गोव्यातील सर्व घरांना पाणी....खरी कुजबुज

शुध्द पाणी, अखंड पाणी या घोषणा नित्याच्याच
गोव्यातील सर्व घरांना पाणी....खरी कुजबुज
खरी कुजबुजDainik Gomantak

गोवा: राज्यातील सर्व घरांना शुध्द पाणी, अखंड पाणी या घोषणा नित्याच्याच झाल्या आहेत; पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. मध्यंतरी म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर मायबाप सरकारने विशिष्ट प्रमाणात मोफत पाणी पुरविण्याची घोषणाही केली. प्रत्यक्षात दामदुपटीची बिले लोकांना दिली गेली व एकच हलकल्लोळ उडाला. तो निस्तरता निस्तरता काब्रालबाबांच्या नाकीनऊ आले. पाणीपुरवठा खाते नेहमीच पुरेसे पाणी असल्याचे पण त्याच्या वितरणातील अव्यवस्थेमुळे ही समस्या उदभवत असल्याचे सांगते. हे खरे असेल तर खाते जलवितरणात सुसूत्रता का आणत नाहीत, हा कळीचा मुद्दा उपस्थित होतो.

खरी कुजबुज
Goa News: चालकाला निष्काळजीपणा भोवला

घर असूनही भाडोत्री

काणकोण पालिकेचा सध्या अजब कारभार चालला आहे. स्वत:चे घर दिले भाड्याला आणि स्वतःही भाडोत्री, अशी अजब परिस्थिती पालिकेची झाली आहे. तीन कोटी रुपये खर्चून ‘जीसुडा’ योजनेतर्फे उभारलेला भाजी मार्केट प्रकल्प विनावापर पडून आहे. पालिकेच्या सभागृह इमारतीच्या मजबुतीविषयी संशय असल्याने तिच्या वापरावर निर्बंध आले आहेत. विशेष म्हणजे, पालिका मालकीच्या किमान चार इमारती भाडेपट्टीवर देण्यात आल्या आहेत. मात्र, पालिका भवन उभारणीसाठी पोर्तुगीजकालीन पालिका इमारत मोडल्याने सध्या चाररस्ता येथील एका खासगी इमारत दरमहा पन्नास हजार रुपयांच्या भाडेपट्टीवर घेऊन तेथे पालिकेचा कारभार चालवावा लागत आहे. त्यामुळे आसरा असून नसल्यासारखे पालिकेची अवस्था झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

नगरसेवकांचा नवस!

नगराध्यक्ष बदलणार, असे वारे वाहू लागलेले असतानाच मडगावातल्या काही नगरसेवकांनी शुक्रवारी शिर्डी गाठली. दीड वर्षापूर्वी ज्यावेळी मडगाव पालिका मंडळ निवडून आले होते, त्यावेळी पहिले 15 महिने विजय सरदेसाई गटाचा तर नंतरच्या 15महिन्यांसाठी दिगंबर कामत गटाचा नगराध्यक्ष असेल, असे ठरले होते. सरदेसाई गटाचे नगराध्यक्ष लिंडन परैरा यांचे 15 महिने संपून आता दिगंबर कामत यांच्या गटातील नगरसेवकाची या पदावर वर्णी लागायची आहे. त्यासाठी दामू शिरोडकर यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, शिरोडकर यांच्या नावाला अनेकांचा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर काही नगरसेवक साईबाबांच्या पायाशी गेले आहेत. आता ते तिथे काय नवस बोलणार माहीत नाही. पण या नगरसेवकांमध्ये विजय सरदेसाई गटाचेही काही नगरसेवक आहेत. नाहीत ते दिगंबर कामत गटाचे. पाहुया साईबाबा त्यांना पावणार का?

बाबूंचा वाढदिवस

आमदार असताना कित्येकजण आपला वाढदिवस धुमधडाक्यात करतात. मात्र, आमदारकी गेल्यावर त्यांची वाढदिवस साजरा करण्याची उर्मी जाते. मात्र, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर त्याला अपवाद असावेत. कारण आज शनिवारी बाबूंचा वाढदिवस असून ते तो पूर्वीच्याच धुमधडाक्यात साजरा करणार आहेत. त्यासाठी सर्वांना आमंत्रणेही गेली आहेत. बाबू आमदार नसले तरी त्यांनी लोकांशी असलेला संपर्क तोडलेला नाही. ते अजूनही लोकांच्या जवळ राहिले आहेत, याचेच हे उदाहरण नव्हे का?

राजेंद्र घाटेंचा ‘गुस्सा’!

