लॉकडाऊनपासून मी काय शिकले?

Lockdown
Lockdown

कोरोना महामारीने चीनमध्ये घातलेला धुमाकूळ आपण दररोज टीव्हीवर बघत होतो. हळहळ वाटायची, पण आपण निश्चिंत होतो. कोरोनाने हळू-हळू सीमा पार करायला आरंभ केला. एक-एक देश जिंकत तो पुढे चालला होता. दररोज कितीतरी लोक मृत्युमुखी पडत होते, तरी आपण बिनधास्त होतो. “कोरोना काही इथे पोहोचत नाही”, “इटलीत आहे तो, आपण का घाबरायचं?”, “खूप दूर आहे, आपल्याला घाबरायचं कारण नाही” असे म्हणता म्हणता कधी कोरोनाने आपल्या देशात प्रवेश केला आणि जनजीवन ठप्प करून टाकले ते देशवासीयांनासुद्धा कळले नाही.
लॅबमधून एखादा गॅस लिक काय होतो अन् बघता बघता राक्षसासारखे अक्राळविक्राळ रूप धारण करून सगळ्यांना खाऊन काय टाकतो. सगळंच अजब! कधी स्वप्नातही असं काही घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. कालपर्यंत लॅपटॉपची टकटक, वाहनांची घरघर, कारखान्यांचे भोंगे या सर्वांची कर्कशता हेच आपलं जीवन झालं होतं. अती व्यस्त जीवनात आपण अडकलो होतो. सतत काम, काम आणि फक्त काम. आपण जे काही करत आहोत, ते कशासाठी आणि कुणासाठी याचा विचार करायलाही आपल्याला सवड नव्हती. दुसऱ्यासाठी
सोडाच, आपल्याकडे स्वतःसाठीही वेळ नव्हता, पण टाळेबंदीची घोषणा होताच अचानक सारे आवाज बंद झाले. त्या सकाळी रस्ते ओसाड पडले, एरवी माणसांनी गजबजणारी पायवाट सुनी झाली. कारखाने, बस स्थानके, रेल्वे स्थानके भयाण दिसू लागले आणि कोरोना गोव्यात पोहोचला नसला तरी हे वातावरण धोक्याची चाहूल देऊ लागले. बाजारपेठा मरणकळा पसरल्यासारख्या शांत होत्या. मध्येच एखाद्या पोलिसांच्या गाडीचा किंवा अॅंब्युलन्सचा आवाज शांतता भेदून जायचा.
जगभरात महायुद्धासारखी परिस्थिती होती. आपण सगळं बघत होतो. बाजारपेठा मंदावल्यामुळे गोव्यातही गरीब आणि श्रमिकांचे हाल होत होते. बिगर गोमंतकीय हजारो श्रमिक गोव्यात या काळात अडकून पडले. सरकारची मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. एका बाजूला किती श्रमिकांपर्यंत सरकारी मदत पोहोचली याची यादी वृत्तपत्रांत रोज छापून येत होती, तर दुसऱ्या बाजूला मदत मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या श्रमिकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. काहींनी आपल्या बायका-पोरांसह हजारो किलोमीटर पायी चालत आपल्या गावी परतायचा निर्णय घेतला. चोरुन कशी बशी सीमा ओलांडलेल्या अशा काही श्रमिकांना गोव्यात परत आणून सोडण्यात आले. “ना घर के ना घाट का” अशा परिस्थितीत ते अडकले.
