तिळारी कालव्याच्या दुरुस्तीनंतर उत्तर गोव्याचा पाणीपुरवठा सुरळीत

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

तब्बल बारा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शनिवारी कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तिळारी डाव्या कालव्यातील तसेच गोव्याच्या दिशेने जाणारा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान सुरळीत करण्यात आला.

साळ : तब्बल बारा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शनिवारी कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तिळारी डाव्या कालव्यातील तसेच गोव्याच्या दिशेने जाणारा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान सुरळीत करण्यात आला. २५ जानेवारी रोजी दुपारी खानयाळे येथील तिळारी डाव्या कालव्याला भगदाड पडल्याच्या घटनेनंतर तब्बल बारा दिवस या डाव्या कालव्यातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद होता. यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी, बागायतदार यांच्या शेतीचे पाण्याअभावी मोठे नुकसान झाले. शनिवारी सकाळी तब्बल बारा दिवसांनंतर तिळारी डाव्या कालव्यातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.

गोव्यात उद्यापासून पोलिस, सुरक्षा रक्षकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार

त्यानंतर डावा कालवा मार्ग पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला. कालव्यातील पाणी प्रवाह सुरळीत झाला. येथील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. उत्तर गोव्याला पेयजलाच्या पुरवठ्यासाठी आणि सिंचनासाठी पाणीपुरवठा करणारा तिळारी जलसिंचन प्रकल्पाचा डावा कालवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानयाळे येथे काही दिवसांपूर्वी फुटला होता. यामुळे उत्तर गोव्यातील बागायतींसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची भिती निर्माण झाली होती.काही दिवस अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आता आमठाणे धरणातून पाणीपुरवठा केला जात होता.

कालवा फुटल्यानंतर गाळ, मातीसह पाणी कालव्यापासून चार किलोमीटरपर्यंत पोचले. त्यामुळे दोडामार्ग कोल्हापूर मार्गावर असलेल्या साटेली-आवाडे येथील पुलावर पाणी येऊन त्या मार्गावरील वाहने दोन तासांहून अधिक काळ अडकून पडली होती. तिळारीतून गोव्याकडे पाणी नेणाऱ्या कालव्याला काही दिवसांपासून गळती लागली होती. त्यामुळे कालवा फुटणार याचे संकेत मिळत होते. अनेक शेतकऱ्यांनी त्याबाबत प्रकल्पाधिकाऱ्यांना कल्पना दिली होती; पण त्यांनी दुर्लक्ष केल्याने 26 जानेवारीला दुपारी अडीचच्या दरम्यान कालवा फुटला होता. 

गोव्यात शनिवारी रात्री पोहोचले 

शनिवारी सकाळी तिळारी डाव्या कालव्यातील पाणी प्रवाह सुरळीत केल्यानंतर शनिवार रात्रीपर्यंत गोवा हद्दीत पाणी पोहोचले आहे. गोवा हद्दीत पाणी पोहोचल्याने गोव्यातील शेतकरी, शासन प्रतिनिधी यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.
 

संबंधित बातम्या