
(तेनसिंग रोद्गीगिश)
सरस्वतीच्या तीरावर वसणाऱ्या सारस्वतांचे पुढे काय झाले, ते नंतर पुढे कुठे गेले असतील येथपर्यंत येऊन आपण गेल्या लेखात थांबलो होतो. जुन्या प्रश्नांची उत्तरे, पुन्हा नवे प्रश्न उपस्थित करत राहतात आणि हा शोधप्रवास सुरूच राहतो.
अगदी त्याकाळी आपल्या प्रवाहाने आजूबाजूचा परिसर समृद्ध करणाऱ्या सरस्वती नदीसारखा. सरस्वती नदी लुप्त झाल्यानंतर तिच्या किनारी वसणाऱ्यांचे काय झाले, हा प्रश्न जसा आज आपल्याला त्रास देतो, तसाच काही शतकांनंतर म्हादईच्या किनारी वसणाऱ्यांचे, गोवेकरांचे पुढे काय झाले, हा प्रश्न छळेल कदाचित, इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही, हेच खरे!
सारस्वतची कथा निश्चितपणे वेगाने वाहणाऱ्या वादळी सरस्वतीच्या काठावर सुरू होते, जी पर्वताच्या अडथळ्याला तोडून, वैभवात आणि इतर सर्व नद्यांना मागे टाकत, आणि ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्राब्दीमध्ये समृद्ध सभ्यतेचे पालनपोषण करते. ज्याबद्दल ऋग्वेदामधील वर्णन;
अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति ।
अप्रशस्ताइव स्मसि प्रशस्तिमम्ब नस्कृधि ॥
(सर्वोत्तम माता, सर्वोत्तम नद्यांमध्ये, सर्वोत्कृष्ट देवी, सरस्वती, आम्ही जसे असायला हवे आहोत, तसे नाही आणि माता, तू आम्हाला प्रतिष्ठा दे. (संदर्भ : ग्रिफिथ, १८८९ : ऋग्वेद, २.४१.१६) ग्रिफिथ यांनी या केलेले मंत्राचे वर्णन नदीविषयी आहे की, विदुषी-विद्वान स्त्रीबद्दल आहे, याविषयी संभ्रम आहे. सरस्वतीच्या उगमापासून ते ब्रह्मपुत्रेसोबत संगमापर्यंतचा प्रवास हा कालगणनेच्या दृष्टीनेही लांबचा प्रवास होता - कदाचित एक सहस्राब्दीहून अधिक काळ.
सरस्वती व दृषद्वती या दोन देवनद्यांच्यामध्ये जो प्रदेश आहे त्या देवनिर्मित देशास ब्रह्मावर्त असे म्हणतात. ॥ त्या देशात प्रायः शिष्ट लोकांचाच संभव असल्यामुळे तेथील ब्राह्मणादि संकीर्ण जातीपर्यंत लोकांचा परंपराक्रमाने प्राप्त असा जो आचार तोच सदाचार असे म्हटले आहे. ॥ कुरुक्षेत्र, मत्स्य देश, कान्यकुब्ज देश व मथुरेच्या आसपासचा प्रदेश हा ब्रह्मर्षि देश ब्रह्मावर्ताहून किंचित कमी योग्यतेचा आहे.
॥ या कुरुक्षेत्रादि देशात उत्पन्न झालेल्या ब्राह्मणापासून पृथ्वीतील सर्व मनुष्यांनी आपला आपला आचार शिकावा. ॥ हिमालय व विंध्याद्रि या दोन पर्वतांच्या मध्ये व सरस्वती जेथे गुप्त झाली आहे त्याच्या पूर्वेस व प्रयागाच्या पश्चिमेस जो प्रदेश आहे त्यास मध्यदेश असे म्हटले आहे. ॥ पूर्वसमुद्रापर्यंत व पश्चिमसमुद्रापर्यंत हिमालय व विंध्य यांच्यामधील जो प्रदेश त्यास ज्ञानी आर्यावर्त असे म्हणतात. (जेथे आर्य पुनःपुनः उत्पन्न होतात तो आर्यावर्त होय) ॥
ज्या ठिकाणी कृष्णसार मृग स्वभावतःच रहातो (अर्थात बळजबरीने आणून बांधलेला नव्हे) तो यज्ञिय देश होय, अशा देशांवाचून जो देश तो म्लेच्छ देश आहे; तो यज्ञास योग्य नव्हे. ॥
मनुस्मृतीच्या दुसऱ्या अध्यायातील १७ ते २३ या श्लोकांमध्ये सरस्वती नदी, आर्यावर्त, ब्रह्मावर्त, मध्यदेश यांचे भौगोलिक संदर्भ व कृष्णसार मृगांच्या अधिवासाचा उल्लेखही आला आहे. (संदर्भ : बुह्लर, १८८६ : द लॉज ऑफ मनू, अध्याय दुसरा, ३३)
मध्यदेशात ब्राह्मणदेश होता, ज्यामध्ये कुरू, मत्स्य, पांचाल आणि शूरसेनक यांचा समावेश होता. येथे धर्म आणि अध्यात्मिक ज्ञानाचे परमतज्ज्ञ लोक राहत होते, ज्यांना पुराणात अनेकदा शक्ती आणि धार्मिकतेमध्ये देवाच्या बरोबरीचे मानले गेले आहे. भृगु, अंगिरस, अत्री, विश्वामित्र, कश्यप, वसिष्ठ आणि शांडिल्य हे सात ब्राम्हण होते. येथे ‘कृष्णसार मृग’ नैसर्गिक पद्धतीने राहत होता, त्याचा अधिवास येथे होता. ‘जेथे ‘कृष्णसार मृग’ मुक्तपणे विहार करतात, तिथे आध्यात्मिक श्रेष्ठता असते’, असे प्राचीन ग्रंथ वसिष्ठ धर्मसूत्र (१. १४-१५) आणि बौद्धायण धर्मसूत्र (१.१. २९-३०) सांगतात(दोन्ही ख्रिस्तपूर्व ६०० ते ३००) (संदर्भ : काणे, १९४१ : हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, खंड दुसरा, भाग १, १४) ब्राह्मणदेशाच्या केंद्रस्थानी ब्रह्मावर्त होते. ब्रह्मावर्त या शब्दाचा नेमका अर्थ, त्याचे स्थान आणि सीमारेषा यावरून विद्वानांमध्ये मतभेद आहेत. याचा अर्थ ‘ब्रह्माची भूमी’, विशिष्ट प्रकारचे गर्भगृह, वैदिक संस्कृतीचे पवित्र स्थान, असा होऊ शकतो.