पहिली टाळेबंदी गोव्यातही शिस्तीने पाळली गेली. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. नभातील ढगांची नक्षी पाहण्यास आपल्याला उसंत मिळाली, पण देशात दुसरी टाळेबंदी सुरू झाली आणि तरीसुद्धा कोरोनाचे हात गोव्यापर्यंत पोहोचले नसल्यामुळे काही गोष्टी सोडल्यास, सगळं काही व्यवस्थित, पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झालं. टाळेबंदी फक्त नावापुरतीच राहिली. जीवनावश्यक वस्तूंच्या नावावर गोव्याबाहेरून भंगारापर्यंत सगळं सामान गोव्यात येऊ लागलं. मालवाहू गाड्याही येऊ लागल्या. त्यात लपून-छपून लोकही येऊ लागले. व्यवसाय-धंदे व्यवस्थित सुरू झाले. खाण व्यवसायही जोरात सुरू झाला. कोरोनाने देशात धुमाकूळ घालूनही आपण ‘सुशेगाद’च राहिलो.
कोरोनाला न घाबरणाऱ्या आणि बिनधास्त जगणाऱ्या गोमंतकीयांना आपला चिनी हिसका दाखवायच्या हेतूने कोरोनाने गोमंतकीयांच्या नकळत इथे प्रवेश केला, तरी आपल्याला फरक पडला नाही. दहावी-बारावीच्या परीक्षासुद्धा हो-नाही करता करता पार पडल्या आणि सद्यस्थिती बघता कोरोनाने गोवाही शेवटी जिंकलाच म्हणायला हरकत नाही. गोमंतकीय अजूनही ते मानायला तयार नाहीत, ती गोष्ट वेगळी.
२१ व्या शतकात आज आपण जगत आहोत. आपल्याकडे प्रगत, अत्याधुनिक विज्ञान आहे याचा आपल्याला अभिमान आहे. विज्ञानाच्या बळावर आपण मोठ-मोठ्या बाता मारत असतो, पण एका छोट्याशा व्हायरसपुढे जेव्हा आपल्याला हार पत्करावी लागते, त्यावर मात करायला आपण अपयशी ठरतो, तेव्हा आपली व्यवस्था किती तकलादू आहे, ते कळून चुकते. या व्हायरसमुळे आपली सगळी व्यवस्थाच कोलमडून पडली. देशही आर्थिकरित्या हादरला.
आपण इतकी वर्षे जे अतोनात कष्ट केले, पैसा कमविला, साठविला, त्याला आज काहीच अर्थ उरला नाही. वाजीद खानसारखे बॉलिवुडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, मराठी भाषेचे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांसारखे दिग्गज जेव्हा कोरोनाच्या भक्षस्थानी पडतात, तेव्हा समजते की कितीही पैसा असला, प्रसिध्दी असली, तुम्ही केलेलं कार्य कितीही थोर असलं, तरी तुम्ही या रोगावर मात करू शकत नाही. म्हणजे आपण इतकी वर्षे जे केलं, ते व्यर्थच म्हणावं लागेल.
आपल्या बायका-पोरांना सेक्युअर्ड ठेवण्यासाठी म्हणून आपण पैशाच्या मागे धावतो. आपल्या पश्चात त्यांना कशाची चणचण भासू नये, इतकाच आपला प्रयत्न असतो. आपण किती पुढच्या विचारात गढून जातो. भविष्यात आपल्या कुटुंबाला सुख मिळावं यासाठी आपण वर्तमानात त्यांच्याबरोबर वेळ न घालवता, त्यांच्या वाट्याचं हे वर्तमानातील सुख हिरावतो, पण या व्हायरसने आपल्याला उद्याचीसुद्धा शाश्वती नसल्याचे दाखवून दिले. जे काही आहे, ते आज आहे. फक्त वर्तमान हेच सत्य आहे.
या रोगाने माणसाला माणसाशी समोरासमोर बसून संवाद साधायला शिकविले. जे आजची पिढी पूर्णतः विसरूनच गेली होती. सतत कामामुळे लोकांना आपल्या घरच्यांशीही बसून निवांत बोलायला वेळ नव्हता आणि शनिवार - रविवार मित्र-मंडळी, क्लबिंग, पार्टींग या सगळ्यात घरच्यांना गृहित धरणाऱ्या या पिढीला, आपल्या घरातही माणसे राहतात आणि त्यांच्याबरोबरही उत्तमप्रकारे वेळ घालवता येतो याची जाणीव झाली.
