मराठी संगीत रंगभूमीची उज्वल परंपरा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

सांगली संस्थानिक चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ मध्ये संगीत सीता स्वयंवर नाटकाचा प्रथम प्रयोग केला व मराठी रंगभूमीचा पाया रचला तो दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.

पणजी : सांगली संस्थानिक चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ मध्ये संगीत सीता स्वयंवर नाटकाचा प्रथम प्रयोग केला व मराठी रंगभूमीचा पाया रचला तो दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. आज ‘कोविड’ संकटामुळे टाळेबंदीचा काळ असला तरी अनेक संस्थानी बंधने पाळून हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे हे विशेष.

साधारणतः १९ व्या शतकाच्या मध्यावधीस सुरू झालेली मराठी नाट्यपरंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने अधिक जोशात जोपासली जात आहे. नवनवीन विषय हाताळणारी ददर्जेदार नाटके मराठी रंगभूमीवर येत आहेत. अनेक लक्षवेधी प्रयोग सादर होताहेत. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, निव्वळ करमणुकप्रधान,रहत्स्यमय, प्रायोगिक असे विषय यशस्वीपणे हाताळलेले आपण पहात आलो आहोत.

१७० वर्षांची ही रंगभूमीची परंपरा आम्ही २१ व्या शतकातील गतीमान युगातही जोपासली जात आहे. मराठी, हिंदी चित्रपटात नावाजलेले मराठी अभिनेते, अभिनेत्री यांची अभिनयाची सुरवात या रंगभूमीवरूनच झाली आहे. नाटक हे मनोरंजनाचे साधन आहे असे म्हणताना, त्यातील ऐतिहासिक मूल्य वाढवणे गरजेचे आहे. जुने ते सोने या तत्वाचा विचार करून आपली समृद्ध नाट्यकला आत्मियतेने जोपासायला हवी. 

गोवा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये
सम्राट क्लब चोडणचा कार्यक्रम

सम्राट क्लब चोडणतर्फे गुरुवारी ५ रोजी येथील गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात संध्याकाळी ४.३१ वाजता मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अजय वैद्य यांचा सत्कार करण्यात येईल. 
यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून सम्राट क्लब इंटरनॅशनलचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. अवधुत सलत्री, राज्य अध्यक्ष डॉ. उदय कुडाळकर, माजी आमदार धर्मा चोडणकर उपस्थित राहणार आहेत.

‘इन्स्टिट्यूट मिनेझिस’मध्ये
‘रंगभूमी कशी टिकवायची’

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) संस्थतर्फे गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता संस्थेच्या परिषदगृहात मराठी रंगभूमीदिन कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त ‘रंगभूमी कशी टिकवायची’ या विषयावर परिसंवाद होईल. यात ज्येष्ठ रंगकर्मी उज्वला तारकर, नागेश फडते व उपदेश कोसंबे हे वक्ते बोलतील. यावेळी ज्येष्ठ कलाकार चंद्रकांत बिटये गोवेकर (शिवोली), चंद्रकांत गोवेकर(मांद्रे) व नागेश फडते (कुंभारजुवे) यांचा सत्कार करण्यात 
येईल.

रंगकर्मी सूर्यकांत आमोणकर
यांचा ताळगावात सत्कार
सम्राट क्लब पणजीतर्फे गुरुवारी ५ रोजी सकाळी अकरा वाजता मराठी रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी सूर्यकांत आमोणकर यांचा त्यांच्या ताळगाव येथील निवासस्थानी सत्कार करण्यात येणार आहे.

मराठी संगीत रंगभूमीला 
परंपरा उज्वल: दांडेकर

आपल्या मराठी संगीत रंगभूमीची परंपरा फार मोठी आणि उज्वल आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे शाकुंतल हे पहिले नाटक संगीत रंगभूमीवर यशस्वीपणे आले व ते लोकप्रियही झाले. १४० वर्षांची ही परंपरा आजतागायत चालू आहे. प्रतिभाशाली नाटककार, दिग्दर्शक, संगीतकार, साथीदार यांच्यामुळे दर्जेदार नाटके चढत्या रंगतीने येत राहिली. या परंपरेत मला सहभागी होता आले, स्वरराज छोटा गंधर्व, पंडित राम मराठे, माझे पती मोहन दांडेकर यांच्या यांच्यामुळे संगीत रंगभूमीवर कामगिरी बजावू शकले. हे मी माझे भाग्य समजते. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराची मानकरी ठरले. ती मराठी संगीत रंगभूमीमुळे. आता काळानुरूप नवीन लेखकांनी सकस कथानके निवडून संगीत नाटके लिहिली, शास्त्रीय संगीताची तयारी असलेले नवीन कलाकार भूमिका करू लागले तर ही परंपरा अशीच पुढे सुरू राहील. आज अनेक तरुण कलाकार नाट्यसंगीत शिकताहेत, गाताहेत हा धागा आहेच, असे मराठी संगीत रंगभूमीवरील श्रेष्ठ गायिका व अभिनेत्री मधुवंती दांडेकर  यांनी सांगितले.

संबंधित बातम्या