासंबंधी सुतोवाच केले होते, पण अजून या किल्ल्याचे नूतनीकरण झालेले नाही. नजिकच्या काळात किल्ल्याची डागडुजी केली नाही, अथवा नूतनीकरण हाती घेतले नाही, तर किल्ला कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, या किल्ल्यावर येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबरच काही पर्यटकांनाही धोका संभवत असल्याने सरकारने योग्य कार्यवाही करावी, अशीही सूचना करण्यात येत आहे.

गोवा

संबंधित बातम्या