वाठादेव येथील घरांवरील कारवाई तूर्तास टळली

houses
houses

डिचोली

राज्य महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील रोलींग मिल-वाठादेव येथील सतरा घरे हटविण्याची कारवाई तूर्तास टळली आहे. आवश्‍यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळासह विशेष कारवाई पथक आज (बुधवारी) सकाळी रोलीग मिल परिसरात धडकल्याने ज्या घरांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्या घरमालकांमध्ये एकच खळबळ माजली.
एकाबाजूने ‘कोविड-१९’चे संकट असतानाच घरे जमिनदोस्त होणार या भीतीने संबंधित घरमालक अस्वस्थ बनले. अखेर आमदार प्रवीण झांट्ये यांच्या सल्ल्यानुसार सरपंच, पंच आदींसह घरमालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी धाव घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी लागलीच दखल घेऊन शिष्टाई करताना घरांवरील कारवाई पावसाळा संपेपर्यंत चार महिन्यांसाठी स्थगित ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. त्यामुळे रोलींग मिल भागातील ‘त्या’ सतरा घरांवरील आजची कारवाई टळली. या घरांवरील कारवाई तुर्तास टळली असली, तरी भविष्यात या घरांवर कारवाई अटळ आहे. रोलींग मिल भागातील जी घरे पाडण्यात येणार आहेत. त्यापैकी जवळपास पंधरा घरे ही मूळ राज्याबाहेरील व्यक्‍तींची असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घरी धाव..!
करासवाडा-म्हापसा ते खांडेपरपर्यंत राज्य महामार्ग उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांतर्गत व्हाळशी-डिचोली ते विर्डी पुलापर्यंत बगलमार्ग तयार करण्यात येणार आहे. या बगलमार्गात कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील रोलींग मिल-वाठादेव येथील सतरा घरे येत आहेत. ही घरे पाडण्यात येणार आहेत. तत्संबंधीची नोटीस मागील आठवड्यात उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि स्थानिक पंचायतीला पाठविण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे. त्यानुसार उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलडोझर आदी यंत्रणा आणि मनुष्यबळासह विशेष कारवाई पथक आज सकाळी रोलींग मिल परिसरात दाखल झाले. घरांवर बुलडोझर फिरवण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच स्थानिक सरपंच सुषमा सावंत, पंच महेश सावंत, रसुल मदार आदींसह स्थानिकांनी साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी धाव घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पंचायतीच्या शिष्टमडळासह घरमालकांनी आपली कैफीयत त्यांच्यासमोर मांडली. घरे पाडली, तर ऐन ‘कोविड’ महामारीच्या संकट काळात काय करावे, असा प्रश्‍न संबंधित घरमालक आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांजवळ उपस्थित केला, अशी माहिती मिळाली आहे. आज जी घरे जमिनदोस्त करण्यात येणार होती. त्यापैकी वसंत होसमणी यांच्या घरात येत्या शुक्रवारी (ता. २९) लग्नसोहळा आहे. ही बाबही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांच्या शिष्टमंडळाकडून सविस्तर हकिकत जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तूर्तास कारवाई स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर यंत्रसामग्रीसह विशेष कारवाई पथक माघारी फिरले. आजची कारवाई टाळण्यसाठी मयेचे आमदार प्रवीण झांट्य यांनी पुढाकार घेतला होता.
दरम्यान, घरे हटविण्यापूर्वी संबंधित घरमालकांची पुनर्वसन करा, अशी मागणी सरपंच सुषमा सावंत, पंच महेश सावंत आणि रसुल मदार यांनी केली आहे.

आमचे पुनर्वसन करा..!
आज घरे पाडण्यासाठी विशेष कारवाई पथक येणार, त्याची आम्हाला अजिबात कल्पना देण्यात आली नव्हती. अशी माहिती कारवाई अटळ असलेल्या संबंधित काही घरमालकांनी देवून या प्रकाराबद्‌दल नाराजी व्यक्‍त केली. आजची कारवाई टळल्याबद्‌दल घरमालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार प्रवीण झांट्ये यांना धन्यवाद दिले आहेत. वीस वर्षांपुर्वी आम्ही भुखंड विकत घेऊन घरे बांधलेली आहेत. राज्य महामार्गासाठी आमची घरे जमिनदोस्त करायचीच असेल, तर आमचे अगोदर व्यवस्थित पुनर्वसन करा, अशी मागणी वसंत होसमणी आणि अन्य घरमालकांनी केली आहे. ही मागणी घेवून आमदार झांट्ये यांच्या पुढाकाराने घरमालक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, अशी माहितीही घरमालकांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com