या काळात प्रत्येकामधल्या कलाकाराला बाहेर डोकावायची फुरसत मिळाली. व्यस्ततेमुळे आपले छंद विसरत चाललेल्यांना ते छंद पुन्हा जोपासण्याची संधी लाभली. स्वयंपाक, नृत्य, गायन, वाचन अशा कलांकडे पुन्हा वळायची संधी मिळाली. कॅरम, बॅडमिंटन, बुद्धीबळ यासारखे खेळ परत खेळले जाऊ लागले. कोरोनाने माणूस विसरत चाललेल्या भरपूर गोष्टींची त्याला आठवण करून दिली. नकळत
त्यांचे महत्त्व पटविले आणि त्याचबरोबर मानव आणि विज्ञान यांची शक्ती अजूनही किती अपुरी आहे याची जाणीव करून देत, आजच्या युगातील न भिणाऱ्या माणसाला अटळ मृत्यूचे भय दाखवले.
या परिस्थितीवर अभ्यास करून शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अभ्यासक यांनी विविध मते मांडली. डार्विनिअन थिएरीअंतर्गत समोर लेल्या ‘सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट’ या थिएरीनुसार निसर्गाचा समतोल राखण्यासाठी चाललेली ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया एखाद्या गाळणीप्रमाणे काम करते. जो माणूस खरोखर सक्षम असेल, त्याची रोग प्रतिकारशक्ती या रोगाला आपल्या शरीरातून धुडकावून लावू शकेल, तोच टिकेल. अशक्त माणूस या गाळणीतून खाली पडेल. जो वर राहील तो वाचेल.
या थिएरीनुसार सद्यस्थिती अभ्यासता, यात तथ्य आहे असं वाटतं. निसर्ग देत राहिला आणि आपण घेत राहिलो. ‘देणाऱ्याचे हात घ्यावे’ म्हणतात, त्याप्रमाणे आपण निसर्गाचा अधिकच फायदा घेतला. मोबदला द्यायचे विसरलो. निसर्गाचे उत्खनन करून आपण संसाधने घेत राहिलो, पण त्या संसाधनांच्या पुनःनिर्मितीसाठी आपण काहीच केले नाही. आपण फक्त जखमा केल्या. पट्टी बांधायची आपल्याला जरूरी नाही वाटली. म्हणूनच कदाचित आज ही वेळ आली. वेदनेने व्याकुळ झालेल्या निसर्गाचा कोप आपल्याला सोसावा लागला. आपल्या देशाचेच उदाहरण घ्या, कोरोना महामारी ही एकच आपत्ती नसून, याच काळात भूकंप झाला, चक्रीवादळ झाले, ओरीसा, प. बंगालमध्ये पूर आला, महाराष्ट्राच्या काही भागांना टोळ-धाडीला सामोरे जावे लागले आणि निसर्गाला स्वतःच स्वतःची मलमपट्टी करून घ्यावी लागली.
टाळेबंदीच्या काही दिवसानंतर लगेचच आपल्याला या मलमपट्टीचे परिणाम दिसले, पर्यावरणात सुधार झाला, प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले, पृथ्वीभोवती असलेल्या ओझोनची पातळी दिवसेंदिवस घटत होती, त्यात खंड पडला. या सगळ्या परिस्थितीवर खोल विचार करता, असे वाटते की कोरोना महामारीसाठी फक्त चीन जबाबदार आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे? या प्रश्नावर प्रत्येकाने वैयक्तिकरित्या विचार करणे गरजेचे आहे. इतकं सगळं घडूनही जर माणसाचे डोळे उघडत नसतील तर..., “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चरअ भी बाकी है मेरे दोस्त!”
– गौरी  नाडकर्णी

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com