म्हापसा जिल्हा इस्पितळ आवारात कचरा

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

इन्सिनेटर तुटल्यामुळे कचरा उचलणे अवघड ः अधीक्षक डॉ. पेडणेकर यांची माहिती

म्हापसा: म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाच्या एका खोलीत टाकलेल्या जैव-वैद्यकीय कचऱ्याचे मोठे ढीग हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या लोकांचे सध्या लक्ष वेधून घेत आहे. या रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी रुग्णांकडून तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. 

इतर वैद्यकीय कचऱ्यासह पीपीई किट लाल प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वापरात असलेल्या पार्किंगच्या शेजारी असलेल्या खोलीत टाकण्यात आले आहेत. या संदर्भात बोलताना स्थानिकांनी सांगितले, की तेथील एका विशेष खोलीत वैद्यकीय कचरा साठवण्याची क्षमता कमी असल्याने आता जिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्याच्या जिन्याखाली कचरा टाकण्यात आला आहे. पीपीई किटसह वैद्यकीय कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, याकडेही स्थानिकांनी लक्ष वेधले. पिशव्यांच्या आत पट्ट्या, कागदी टॉवेल, हातमोजे आणि पीपीई किट्‍स ठेवण्यात आले आहेत. यासंदर्भात बोलताना स्थानिक नागरिक शेक़र नाईक म्हणाले, की जिल्हा रुग्णालयात उघड्यावर टाकला जाणारा वैद्यकीय कचरा तातडीने हटवणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या धोकादायक वैद्यकीय कचऱ्यामुळे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहनदास पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की वैद्यकीय कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावली जाईल.  बायो मेडिकल वेस्ट इन्सिनेटर तुटल्यामुळे कचरा उचलता येत नाही; पण, एक-दोन दिवसांत कचरा उचलला जाईल, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या