पावसामुळे हणखणेत घराची भिंत कोसळली

प्रतिनिधी
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हणखणे येथील कृष्णा सखाराम हरीजन यांच्या घराची भिंत कोसळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.तर  उर्वरीत घर देखील कोसळून पडण्याच्या अवस्थेत आहे.

पेडणे:  गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हणखणे येथील कृष्णा सखाराम हरीजन यांच्या घराची भिंत कोसळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.तर  उर्वरीत घर देखील कोसळून पडण्याच्या अवस्थेत आहे. पंचायत सदस्य कृष्णा नाईक यांनी घराची पाहाणी केली.
इब्रामपूर-हणखणे पंचायत क्षेत्रातील हणखणे येथील कृष्णा हरीजन याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, गेल्या अनेक वर्षांपासून सरकारच्या इंदिरा आवास योजनेतर्गत मिळालेल्या मातीच्या घरात ते रहातात. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे हरीजन यांच्या घराची एक भिंत आज सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पडली. 

यावेळी घरातील माणसे घराबाहेर गेली होती. यामुळे अनर्थ टळला. छपराचा आधार मोडून पडल्याने छपराचा मुख्य आधार असलेले पाष्ट (मुख्य लाकूड) मोडून छपर अर्धवट मोडले आहे. दरम्यान, वाड्यावरील लोकांनी सहकार्य करून त्या लाकडाला दुसऱ्या एका लाकडाचा आधार दिला. त्यामुळे छपर राहाण्यासाठी तात्पुरता आधार मिळाला आहे. पावसामुळे घराची भिंत पडल्याचे समजताच इब्रामपूर-हणखणे पंचायतीचे पंच सदस्य कृष्णा नाईक यांनी घराला भेट देऊन पाहणी केली. 

कृष्णा नाईक यांचे परिस्थिती बेताचीच असून, घर कोसळल्यानंतर त्यांच्यासमोर संकट उभे राहिले आहे. एकीकडे चतुर्थी उत्सव तर दुसरीकडे कोरोनाचे दिवस असल्याने सद्यःपरिस्थितीत घर दुरुस्ती करणे कृष्णा नाईक यांना शक्य नसल्याने सरकारने  घर बांधण्यासाठी मदत करावी, अशी कृष्णा हरीजन यांची मागणी आहे.

संबंधित बातम्या