आम्‍हाला जेवण नको, गावी जायला द्या

dainik gomantak
शनिवार, 9 मे 2020

आम्हाला जेवण नको, किंवा पोलिसांचा मारही नको, रेती काढत असताना आम्हाला पोलिस येऊन मारतात. मात्र, आम्हाला मारण्यापेक्षा ‘त्या’ मालकांना पोलिस काहीच करत नाहीत. येथे राहून आम्हाला आता पोलिसांचा आणखी मार खायचा नाही. त्यापेक्षा आम्हाला आमच्या घरी पोहोचवा, सरकारने आमची मागणी मान्य करावी, अशी मागणी मजुरांनी केली.

पेडणे, 

पोरस्कडे - नईबाई पेडणे येथील तेरेखोल नदीतून रेती उपसा करणारे किमान ७०० मजूर एकत्रित येऊन आम्हाला घरी जाण्यासाठी खास रेल्‍वेची सोय करावी. ‘आम्ही घरी जातो, आम्हाला सरकारचे जेवण नको, आम्हाला आमच्या घरी पोचवा’. झोपड्यात राहिलो की अधूनमधून पोलिस येतात आणि आम्हाला मारबडव करतात. पोटासाठी काम केले, तर विनाकारण मार खावा लागतो? आम्ही का सोसावे? आम्हाला आमचा गावच बरा, अशी कैफियत बिहार येथील मजुरांनी आज मांडली.
पोरस्कडे पंचायत क्षेत्रात ८ रोजी सुमारे ७०० बिहारी नागरीक मालपे रेल्वेच्या दिशेने जात असता पेडणे पोलिसांनी त्यांना अडवले. रेती व्यावासायिकही त्यांची समजून घालत होते. ‘तुम्ही जाऊ नका, तुम्ही येथे थांबा, तुम्हाला काम देतो, जेवण देतो’ असे सांगून त्‍यांची मनधरणी करीत होते. मात्र, मजूर काहीच ऐकून घेत नव्‍हते. आम्हाला जेवण नको, किंवा पोलिसांचा मारही नको, रेती काढत असताना आम्हाला पोलिस येऊन मारतात. मात्र, आम्हाला मारण्यापेक्षा ‘त्या’ मालकांना पोलिस काहीच करत नाहीत. येथे राहून आम्हाला आता पोलिसांचा आणखी मार खायचा नाही. त्यापेक्षा आम्हाला आमच्या घरी पोहोचवा, सरकारने आमची मागणी मान्य करावी, अशी मागणी मजुरांनी केली.
या मजुरांनी पंचायत कार्यालयात आणि मामलेदार कार्यालयात, दहा दिवसापूर्वी नोंदणी केली. मात्र, आम्हाला जायला अजून रेल्वेची व्यवस्था का केली नाही, असा सवाल करून रात्री अपरात्री पोलिस झोपड्यांमध्ये येतात आणि मारहाण करतात. पोटासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. रेती उपसा कायदेशीर की बेकायदेशीर हे सरकारने मालकांना विचारावे. आम्ही पोटासाठी काम करतो मग आम्हाला मार का खावा लागतो, अशी व्‍यथा मजूर मांडत होते.

दोन दिवसांची दिली मुदत
प्रत्येक राज्यातून परराज्यातील मजुरांना जाण्यासाठी वाहने, रेल्वे सुरू आहेत. तर गोव्यातून का नाही, लवकरात लवकर रेल्वेची सोय करावी. आम्ही आमच्या गावी जातो, असे सोनू कुमार चौधरी या मजुराने सांगितले. काही रेती व्यावसायिक मालक मजुरांना जाऊ नका, तुम्ही थांबा अशी वारंवार विनवणी केली. मात्र, मजुरांनी आज संघटित झाल्‍यावर त्या ठिकाणी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी येतील ते आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतील, असा विश्‍‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. मजुरांची प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी आणि पोलिसांनी समजूत काढत असताना टप्याटप्याने जाण्यासाठी रेल्‍वेची सोय असेल असे सांगितले. त्यावर या मजुरांनी आम्ही दोन दिवस वाट पाहणार, असेही बजावले.

वेर्णा येथून १८ मजूर पायी चालत
वेर्णा येथे एका कंपनीत बिहारचे युवक काम करत होते. त्यांना कामावरून कमी केले, त्यांना मालकाने वाहनांची सोय केली नाही. ते मजूर आज चालत चालत पेडणे येथे पोहोचले व आम्ही चालतच जाणार? कुठेतरी वाहन मिळेल या आशेने आम्ही आलो, आम्हाला गावाला जाऊन आमची शेती करायची आहे. त्‍याच्‍यावर पोट भरू, असेही त्‍यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या