आता गोवा होणार ‘ड्रग्ज फ्री’: पोलिस महासंचालकाचे आश्वासन

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

अमलीपदार्थाचे प्रमाण नक्कीच कमी झाले असून आम्ही गोव्याला ‘ड्रग फ्री’ करण्यासाठी कार्यरत आहोत.

पणजी: चोरी, लूटमार तसेच राज्यात घडणाऱ्या लहानसहान गुन्ह्यांची नोंद होत नव्हती. मात्र, आता राज्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याची नोंद करण्यास आम्ही सुरवात केली आहे. शिवाय अंमलीपदार्थ विक्री जाळ्याच्या मुळाशी जाण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू असून यासाठी आमचे पोलिस दिवसरात्र एक करीत आहेत. राज्यात अमलीपदार्थांबाबत कोणालाही माहिती मिळाली तर ती आम्हाला द्यावी, असे आवाहन पोलिस महासंचालक (डिजीपी) मुकेश कुमार मीणा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मागील वर्षी ६ कोटी ७० लाख रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले होते. यावर्षी आतापर्यंत सुमारे ५.५ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमलीपदार्थाचे प्रमाण नक्कीच कमी झाले असून आम्ही गोव्याला ‘ड्रग फ्री’ करण्यासाठी कार्यरत आहोत. गोवा हे शांतताप्रिय राज्य आहे. मात्र, येथे ड्रगसारख्या गोष्टी उपलब्ध होत असल्याने गोव्याचे नाव सर्वत्र खराब होत आहे. आम्हाला गोव्याचे नाव अगदी स्वच्छ ठेवायचे असल्याने आम्ही अमलीपदार्थ प्रकरण समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. पेडणे येथे आतापर्यंत अनेक अमलीपदार्थ विक्रेत्या लोकांना पकडले असून येत्या काही दिवसात आम्ही त्यांची आकडेवारीसुद्धा तुमच्यासमोर ठेवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राज्यात पार्टी करण्यासाठी येणारे आणि फिरायला येणारे लोकच अमलीपदार्थ घेतात, असेही यावेळी त्यांनी सांगितले. 

राज्यभरात काम करणारे ८५० ते ९०० पोलिस कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होतो. मात्र, तरीही आम्ही कामाच्या बाबतीत कोणत्याच प्रकारचा बेजाबदारपणा बाळगला नाही. राज्यातील अनेक पोलिस स्थानकात स्वच्छता नव्हती. मी आल्यापासून स्वच्छतेबाबत अतिशय काटेकोर नियम राबिविले असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सुरक्षा व्यवस्था पूर्वी तैनातच होती, आताही तशाच स्वरूपात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. येत्या ३१ डिसेंबरच्या आणि पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तत्पर आहोत. यावर्षी कोणत्याही प्रकारची समस्या होऊ नये म्हणून गस्त वाढविणे यासारख्या गोष्टी आवर्जुन करण्यात येणार आहेत, असेही यावेळी त्यांनी सांगितले. 

‘प्रकल्प लोकांच्या हितासाठीच’
राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार आणि रेल्वे दुपदरीकरण यासारखे प्रकल्प राष्ट्रीय हितासाठी महत्वाचे असल्याचे सांगत पोलिस महासंचालकांनी प्रकल्पांना पाठिंबा दर्शविला. विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रकल्पांना लोक विरोध करीत असल्याचे पाहून आश्चर्य वाटत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या प्रकल्पांना विरोध होत असल्याने पोलिस म्हणून त्यांना संरक्षण पुरविण्याचे आमचे काम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जेंव्हा सरकार एखादा प्रकल्प राबविते, तेव्हा पूर्ण प्रक्रिया करून जनहितार्थच हे प्रकल्प राबिविले जात असल्याचे ते म्हणाले.

आणखी वाचा:

गोव्याचा आर्थिक मुसंडी मारण्याचा प्रयत्न असणार खडतर - 

 

 

संबंधित बातम्या