एका पत्रामुळे मिळाले सडा भागातील लोकांना पाणी

एका पत्रामुळे मिळाले सडा भागातील लोकांना पाणी
water demand of Sada citizens completed over 1 letter

मुरगाव : हेडलॅन्ड-सडा येथील आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी केंद्र सरकारच्या शुद्ध पाणी विभाग आणि तक्रार निवारण विभागाला सडा भागातील पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाई विषयीचे पत्र लिहिताच अवघ्या पाच दिवसांत सडा भागात मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते दिवकर यांचे लोकांतून कौतुक करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सडा भागातील लोकांना तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाकडे तक्रार करूनही कोणीच दखल घेत नव्हते. स्थानिक आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक यांच्याकडेही लोकांनी तक्रार केल्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांना मुरगावात आणून पाण्याच्या जटील प्रश्र्नांची माहिती त्यांना दिली. नगरसेवक शशिकांत परब, मुरारी बांदेकर, लिओ मेंडीस, दामोदर कासकर, भाजपा गटाध्यक्ष संजय सातार्डेकर आणि भाजपा कार्यकर्त्यांसमवेत घेतलेल्या या बैठकीत तातडीने पाणी समस्या सोडविली जाईल, असे आश्वासन देऊन मंत्री पावसकर मुरगावमधून परतले. १५-२० दिवस झाले तरी पाणी पुरवठ्यात काही सुधारणा झाली नाही. लोक पाण्यासाठी हवालदिल झाले.

दिवसा अर्धा-पाऊण तास आणि तोही हलक्या दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला. त्यामुळे सर्वांनाच पाणी मिळणे दुरापास्त झाले. याची दखल सडा येथील आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी घेऊन ता २५ ऑक्टोबर रोजी ई-मेलद्वारे थेट केंद्र सरकारच्या जल विभाग आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाला तक्रार करून सडा येथील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे कळविले. याची दखल त्वरीत केंद्राने घेऊन संबंधित विषय हाताळण्याचे राज्याला आदेश दिले. त्यानुसार ३० रोजी वास्को सार्वजनिक खात्याच्या पाणी विभागाने सडा भागात भेट देऊन पाणी समस्याची माहिती जाणून घेऊन शनिवारी ३१ पासून सुरळीत पाणीपुरवठा केला.

मंत्री नाईक यांनीही दुर्लक्ष केल्याने केंद्राकडे तक्रार
सडा भागातील पाण्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला आहे. तो सोडविण्याचा प्रयत्न केला जात नाही. सडा भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाची पायाभरणी वेळी स्थानिक आमदार मिलिंद नाईक यांनी सडा भागात पिण्याबरोबरच पोहायलाही मुबलक पाणी उपलब्ध असेल, अशी घोषणा केली होती. पण, गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाईमुळे सड्यावरील नागरिक हैराण झाले आहेत. लोकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कसलेच प्रयत्न होत नसल्याने लोकांत नाराजी पसरली आहे. याची दखल घेऊनच आरटीआय कार्यकर्ते दिवकर यांनी केंद्र सरकारातील संबंधित खात्याला पाठवून पाण्याची समस्या सोडवली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com