मोपा विमानतळासाठी कोकणातील या गावात उभारणार हवामान अंदाज यंत्रणा

प्रतिनिधी
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

जागा निश्‍चितीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

बांदा: महाराष्ट्र-गोवा राज्याच्या सीमेवर मोपा (गोवा) येथे साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विमान उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी हवामानाचा अंदाज किंवा हवेचा दाब निश्‍चित करण्यासाठी सीमेवर सावंतवाडी तालुक्‍यातील डिंगणे, नेतर्डे व सातार्डा येथे हवामान अंदाज यंत्रणा (वेदर फोरकास्टिंग) बसविण्यात येणार आहे. याची जागा निश्‍चित करण्यासाठी मोपा विमानतळ प्राधिकरण व गोवा महसूलचे वरिष्ठ अधिकारी आज बांद्यात दाखल झाले होते. यावेळी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी येथील हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

दोन्ही राज्यांच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यायाने बांदा, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्‍यांना होणार आहे. विमानतळाची धावपट्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दिशेने समांतर आहे. यामुळे सीमेलगतची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरीचशी गावे विमानतळाच्या कक्षेत येतात. मोपातील नियोजित विमानतळ आंतरराष्ट्रीय असल्याने येथे विमान उड्डाण व उतरण्याची संख्याही अधिक असणार आहे. मुंबई, महाराष्ट्र किंवा देशाच्या उत्तर भागातून येणाऱ्या विमानांची संख्या ही सर्वाधिक असणार आहे. विमान उतरण्यासाठी प्रत्येक मोसमात हवेचा दाब तपासण्यासाठी हवामानाचा अंदाज घ्यावा लागतो. यासाठी विमानतळापासून ४ ते ५ किलोमीटरवर असलेल्या सीमेवरील गावे निश्‍चित करण्यात आली आहेत.

यासंदर्भात आज पाहणी करण्यासाठी मोपा विमानतळ प्राधिकरणचे अधिकारी, गोव्याचे उपजिल्हाधिकारी, महसूल अधिकारी बांदा येथे आले होते. यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, महसूल मंडल अधिकारी आर. वाय. राणे, तलाठी वर्षा नाडकर्णी यांच्यासह कोल्हापूर व रत्नागिरी येथील हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बांद्यात चर्चा केल्यानंतर विमानतळाच्या प्रारूप आराखड्यानुसार डिंगणे, नेतर्डे व सातार्डा येथे हवामानाचा अंदाज देणारी यंत्रसामुग्री बसविण्याचे निश्‍चित करण्यात आले. प्रत्यक्ष जागेवर जाऊन तेथील अक्षांश, रेखांश तपासण्यात आलेत. ही यंत्रे दोन फूट उंच व २ फूट रुंद असून झाडांची घनता कमी असलेल्या ठिकाणी लवकरच बसविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

विमान उड्डाणाच्या मार्गासाठी हवामानाचे परिक्षण आठवड्यातून दोन वेळा गरजेचे असते. हवामान खराब असल्यास या यंत्रणेकडून धोक्‍याची सूचना देखील देण्यात येते. लवकरच यंत्रसामुग्री उभारण्याला प्रारंभ करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या