
Mapusa News : म्हापसा नगरपालिकेने पाणी बिल वेळेत न भरल्याने गावसावाडा येथे राहणाऱ्या सुमारे 20-25 कुटुंबांना त्रास सहन करावा लागतोय. कारण गेल्या अनेक महिन्यांची थकबाकी पालिकेने फेडली नसल्याने सध्या विभागाने सुलभ शौचालयाचे पाणी कनेक्शन खंडित केले आहे. ही थकबाकी 2,03,501 रुपये झाली आहे.
सेंट जेरॉम चर्चसमोरील सुलभ शौचालयाचे पाणीपुरवठा बिल गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेने भरले नसल्याने ते प्रलंबित आहे. गावसावाडा येथे रहिवाशांसाठी हे सुलभ शौचालय महत्त्वाचे आहे, ज्यांना विविध कारणांमुळे वैयक्तिक शौचालयाची समस्या भेडसावत आहे.
अशावेळी सुमारे 20-25 घरे या शौचालयावर अवलंबून आहेत. जी स्वच्छ भारत अभियान आणि उघड्यावर शौचास प्रतिबंध कार्यक्रमाअंतर्गत चिन्हांकित आहे.
पाणीपुरवठा खंडित झाल्याने स्थानिक रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या शौचालयाला पाण्याचे कनेक्शन दिल्यानंतर 19 ऑगस्ट 2016 रोजी मीटर बसविले होते. तेव्हापासून स्थानिक रहिवासी या शौचालयाचा वापर पाणी कनेक्शनसह करीत आहेत.
मात्र, म्हापसा पालिकेच्या दुर्लक्षामुळे पाणी बिल वेळेवर न भरल्याने आता बिलाची थकबाकी रक्कम ही 2,03,501 रुपये झाली आहे.
राज्य सरकारने थकबाकीदारांना लाभ घेण्यासाठी आणि थकबाकी भरण्यासाठी ओटीएस योजना जारी केली आहे. तरीही म्हापसा पालिका ओटीएसचा लाभ मिळवण्यात अयशस्वी ठरली आहे.
गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा विभागाने येथील पाणी कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे या परिसरात पालिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांना त्रास
याप्रश्नी स्थानिक नगरसेवक प्रकाश भिवशेट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही समस्या गंभीर असून मुख्याधिकाऱ्यांकडे यापूर्वीच समस्या मांडली व थकबाकी भरण्याची विनंती केली होती.
परंतु, काहीही झाले नसल्याने कनेक्शन तोडण्यात आल्याने सध्या स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले.
"पाणी कनेक्शन कापल्याची पालिकेला माहिती मिळाली असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन हे थकीत बिल भरले जाईल. रक्कम मोठी असल्याने आम्ही ओटीएससाठी अर्ज करणार आहोत."
- अमितेश शिरवईकर, पालिका मुख्याधिकारी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.