राजधानी पणजीत आंदोलनांचे पेव ; जीवरक्षक संघटनेचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू

गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करून सेवेत सामावून घेण्याविषयी जीवरक्षकांचा लढा सुरूच आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून आजपासून आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकासमोर बसून धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. 

पणजी  :   दिवसभरात राजधानी शहरात अनेक आंदोलने झाली. आम्हाला कोळसा नको या संघटनेने राज्यभरात आंदोलने केल्यानंतर आज वन खाताच्या मुख्यालयावर धडक मारली. मोले ते म्हापसा या तम्नार उच्च दाबाच्या वीज वाहिनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी झाडे कापण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी या आंदोलकांनी केली.

प्रधान मुख्य वनसंरक्षक संतोषकुमार यांच्याशी अभिजित प्रभुदेसाई, डायना तावारीस, इमिल कार्वाल्हो, नरेश गावडे, गाब्रियला डिक्रुझ, सावियो आफोन्सो, मारीया कुलासो आदींनी चर्चा केली. दुसरा मोर्चा युथ ॲज राय्ज फऑर गोवा संघटनेनेही प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा नेला. चर्च चौकातून त्यांनी या मोर्चास सुरवात केली. त्यानी पथनाट्ये सादर करून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
तिसरे आंदोलन जीवरक्षकांचे आहे. त्यांनी गेली वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करून सेवेत सामावून घेण्याविषयी जीवरक्षकांचा लढा सुरूच आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून आजपासून आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकासमोर बसून धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. 

राज्यातील सुमारे एक हजाराच्यावर जीवरक्षकांना दृष्टी कंपनीने सेवेतून बाजूला केल्यानंतर या जीवरक्षकांनी गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सेवेत सामावून घ्यावे यासाठी गेली वर्षभरापासून लढा सुरू ठेवला आहे. अनेक पक्षांनी या जीवरक्षकांना पाठिंबा दिला. जे पक्ष यापूर्वी सत्तेत होते, त्यांनीही आता या जीवरक्षकांच्या बाजूने पाठिंबा दिला आहे. जीवरक्षक म्हणून काम करणारे युवक मूळ गोमंतकीय आहेत. तरीही राज्य सरकार त्यांना सेवेत सामावून घेत नाही, जीवरक्षकांचा प्रश्‍न सोडविण्यात सध्याचे सरकार अपयशी ठरले आहे, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. 

जीवरक्षकांनी यापूर्वी गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन खात्यांच्या कार्यालयासमोरही धरणे, आंदोलन केले आहे. यापूर्वी जीवरक्षकांनी अनेकदा आझाद मैदानावर येऊन आंदोलन केले. पर्यटन खात्याने दृष्टी कंपनीशी करार वाढविला आहे. त्यालाही या जीवरक्षकांनी आक्षेप घेतला आहे, विरोधी पक्षातील अनेक राजकीय लोकांनी जीवरक्षकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला, पण त्याची दखल सरकारी पातळीवर  घेतली गेली नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

 

संबंधित बातम्या