शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्याचीच झाली शिकार

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्याचीच शिकार होण्याची दुर्दैवी घटना काल रात्री रिवण ग्रामपंचायत क्षेत्रातील कोणीर येथे घडली

कुडचडे : शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्याचीच शिकार होण्याची दुर्दैवी घटना काल रात्री रिवण ग्रामपंचायत क्षेत्रातील कोणीर येथे घडली. घरच्या आणि गावातील लोकांनी ही घटना म्हणजे घातपात असल्याचा संशय व्यक्त करून ग्रामस्थांनी केपे पोलिस स्थानकात धडक देऊन या घटनेत सहभागी असणाऱ्यांना शोधून काढून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असता आपण या घटनेची सखोल चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार असल्याचे केपेचे पोलिस निरीक्षक पेडणेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांसमवेत सांगेचे आमदार प्रसाद गावकर उपस्थित होते.

प्राप्त माहितीनुसार, रिवण पंचायत क्षेत्रातील कोणीर या गावातील वासू गावकर हा आपल्याच गावातील मित्रासमवेत गावापासून जवळच असलेल्या जंगलात शिकारीसाठी गेला होता. वासू हा घरातून संध्याकाळी सहाच्या दरम्यान बाहेर पडला होता. बराच वेळ झाल्याने तो परतला नसल्याने गावातील लोक त्यांना शोधण्यासाठी जात असताना मुख्य रस्त्याच्या बाजूला मयत वासू गावकर यांचा मृतदेह आढळून आला व मोबाईलची लाईट पेटत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. अशा स्थितीत ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिला. 

आणखी वाचा:

गोव्यात कोरोनव्हायरसचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे विवाहसोहळा -

घरच्या लोकांनी व ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार शिकारीसाठी गेलेल्या सहकाऱ्यांकडून वासू गावकर यांच्या पायावर गोळी झाडली असावी किंवा जंगली जनावरांना अडकविण्यासाठी फास तयार करण्यात येतो व फासाची एक तार बंदुकीच्या चापला अडकविण्यात येते. फासात पाय पडताच बंदुकीचा चाप ओढला जाऊन मयत वासू गावकर यांच्या पायाला बंदुकीची गोळी लागली असावी. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी अहवालात बंदुकीची गोळी लागल्याचे उघड झाले आहे. एक तर गोळी लागताच इतर सहकारी पळून गेले असावे आणि त्याच स्थितीत वासू गावकर घरी येण्यासाठी मोबाईल लाईट लावून येत असताना रस्त्याच्या कडेला कोसळला असावा किंवा रक्तस्राव होऊन तो जंगलात मृत्यू पावला. 

आणि सहकाऱ्यांनी त्याला उचलून रस्त्यापर्यंत आणून सोडले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत असून यात दोघांपेक्षा अधिक जण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी केपे पोलिस स्थानकावर धडक देऊन कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. या घटनेत सहभागी असणाऱ्यांना सैल सोडल्यास अश्या प्रकारच्या घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी संतोष गावकर, प्रमोद गावकर व अन्य ग्रामस्थ सहभागी झाले होते. वासू गावकर यांच्या मागे पत्नी, पाच वर्षाची मुलगी व एक वर्षाच्या मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी उशिरा वासू गावकर यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आलें.

निवडणूक आचारसंहिता लागू होताच परवानाधारक बंदुका पोलिस ताब्यात घेत असताना असले प्रकार घडतात कसे याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक असून या प्रकरणात सखोल चौकशी करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता केपे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी आमदार प्रसाद गावकर यांनी करून योग्य तपास न केल्यास ग्रामस्थांसमवेत जो निर्णय होईल त्यात आपण सामील होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या