डिचोलीत साप्ताहिक बाजार हळूहळू येतोय पूर्वपदावर

प्रतिनिधी
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

डिचोलीतील साप्ताहिक बाजार आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मागील साप्ताहिक बाजाराच्या तुलनेत आज (बुधवारी) या बाजाराचे अधिक अस्तित्व जाणवले. मागील आठवड्याच्या तुलनेत आज बाजारात विक्रेते आणि ग्राहकांचा आकडाही लक्षणीय होता. 

डिचोली: डिचोलीतील साप्ताहिक बाजार आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मागील साप्ताहिक बाजाराच्या तुलनेत आज (बुधवारी) या बाजाराचे अधिक अस्तित्व जाणवले. मागील आठवड्याच्या तुलनेत आज बाजारात विक्रेते आणि ग्राहकांचा आकडाही लक्षणीय होता. 

‘कोरोनो’मुळे पालिकेने सतर्क होताना तीन महिन्यापूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे शहरातील साप्ताहिक बाजारावर नियंत्रण आले होते. त्यामुळे जून महिन्याच्या १० तारखेपासून साप्ताहिक बाजारावर नियंत्रण येताना १७ जूनपासून नियमितपणे साप्ताहिक बाजार भरलाच नव्हता. राज्याबाहेरुन येणाऱ्या भाजीवाहू वाहने आणि विक्रेत्यांना बाजारात प्रतिबंध करण्यात आला होता. पालिकेच्या या कार्यवाहीमुळे त्यावेळी साप्ताहिक बाजारावर बऱ्याच मर्यादा आल्या होत्या. मागील आठवड्यापर्यंत प्रामुख्याने भाजी बाजार भरलाच नव्हता. तब्बल बारा आठवडे म्हणजेच अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मागील बुधवारी (ता. २) डिचोलीत साप्ताहीक बाजाराची चाहूल जाणवली होती.
 पूर्वीप्रमाणे साप्ताहिक बाजार भरला नसला, तरी काही भाजी विक्रेत्यांनी मागील साप्ताहीक बाजारात व्यवसाय सुरू केला. जवळपास ४० टक्‍क्‍यांहून अधिक विक्रेत्यांनी मागील आठवड्यात बाजारात आपला व्यवसाय थाटला होता. 

आज मात्र, भाजी, फळ, कपडे आदी बहूतेक विक्रेत्यांनी बाजारात स्टॉल थाटून आपला धंदा केला. मागील साप्ताहिक बाजाराच्या तुलनेत आज बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली होती. 

पूर्वीप्रमाणे साप्ताहिक बाजाराचे अस्तित्व जाणवले असले, तरी ग्राहकांकडून बाजारात सामाजिक अंतर आदी नियम पाळण्यात येत होते. पालिकेचे कर्मचारी आणि पोलिसही बाजारातील स्थितीवर लक्ष ठेवून होते.

 

संबंधित बातम्या