वीजदरवाढ रद्द न केल्यास घेराव घालू

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

 सरकारने वीज दरात वाढ केल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सरकारने वीज दरात केलेली ही अन्याय्य दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास पणजीच्या मुख्य वीज अभियंत्याच्या कार्यालयात घेराव घालणार असल्याचा इशारा गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी दिला आहे.

फोंडा :  सरकारने वीज दरात वाढ केल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सरकारने वीज दरात केलेली ही अन्याय्य दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास पणजीच्या मुख्य वीज अभियंत्याच्या कार्यालयात घेराव घालणार असल्याचा इशारा गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी शनिवारी सकाळी गोवा फॉरवर्डच्या फोंडा कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

दुर्गादास कामत यांनी सांगितले की, सरकारने एफपीपीसीए वीजदरात वाढ केल्याने वीज ग्राहकांना एक प्रकारचा शॉकच देण्यात आला आहे. आता वीज ग्राहकांना प्रत्येक युनिटमागे वीजबिलात वाढ होणार आहे. 
याचा फटका गरीब व गरजू घटकातील लोकांना बसणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या असून जगभरात बहुतांश राष्ट्रांकडून कोरोनाच्या काळात लोकाना आर्थिक सहाय्य केले जात आहे. मात्र गोव्यातील भाजपचे प्रमोद सावंत सरकार उलटेच करीत सुटले असून सरकार दुर्बल घटकातील सर्वसामान्य लोकांवर अन्याय करीत असल्याचा आरोप दुर्गादास कामत यांनी करून आधीच महागाईने त्रस्त झालेल्या लोकांना ही दरवाढ म्हणजे दिवाळीला लोकांना महागाईचा बोनस देण्यात आला आहे. या दरामुळे ग्राहकांच्या वीज बिलात युनिटमागे वाढ होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भाजपा सरकार हे अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार असल्याचे सांगत असले तरी सरकारने विविध खात्यात योजनांसाठी लागणाऱ्या अर्जांच्या दरात वाढ केली आहे. 

जनतेला दिलासा देण्याऐवजी लोकांच्या खिशातील पैसे कसे काढून घेता येईल, याकडे विद्यमान सरकार कटाक्ष ठेवत असल्याने लोक हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारने सोलर पावर प्रकल्पासाठी तरतूद केली आहे, मात्र गोव्यातील भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.मुख्यमंत्र्यानी वीज दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे, असा इशारा यावेळी देण्यात आला.

संबंधित बातम्या