काहींना वाटते की ते ब्रह्मदेशासारखेच असावे; इतरांना वाटते की तो एक प्रदेश होता. मानव-धर्मशास्त्रातील सीमांकन ते ब्रह्मदेशाच्या बाहेर आणि नैऋत्येला दाखवते. सरस्वती आणि दृषद्वती या दोन दैवी नद्यांच्या मध्ये हे आर्यांचे मूळ घर असावे. यमुना आणि गंगा यांच्यामध्ये असलेल्या भूमीवर आर्यांनी आपले घर हलवल्यानंतर ब्रह्मावर्त हे केवळ स्मरणातच राहिले असते का? प्रयाग येथे यमुना आणि गंगा यांच्यात सामील होण्याची कल्पना करून त्यांनी त्यांच्या सरस्वतीला त्यांच्या नवीन घरी नेले या वस्तुस्थितीतून त्या गृहीतकाला बळ मिळते. एका अर्थाने, आणि खऱ्या अर्थाने, त्यांनी त्यांचे ब्रह्मावर्त एका नवीन ठिकाणी हलवले होते, परंतु तरीही त्याचे मूळ स्थान पवित्र होते. गंमत म्हणजे ते केंद्रस्थान आपल्या पूर्वाश्रमीच्या निष्कलंक, आध्यात्मिक भूमीच्या बाहेर पडले. (सांख्य धर्मसूत्र : सिंधू आणि सौविरा देशांच्या पूर्वेकडील देशातच निकलंक आध्यात्मिकता आढळते) (संदर्भ : काणे, १९४१ : हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, खंड दुसरा, भाग १, १४)
‘कृष्णसार मृगा’चे महत्त्व काय आहे? एगेलिंगच्या मते, ‘कृष्णसार मृगा’ची त्वचा ही ब्राह्मणी पूजा आणि सभ्यतेच्या प्रतीकांपैकी एक मानली जात असावी. शतपथ ब्राह्मणामध्ये ‘कृष्णसार मृगा’च्या कातडीचे महत्त्व सांगितले आहे. ‘एकेकाळी यज्ञ देवतांपासून सुटले आणि कृष्णसार मृग होऊन फिरत होते. तेव्हा देवतांना ते सापडले आणि त्यांनी ते कातडे काढून टाकले, त्यांनी ते कातडे त्यांच्यासोबत आणले’. (शतपथ ब्राह्मण खंड १, अध्याय १, ब्राह्मण ४, श्लोक १) (संदर्भ : एगेलिंग, १८८२ : शतपथ ब्राम्हण, २३).
बहुधा ब्राह्मण पूर्वेकडे जाताना यज्ञ करताना आलेल्या काही अडचणी आणि सुरक्षित परिस्थिती निर्माण करण्यात त्यांना अखेरीस आलेले यश याचा तो संदर्भ असावा. त्याचसाठी; ब्राह्मणी उपासना आणि सभ्यतेला - अग्नी आणि सोम - दोन्ही यज्ञांना केंद्रस्थानी ठेवून विचार केल्यास या कथेला महत्त्व प्राप्त होते.
कृष्णसार मृगाची कातडी ब्राह्मणाशी एकरूप झाली होती, असे क्रॅम्रिश म्हणतात. (संदर्भ : क्रॅम्रिश, १९८१ : द प्रेझेन्स ऑफ शिव, ३३८) बलिदान दिलेला कृष्णसार मृग पृथ्वीभर फिरला आणि त्यामागे धर्म त्याचे रक्षण करीत फिरला, असे विश्वरूपदर्शनावर टिप्पणी करताना याज्ञवल्क्य संहिता सांगते. पण कृष्णसार मृगाची कल्पना कोठून आली? कुरु-पांचाल हे या प्राण्याचे नैसर्गिक अधिवास होते का? बहुधा सारस्वत आणि कुरु-पांचाल ब्राह्मण कृष्णसार मृगांचा अधिवास असलेल्या भूमीत त्यांचे घर बनवण्यापूर्वीच त्यांचे मार्ग वेगळे झाले होते; सारस्वतांनी तेव्हा आपला ‘आध्यात्मिक श्रेष्ठत्वा’चा वारसा सोडला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.