गोव्याला लॉकडाऊनचा 'असाही' फायदा; शास्त्रज्ञांनी लिहिला शोधनिबंध

गोव्याला लॉकडाऊनचा 'असाही' फायदा; शास्त्रज्ञांनी लिहिला शोधनिबंध
Mandovi River Goa.jpg

पणजी: कोविडचा (Covid19) प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे (Lockdown)मांडवी नदीच्या मुखाजवळील प्रदूषण (Pollution) कमालीचे घटल्याचे दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (National institute of oceanography, Goa) शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. पाण्यात मिसळणारे प्रदूषणकारी घटक कमी होत गेल्याने पाण्यातील वनस्पतींची वाढ समाधानकारक झाल्याचे या शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.(water of Mandovi river in Goa became clean Due to the lockdown)

याविषयीचा शोधनिबंध (Research Paper) त्यांनी प्रसिद्ध केला आहे. या निबंधात त्यांनी म्हटले आहे, की नदीच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी नदीतील पाण्याची गुणवत्ता चाचणी वरचेवर करावी लागते. मांडवी नदीच्या मुखापासून अशी पाण्याची चाचणी विविध ठिकाणी संशोधकांकडून वारंवार आणि नियमितपणे केली जात आहे. पाण्याचे आरोग्य व्यवस्थापित करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन त्याच्या भौतिक, रासायनिक, जैविक आणि सूक्ष्मजैविकद्वारे केले जाऊ शकते. त्या पद्धतीने मांडवी नदीचे परीक्षण केले असता त्या पाण्यातील प्रदूषणकारी घटक कमी झाल्याचे आढळले आहे. यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रासायनिक मापदंडांपैकी एक म्हणजे विसर्जित सेंद्रिय घटकांचे प्रमाण होय.  ज्यात जलचरातील सेंद्रिय कार्बनचा सर्वात मोठा वाटा असतो. या सेंद्रिय कार्बनचा काही भाग प्रकाश शोषून घेतो आणि पाण्याला रंग देतो आणि म्हणूनच रंगीत विसर्जित सेंद्रिय पदार्थ म्हणून त्याला ओळखले जाते.                                        

शास्त्रज्ञांनी लिहिला शोधनिबंध
एनआयओकडून मांडवी व झुआरी या नद्यांचा अभ्यास 2014 पासून करण्यात येत आहे. ए. डायस, एस. कुरीयन, एस. थायपुरत, ए. के. प्रतिहरी आदी शास्त्रज्ञांनी याविषयीचा शोधनिबंध लिहिला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com