म्हापसा येथे पाण्याचा अपव्यय

Dainik Gomantak
शुक्रवार, 15 मे 2020

जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र पाणी पसरले व त्यामुळे लोकांना रस्ता पार करणेही कठीण झाले

म्हापसा

पेडे-म्हापसा येथील यूथ हॉस्टेल परिसरातील जलवाहिनी काल (बुधवारी) सायंकाळी फुटल्याने सध्या पाणी वाया जात आहे. अलीकडच्या काही दिवसांत सध्या हा तिसऱ्यांदा घडलेला प्रकार आहे.
काही दिवसांपूर्वी ही जलवाहिनी फुटल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याबाबत दुरुस्ती केली होती. यासंदर्भात बोलताना ॲड. सीताराम परब म्हणाले, अशा प्रकारांमुळे म्हापसावासीयांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच मंत्र्यांनी या समस्येत लक्ष घालावे. स्थानिक नागरिकांनी सांगितले, की ही जलवाहिनी फुटल्यानंतर सुरुवातीस उच्च दाबामुळे पाण्याचे तुषार उंचीपर्यंत जाऊन पाण्याचा अपव्यय होत होता; तथापि, त्यानंतर आज गुरुवारी पाण्याचा दाब कमी असल्याने त्याबाबतचे प्रमाण कमी झाले. असे असले तरी हजारो लिटर पाणी वाया गेले.
पुन्हा एकाच ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार होत असल्याने याबाबत सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र पाणी पसरले व त्यामुळे लोकांना रस्ता पार करणेही कठीण झाले, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आज गुरुवारी पाणीपुरवठा खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला; तथापि, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांना त्याबाबत यश आले नाही.
सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक म्हाडेश्री यांनी केली आहे. लोक एका बाजूने पाणी नाही म्हणून त्रास सहन करीत आहेत आणि दुसऱ्या बाजूने सरकारच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारे हजारो गॅलन पाणी वाया जात आहे, असेही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या