उत्तर गोव्यासाठी कोविड इस्पितळ हवे

अवित बगळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांची पत्रकार परिषदेत मागणी

पणजी

उत्तर गोव्यासाठी कोविड इस्पितळ सुरु करण्याची हीच योग्य वेळ आहे. मडगावच्या कोविड इस्पितळातील सर्व खाटा भरल्या असल्याने सरकारने याआधी जाहीर केल्याप्रमाणे उत्तर गोव्यासाठी कोविड इस्पितळ सुरू करावे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे साळगाव मतदारसंघातील आमदार जयेश साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, उत्तर गोव्यात कोविड महामारीविरोधात लढण्यासाठी सुविधा नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोविडसाठी दोन इस्पितळे सुरू केली जातील असे सांगितले होते. दक्षिण गोव्यासाठी एक आणि उत्तर गोव्यासाठी एक अशी इस्पितळे असतील अशी त्यांची संकल्पना होती. उत्तर गोव्यासाठी १ हजार खाटांचे कोविड इस्पितळ असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. सहा महिने कोविडविरोधात राज्य यंत्रणा लढत आहे. या काळात कोविडविरोधात लढण्यासाठी सरकारने तयारी केली नाही. उत्तर गोव्यासाठी कोविड इस्पितळ नसण्यातूनच सरकारची तयारी उघडी पडली आहे. कोविड उपचार केंद्रे आहेत पण खरी गरज इस्पितळाची आहे.
मडगावच्या कोविड इस्पितळात २२० खाटा आहेत आणि त्या सर्व आज भरून गेल्या आहेत. साळगाव मतदारसंघात कोविडचे ४४ रुग्ण आहेत. त्यापैकी एकाला कोविड इस्पितळात पाठवल्यावर खाटा भरल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे त्या रुग्णाला स्ट्रेचरवरच झोपवणार का, अन्य ठिकाणी त्याची व्यवस्था त्याच इमारतीत केली जाईल का असे नानाविध प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले आहेत. त्या इस्पितळात सिटी स्कॅनची सोय नाही, एमआरआयची सोय नाही. इतर रोगांवर उपचारासाठी उपकरणेही नाहीत. कोविडची लागण झालेल्या रुग्णास इतर रोग असल्यास त्याच्या उपचाराची सोय नाही अशी माहिती मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या