रायबंदर आंदोलनाचे फलीत काय?; नागरिकांकडून प्रश्न उपस्थित

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

१६ तारखेला रायबंदरवासीयांनी सरकारला दिलेल्या मुदतीची समाप्ती होणार आहे. या आठवड्यात (१२ तारखेनंतर) आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्यास त्याची पूर्तता तत्काळ होणे अशक्य आहे. 

पणजी- रायबंदरवासियांनी पूर्णवेळ आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीदिनी राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत दिली होती. यानंतर सातच दिवसांत या विषयावर त्यांनी सत्ताधारी आमदारांची भेट घेतली. रायबंदरवासीयांच्या आंदोलनाचे नक्की फलीत काय?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जावू लागला आहे.

रायबंदरवासीयांची पूर्णवेळ आरोग्य केंद्राची मागणी रास्त आहे. परंतु महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत दिली जाते. १५ दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची भेट घेणे किती उचित होते, हे आंदोलनकर्त्यांनाच माहीत. कारण आमदारांनी भेटीवेळी आरोग्य केंद्र उभारले जाणारच, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. पण त्या मागणीची पूर्तता कधी होणार याची काही हमी मिळाली नाही. त्यामुळे १६ तारखेला रायबंदरवासीयांनी सरकारला दिलेल्या मुदतीची समाप्ती होणार आहे. या आठवड्यात (१२ तारखेनंतर) आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्यास त्याची पूर्तता तत्काळ होणे अशक्य 
आहे. 

आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग,  अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी उकरणे, वैद्यकीय अधिकारी नेमणूक यासर्व बाबींची पूर्तता आरोग्य खात्याला करावी लागेल.

सरकारी काम आणि महिनाभर थांब, असं म्हटलं जात ते उगाच नाही. परंतु रायबंदरवासीयांच्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपमधून बाजूला गेलेले नगरसवेक रूपेश हळर्णकर आणि अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी. या दोघांनाही सरकारी कामाची चांगलीच जाण आहे. त्यामुळे १५ दिवसांची मुदत संपण्यापूर्वीच आमदारांना भेटणे त्यांना कितपत उचित वाटले असावे हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी त्याच दिवशी जुने गोवा येथील कार्यक्रमात रायबंदर येथे पूर्णवेळ आरोग्य केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. पण त्यांनी किती दिवसांत होईल हे सांगितलेले नाही. 

महापालिकेची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. जर आरोग्य केंद्र झाले तर त्याचे श्रेय स्थानिक नगरसेवकाला जाईल, हे सत्ताधारी पक्षाला कितपत पटेल. त्यामुळे राजकीय विचार केला तर आणि आरोग्य केंद्र निर्माण करायचेच झाले तर आमदारांना पुढाकार घ्यावा लागेल, हे स्पष्ट आहे.

संबंधित बातम्या