तुझे आहे तुजपाशी...

सृष्टीने,निसर्गाने पाण्याचे स्रोत भरभरून दिलेले असतानाही, बाटलीबंद पाणी सेवनाकडे आपला कल वाढत आहे. असलेले जलस्रोत आपण प्लास्टिकने भरून टाकतो आणि प्लास्टिक बाटलीतील पाणी स्वच्छ व निर्जंतूक म्हणून पितो. आपण कोरफड परसदारी, गच्चीत लावत नाही; पण, आयुर्वेदिक ‘एलोव्हेरा’ बाटलीतून वापरतो. आपल्यापाशीच उत्तरे आहेत, तरीही आपले प्रश्‍न घेऊन आपण गावभर हिंडत राहतो.
Mahadayi River
Mahadayi RiverGomantak Digital Team

कमलाकर द. साधले

हे एक आध्यात्मिक विधान आहे, ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’, सृष्टिधर्माच्या अध्यात्मातही ते फिट्ट बसते. सर्वत्र पाण्याच्या टंचाईने ग्रासले आहे. घागरमोर्चा, बालदीमोर्चा, पाणी खात्याच्या इंजिनिअरांना घेराव वगैरे उपक्रम ठिकठिकाणी चालू होतील. सध्या म्हादईच्या पाण्याचा प्रश्‍नही पेटला आहे. पण गावातील, शहरातील समुदाय आपल्या गावात पाणी कुठे व किती आहे. याचा विचार करीत नाहीत. गेल्या महिन्यात म्हादई प्रश्‍नावर फोंडा बसस्टँडवर सभा झाली. राजेंद्र केरकर प्रमुख वक्ते होते.

त्यांनी गोव्यातील नद्यांचे उगम कर्नाटकात कुठे कुठे आहेत आणि ते पाणी कसे वळवायचे यासंबंधी कर्नाटकचे काय प्रयत्न आहेत याची तपशीलवार माहिती दिली. त्याचबरोबर गोव्यातील दुर्लक्षिलेल्या प्रमुख जलस्रोतांची यादीही सांगितली. त्यांचे संरक्षण व संवर्धन आपण त्या त्या भागातील लोकांनी करणे कसे महत्त्वाचे आहे, हे आवर्जून सांगितले. त्यांत फोंडा शहरातून वाहणाऱ्या बारमाही ओढ्याचाही उल्लेख होता.

Mahadayi River
Garbage awareness : फोंडा शहरात कचराप्रश्नी जागृती मोहीम...

या कार्यक्रमाच्या एकदोन दिवसांनंतर माझे एक फोंडेकर मित्र म्हणाले, ‘म्हादई प्रश्‍नावर आवाज उठवण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. फोंड्याच्या कण्णेव्हाळ ओढ्याचे आज गटर बनले आहे. त्याची दुरवस्था सुधारणे ही फोंडेकरांच्या आवाक्यातली गोष्ट आहे. तो प्रश्‍न हातात घेऊया’ त्यातून पुढे वाटचाल सुरू झाली पहिल्यांदा ओढा साफ करायचा असा कार्यक्रम ठरला. पण एखादा भाग स्वच्छ करण्याचा प्रतीकात्मक कार्यक्रम करून त्याचा प्रत्यक्ष काही उपयोग नाही.

पाच गावांतून वाहणारा १५ किमी लांबीचा ओढा त्या त्या गावातील लोकांच्या सहभागातून हा कार्यक्रम पूर्ण झाला पाहिजे. तो एकदा साफ केला म्हणजे संपले असेही थोडेच आहे. आजच्या लोकांच्या सवयीनुसार तो परत घाण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आजूबाजूच्या गावातल्या सर्वांना सहभागी करून घ्यायचे. त्या त्या भागातील लोकांनी तो भाग स्वच्छ व सुंदर ठेवावा यासाठी काही उपक्रम ठरवावा, असा विचार झाला. ओढ्याचा उगम बेतोडा गावात बोणबाग येथे होतो. तेथून सुरुवात करावी असे ठरले.

