काणकोणातील पाणी समस्या लवकरच सुटणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

 काणकोणमधील पाणीपुरवठा समस्या मे महिन्यापर्यत निकालात काढण्यात येणार आहे, असे आश्र्वासन जलपुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता कृष्णकांत पाटील यांनी उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी बोलाविलेल्या बैठकीत दिले.

काणकोण : काणकोणमधील पाणीपुरवठा समस्या मे महिन्यापर्यत निकालात काढण्यात येणार आहे, असे आश्र्वासन जलपुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता कृष्णकांत पाटील यांनी उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी बोलाविलेल्या बैठकीत दिले.

या बैठकीला मुख्य अभियंता अभियंता लेस्टर फर्नांडिस, कनिष्ठ अभियंता, लोलये पंचायत क्षेत्रातील रहिवासी, सरपंच, पंच उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या श्रीस्थळ येथील विश्रामधामात ही बैठक घेण्यात आली. लोलये पंचायत क्षेत्रातील दापट, पोळे, शेळी व माड्डीतळप येथील रहिवासीयांनी आठवड्यातून फक्त दोन दिवसच अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. टॅंकरद्वारेही पाणीपुरवठा होत नसल्याची कैफीयत रहिवाशांनी मांडली. यावेळी लोलये पंचायत क्षेत्रातील रहिवासीयांची पाण्याची समस्या नवीन पंप बसवून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मिटवण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता कृष्णकांत पाटील यांनी सांगितले.

ग्रामीण भागात जलपुरवठा आहे. परंतु पालिका क्षेत्राच्या वेगवेगळ्या भागात जलपुरवठा समस्या भेडसावत असल्याची तक्रार बबेश बोरकर यांनी केली. येथील दोन जलकुंभाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. नवीन जलवाहिनी घालण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी हमरस्ता कापून जलवाहिनी घालावी लागत आहे. सध्या फक्त आठ एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुरवठा करण्यात येत आहे. काणकोणची सध्याची गरज दहा एमएलडी आहे. मे महिन्यापर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर श्रीस्थळ जल शुद्धीकरण प्रकल्पाच्या क्षमतेप्रमाणे पंधरा एमएलडी पाणी शुद्धीकरण करून ते उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन जलकुंभासबंधी जमिनीचे वाद होते, ते आज सोडवण्यात आले आहेत. त्यामुळे या जलकुंभाचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी सांगितले. यावेळी लोलयेचे सरपंच सचिन नाईक, पैंगीणचे पंच प्रवीर भंडारी, गावडोंगरीचे उपसरपंच कुष्ठा गावकर व अन्य रहिवासी उपस्थित होते. काणकोण जलपुरवठा कार्यालयाकडे एक टॅंकर आहे. मात्र, चालक नाही. जीप व टॅंकरचा चालक एक असल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास अडचणी येतात ही अडचण दूर करण्यात येणार असल्याचे अभियंता पाटील यांनी सांगितले. यावेळी पैंगीणचे पंच प्रवीर भंडारी यांनी पंचायत क्षेत्रातील वेलवाडा, गाळये चिपळे खावट या भागात पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. चिपळे येथे काही वर्षांपूर्वी उभारलेला जलकुंभ विनावापर पडून असल्याचे त्यांनी सांगितले.

अन् उपसभापती कडाडले...
गेली साडेतीन वर्षे जलपुरवठ्याच्या बाबतीत तेच तेच पालुपद येथील अभियंते लावत आहेत. पाण्याची पातळी कमी आहे. पंप नादुरुस्त झाला आहे. टॅंकरचा चालक नाही हे पुन्हा पुन्हा ऐकून कंटाळा आला आहे. ज्यांना काम करायचे नाही, त्यांनी स्वच्छेने कार्यकारी अभियंत्यांकडे बदलीसाठी अर्ज करावेत. मी त्यासाठी शिफारस करणार नाही. कारण उद्या बदला घेतला हा ठपका माझ्यावर ठेवलेला मला नको आहे. वेळेत कामावर येत नाहीत. प्रत्यक्ष कामाच्या जागी न जाता कार्यालयात राहता हे सर्व समजण्यापलिकडील आहे. दुसऱ्या बाजूला गृहीणी दरदिवशी पाणी केव्हा येणार हे फोन करून विचारत आहेत, त्यांना उत्तरे देताना नको होते असे त्यांनी सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना सुनावले. मडगाव-कारवार हमरस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाला सुरवात होण्यापूर्वी ज्या रहिवाशांना जलपुरवठा जोडणी बदलयाची आहे. हमरस्ता खणून जलवाहिनी नेण्याची गरज आहे, त्यांनी त्वरीत जलपुरवठा खात्याकडे अर्ज करण्याचे आवाहन उपसभापती फर्नांडिस यांनी केले.

संबंधित बातम्या