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांच्या कार्यक्रमांवर काँग्रेसचे तेथील स्थानिक नेता राजेंद्र घाटे यांनी सध्या बहिष्कार घातल्याचा बोलबाला आहे. शिवोली गट काँग्रेसच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर यांच्या पुढाकाराने मुलांसाठी कायसूव येथे आयोजित केलेल्या बालभवनच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरास दिलायला यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. मात्र, राजन घाटे यांनाही या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरील एक मान्यवर म्हणून निमंत्रित केले होते. पण ज्या ठिकाणी दिलायला लोबाे उपस्थित राहतील, तिथे आपण उपस्थित राहूच शकत नाही, असे घाटे यांनी आयोजकांसमोर स्पष्ट केल्याचे ऐकिवात आहे. एरवी घाटेसाहेबांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान लोबो, तसेच काँग्रेस पक्ष यांच्या समर्थनार्थ पोटतिडकीने भाषणे केली; परंतु ते सध्या स्वत:च शिवोलीचे आगामी आमदार म्हणून निवडून येण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत आणि त्याच हेतूने ते लोबो यांच्या विरोधात कार्यरत असल्याची चर्चा आहे.

‘जय हो लक्ष्मण’

‘इफ यु कॅनॉट बीट देम देन जॉईन देम’ असे इंग्रजीत एक बोधवाक्य आहे. कुंकळ्ळी नगरपालिका मंडळाच्या व्यावसायिक इमारतीत स्थानिक दुकानदारांना दुकाने द्यावीत म्हणून कुंकळ्ळी व्यापारी संघटनेने पालिकेच्या विरोधात आंदोलन छेडले होते. यासंदर्भात व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांना घेरावही घातला होता. नगराध्यक्ष व व्यापारी संघटना वाद बराच गाजला होता. त्यामुळे दुकानांचा लिलावही पुढे ढकलण्यात आला होता. याची पार्श्‍वभूमी अशी, की व्यापारी संघटनेच्या काही सदस्यांनी युरी आलेमाव यांच्या विरोधात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काम केले होते. पण युरी जिंकले आणि व्यापारी संकुलातील दुकानांचा लिलाव जाहीर केला. त्यामुळे व्यापारी संघटना व त्यांना पाठिंबा देणारे माजी नगरसेवक आता मौन बाळगून केवळ लिलाव पाहात आहेत. त्यांना लक्ष्मण रेषा भेदता आली नाही म्हणून लक्ष्मण समर्थक म्हणतात ‘जय हो लक्ष्मण’.

राम और श्याम...

दवर्ली - दिकरपाली पंचायतीशी संबंधित असलेली व सगळीकडे ‘राम व श्याम’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या जोडगोळीचे कित्येक किस्से यापूर्वी चर्चेत होते. ही जोडगोळी अडचणीत सापडलेल्यांना आपल्या कैचीत पकडून त्यांना कापायचे कसे हे बरोबर जाणून होती. त्यामुळे त्यांना कित्येकांच्या डोक्यांवर टोप्या चढविण्याचा मानही प्राप्त झाला होता, पण असे म्हणतात सगळेच दिवस सारखे नसतात. काही दिवस सासूचे असल्यास काही दिवस सुनेचेही असतात. कधी कधी शेरास सव्वाशेरही भेटतो. असे म्हणतात की यातील रामाला असाच एक सव्वाशेर भेटला, ज्याने त्याची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे त्याला इस्पितळात भरती करावे लागले. या घटनेचा श्यामने एवढा धसका घेतला आहे की माझे त्या रामबरोबर कुठलेही संबंध नाहीत असे ते सांगत सुटले आहेत. हा बदल झाला कसा हा एक चर्चेचाच विषय बनला आहे. ∙∙∙

विहिरी स्वच्छ; पण वापर कधी?

सरकारने केवळ शहरातच नव्हे, तर गावागावांत देखील नळाद्वारे पाणीपुरवठा व्यवस्था विकसित केली आहे. त्यासाठी खास प्रकल्प राबविले आहेत. त्यामुळे लोकांची मानसिकता नळावर अवलंबून राहाण्यायोग्य झाली आहे. त्यातून बऱ्याच भागांत लोकांचे परंपरागत विहिरींकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. वापर न झाल्याने शहरी भागात विहिरी निरूपयोगी ठरल्या आहेत. पण मजेची गोष्ट म्हणजे, अनेक नगरपालिका दरवर्षी आपल्या कक्षेतील विहिरी स्वच्छ व शुध्द करण्यासाठी बरीच रक्कम खर्च करत असतात. पण या विहिरींमधील पाण्याचा वापर होतो की नाही, हा मात्र पाहिले जात नाही. मग इतक्या दमड्या मोजून काय फायदा, असा प्रश्न केला जात आहे. ∙∙∙

खरी कुजबुज
'गोव्यातील अंगणवाडी भाडेप्रश्‍न लवकरच सोडवणार'

वार्काचा कचरा कुंकळ्ळीत!

‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ हे जुने गीत आपण ऐकले असेलच. या गीताची आठवण होण्याचे कारण म्हणजे, कुंकळ्ळी नगरपालिकेचा तुघलकी कारभार. कुंकळ्ळी पालिकेच्या कचरा यार्डात गेल्या अनेक दिवसांपासून वार्कातील मोठ्या हॉटेलचा कचरा टाकण्यात येत होता. आता कचरा जरी वार्कातील असला म्हणजे त्याचा संबंध युरी आलेमावशी आहे, असे मुळीच समजू नये. कचरा यार्डातील कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्या आशीर्वादाने हा कचरा यार्डात येत होता. शुक्रवारी पालिकेचे मुख्याधिकारी व पालिका अभियंते कचरा यार्डात गेले असता त्यांनी कचरा टाकणाऱ्याच रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पालिकेच्या कचरा यार्डात सोनसोडो तयार होत असल्याचे आम्ही याच सदरात सांगितले होते. त्यामुळे हे कचऱ्याचे डोंगर कसे तयार होत आहेत, हे कुंकळ्ळीकरांना समजले असेलच. यालाच म्हणतात ‘घर का भेदी लंका ढाये’ ∙∙∙

खाण अवलंबितांची व्यथा

खाण खात्याने खाणमालकांना एका महिन्याच्या आत खाणी सोडण्याचा आदेश दिला आहे. या नोटिसीवरून सध्या खाण परिसरात खळबळ उडाली आहे. एका महिन्यात कसे काय बुवा खाणमालक गाशा गुंडाळणार? कारण त्यांनी उभारलेल्या वास्तू कुणाच्या ताब्यात देणार, मशिनरी कुणाला विकणार आणि महत्त्वाचे म्हणजे, लिलाव झाला तर मग आम्हाला काम मिळणार ना, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत.

खरे तर खाणी बंद होऊन दहा वर्षे उलटली. मध्यंतरी फक्त दीडच वर्ष खाणी सुरू झाल्या. पण नंतरच्या काळात लिलावाच्या खनिज मालाची वाहतूक करण्यात आली. आता हा लिलावाचा खनिज माल किती होता, किती आहे, याबाबत वेगळे सांगायची गरज नाही. पण खाणींचा लिलाव केल्यानंतर खाणींवरील कामगारांचे काय, हा मोठा प्रश्‍न आहे. की हे सगळे सरकारचे नाटक आहे...काहीच कळायला मार्ग नाही. असे आम्ही नाही, खाण अवलंबितच बोलत आहेत. ∙∙∙

सिद्धेशना बक्षिसी

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सिद्धेश नाईक यांना पक्षनिष्ठेपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये कुंभारजुवा मतदारसंघातून घेतलेली माघार पथ्यावर पडली. अर्थात, त्यावेळी प्रदेशाध्यक्षांनी ‘यावेळी तू निवडणुकीतून माघार घे, पक्ष तुझ्या कार्यकर्तृत्वाची दखल घेईल’, असा शब्द दिला होता. त्यातच अगोदरचे उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांनी पक्षविरोधी काम केल्याने यांना पायउतार व्हावे लागले. कुडणेकर यांची गच्छंती आणि विधानसभा निवडणुकीत घेतलेली माघार यांचा योग जुळून आल्याने सिद्धेश यांना ही लॉटरी लागली, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ‘सबुरी का फल मिठा होता है’ याची प्रचीती सिद्धेश नाईक यांना आली असावी, असाही सूर व्यक्त होत आहे.

खरी कुजबुज
गोव्यात शपथविधी सोहळ्यासाठी जनतेच्या पैशांचा चुराडा!

दिल्लीवालेही खूष

मुख्यमंत्री प्रमोद सावंत गेल्या आठवडाभरापासून वारंवार दिल्लीवारी करीत आहेत. त्यांनी लगेच दुसरा दाैराही केला. या दाैऱ्यात ते बड्या राष्ट्रीय नेत्यांना भेटत आहेत. गोवा हे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने इतर राज्यांतील खासदार प्रमोद सावंत यांच्यासोबत फोटो काढून तो समाजमाध्यमावरही शेअर करीत आहेत. उत्तराखंडचे खासदार अमित बालूनी हे सावंत यांना भेटून बरेच खूष झाले. गोव्याला युवा, शांत आणि संयमी मुख्यमंत्री मिळाला असून गोवा राष्ट्रीय पातळीवरही चमकत आहे, असे त्यांनी आपल्या ‘ट्विट’मध्ये म्हटले आहे. यापूर्वीसुद्धा काही खासदारांनी प्रमोद सावंत यांच्यासोबतचे फोटो शेअर केले होते. सावंत आणि गोवा याबद्दल दिल्लीतील नेत्यांना चांगलेच आकर्षण निर्माण झाल्याचे दिसते. सावंत यांनी अशी कोणती जादू केली, ज्यामुळे ते दिल्लीवाल्यांची मने जिंकत आहेत? ‘राज को राजही रहने दो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.