Mahadayi River
Margao Garbage Problem: कचरा समस्येवर मे महिन्याच्या आसपास तोडगा काढू; दिगंबर कामतांचे आश्वासन

या ओढ्याच्या पाणलोटक्षेत्र विकासासाठी केंद्र सरकारची ‘वर्षा जनसहभागिता’ नावाची एक योजना १५ वर्षांपूर्वी राबविली गेली होती. त्यासाठी त्या गावात पाणलोट संघ स्थापन केला गेला होता. त्या अंतर्गत बनविलेले बचतगट होते. ही मंडळी काही उपक्रम अजून चालवीत आहेत. त्यांना भेटलो. त्यांच्या गावातील काम त्यांनी गावाच्या सीमेपर्यंत करायचे. त्यापुढील मग कुर्टी गावाने करावे, असे ठरले. ओढ्याकाठच्या शेतजमिनी ओस पडल्या आहेत, कारण भातशेती परवडत नाही. तेथे भाजीपाल्याची लागवड करता येईल, असा प्रस्ताव बेतोडा गावातूनच आला. पाणलोट संघाच्या एक सदस्य दिनेश समरकर पंच आहे.

त्याला घेऊन सरपंच, उपसरपंच वगैरे पंच मंडळींना भेटलो. योजना आखली, मग गोव्याच्या जलसंसाधन(डब्ल्यूआरडी) खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांची भेट घेण्यात आली. त्यांना कल्पना आवडली. त्यांनी शिरोडा गावातील जलस्रोतांवरही ती योजण्याचे ठरविले. लागलीच २२ मार्च हा आंतरराष्ट्रीय जलदिन तसाच भारतीय वर्षाचा प्रथमदिन गुढीपाडवा, त्या दिवशी काहीशा घाईतच मंत्रिमहोदय शिरोडकर यांच्या हस्ते औपचारिक सुरुवात झाली.

प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याआधी या ओहळाची बारकाईने पाहणी करण्यासाठी ओढ्याच्या पात्रांतून पाणलोट संघ सदस्य संतोष गावडे याच्याबरोबर चालत जाऊन पाहणी केली. ओहोळाकाठी वनस्पतींनी प्रवाह झाकोळला गेला असल्याने बाहेरून नीट कल्पना येत नव्हती. ती पात्रांतून दीड किमी चालल्यावर आली. ओढ्याला लागून कुठेच वस्ती नसल्याने व एके ठिकाणचे बंधाऱ्याचे बांधकाम सोडल्यास कसलीच ‘विकास’कामे झालेली नव्हती त्यामुळे मी यापूर्वीच्या लेखांत वर्णिलेल्या नैसर्गिक जलप्रवाहाची सर्व रूपे तेथे बघायला मिळाली. पूर्वी प्रातर्विधीसाठी लोक ओढ्याकाठी घाण करायचे.

Mahadayi River
Canacona Garbage Problem: कचरा समस्येसाठी काणकोण पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये; मोक्याच्या ठिकाणी बसवले 15 सीसीटीव्ही

आता सर्वांच्या घरात संडास आल्याने ती घाण कुठेच नव्हती. स्वच्छ, पारदर्शक असा पाण्याचा प्रवाह होता. फक्त फोंडा रस्ता - हायवे या चाररस्त्याच्या थोड्याशा भागात होती. ती बहुधा तेथे थांबणाऱ्या ट्रक ड्रायव्हरांंची असावी. पण संबंध पात्रात इकडून तिकडून वाहून आलेले प्लास्टिक बऱ्याच प्रमाणात साठलेले होते. ते पाहून आमच्यातील एक शहरी व्यक्ती म्हणाली, ‘हे काढण्यासाठी पात्रांत मशीन घालावे लागेल’.

याला बाकीच्यांनी विरोधी दर्शविला. कारण एकदा त्यात मशीन उतरविले की ओहोळाचे नैसर्गिक रूप उद्ध्वस्त होईलच. पण तेथील पर्यावरण, परिसंस्था (इकोसिस्टिम) नष्ट होईल. वाहत्या जलस्रोतांचे नैसर्गिक स्वरूप कसे असते आणि ते तसेच असणे का आवश्यक याची चर्चा या लेखमालेत यापूर्वी केली असली, तरी पुनः एकदा करणे आवश्यक वाटते.

जलस्रोतांचे स्वसंवर्धनाचे व सृष्टिसंवर्धनाचे कार्य योग्य प्रकारे करण्यासाठी पाणी स्वसामर्थ्याने व स्वकौशल्याने आपल्या पात्राचा आकृतिबंध बनवीत असते. नैसर्गिक जलस्रोत कधीही सरळ रेषेत वाहत नसतो. नागमोडी वळणानेच वाहतो. त्याची रुंदी कधीच एकसारखी नसते. काठाचा कठीणपणा, वाहण्याची दिशा व ताकद यासारख्या अनेक घटकांमुळे ती कमीजास्त बनते. नदीचा व ओढ्याचा तळही कधीच सपाट नसतो त्यामुळे तो कधी उथळ तर कधी खोल बनतो.

Mahadayi River
Benaulim Garbage Problem: बाणावलीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध स्वयंसेवकांची मोहीम; एकाला रंगेहात पकडले अन् पुढे त्यालाच...

त्यामुळे कुठे वाळवंट, तर कुठे उथळ प्रवाह आणि कुठे डोह असे स्वरूप असते. प्रवाहाचे दोन्ही काठ, तेथील नैसर्गिक वनस्पतीप्रकार आणि प्राणी यांचे संयोजन व संवर्धन हे पाणी स्वतःच्या स्वास्थासाठी व संरक्षणासाठी योग्य अशा प्रकारे घडवीत असते. ही वैशिष्ट्ये ठळकपणे दाखविणारा कण्णोव्हाळचा बेतोडा एकच भाग शिल्लक राहिलेला असल्याने त्याच प्रकारे त्याचे जतन होणे आवश्यक आहे.

विकास’ प्रणालीने डोळे दिपून गेलेल्या सध्याच्या पिढीला हे नैसर्गिक प्रारूप समजण्याची कुवत नसली तरी नवीन पिढीला हे नैसर्गिक प्रारूप शिकण्याची संधी घालविली जाऊ नये. उन्हाळ्याच्या या दिवसांतसुद्धा लहान मुलांना पोहता येईल, डुंबता येईल एवढे पाणी तेथील पात्राच्या डोहात आहे. पन्नास वर्षांपूर्वी फोंडा शहरात असेच किंबहुना याहून जास्त व चांगल्या अवस्थेत होते. आज नाही! पुढे कधी तसे घडविणे शक्य असले तरी अवघड आहे.

या अभियानाच्या निमित्ताने या ओढ्याच्या जलक्षमतेविषयी अजून खोलात जाण्याची इच्छा झाली. त्या निरीक्षणातून असे दिसून आले की फोंड्याच्या मध्यावरून निरंतर वाहत जात असलेली जलसंपत्ती फोंडा शहराच्या रहिवाशांना दैनंदिन गरजेनुसार पुरेशी आहे. म्हणजे गटार बनू दिलेल्या या जलसंपत्तीत आम्हांला पोसण्याची क्षमता आहे.

Mahadayi River
Water Shortage: पिण्याच्या पाण्याविना केपेत गावकऱ्यांचे हाल; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी

फोंड्याच्या रहिवाशांना प्रत्यक्ष स्थानावर जाऊन फोंड्यातील ओढा व बारमाही झरे यांचे पाणी एका दिवसात किती वाहून जाते याचे सोप्या पद्धतीने मोजमाप घेण्याचा कार्यक्रम घ्यावा, असे ठरले. हा कार्यक्रम लवकरच घ्यावा. त्यात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावनोंदणी (विनाशुल्क) श्री. प्रदीप कामत यांच्या मोबाइल नंबरवर करावी असेही ठरले. (7020868239)

या टप्प्यानंतर या ओहोळाच्या प्रदूषणाचा प्रश्‍न कसा हाताळता येईल, जलस्रोतांलगतचा पट्टा सुशोभित करून आरोग्य- करमणुकीसाठी कसा वापरता येईल, जगात अशा प्रकारचे प्रयोग कुठेकुठे झालेले आहेत याची माहिती, असे अनेक उपक्रम आखले जातील. या दुर्लक्षित वा टाकाऊ बनलेल्या जलनिधीतून नागरी उपयुक्तता व समृद्धी कशी साधता येईल, याचे अनेक पर्याय पुढे येतील हे सर्व सृष्टिघटक आणि जैवविविधता यांचेही संवर्धन होईल.

पाण्याप्रमाणेच जीवनसंसाधनांचे नैसर्गिक स्रोत सर्वत्र आहेत. आपली अवस्था, ‘कडेवर कळसा व गावाला वळसा’, अशी आहे. सृष्टी जलसमृद्ध असूनही आम्ही नळ व पाण्याच्या बाटल्या या रेडिमेडच्याच शोधात आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com