कसिनोसाठी एसओपी काय?

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

कसिनो सुरू करण्याच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यपाल गोव्यात नसल्याने ते निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारले. कसिनो सुरू करण्यासाठी राज्य सरकारने कोणतीही कार्यप्रणाली जाहीर केलेली नाही.

पणजी  : कसिनो सुरू करण्याच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यपाल गोव्यात नसल्याने ते निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारले. कसिनो सुरू करण्यासाठी राज्य सरकारने कोणतीही कार्यप्रणाली जाहीर केलेली नाही. कोरोनातून स्थिती स्थावर झाल्यानंतरच ते सुरू करावेत, अशी भूमिका आज काँग्रेसने मांडली. 

दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजभवन गाठले. परंतु पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी या काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराबाहेरच अडविले. त्यांचे निवेदन राजभवनातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. याविषयी आमोणकर यांनी सांगितले की, सध्या कोरोनामुळे स्थिती बिकट झाली आहे. कसिनोंवर अनेकांचा व्यवसाय अवलंबून आहे, हे माहीत आहे. परंतु निम्म्याने लोक जरी सोडायचे झाले तरी एका कॅसिनोत दोन हजार लोक बसू शकतात, त्यामुळे कसिनो सुरू  केला जाऊ नये. 

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सन २०१५ मध्ये काँग्रेसच्या काळात कसिनो बंद करण्यासाठी राज्य सरकारला मशाल मोर्चा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. पर्रीकर यांनी कसिनोंना विरोध केला, पण सरकारात आल्यानंतर भाजपकडून त्यांना मुदतवाढ दिली जात होती. एका बाजूला राज्यातील लोकांचे सर्व कार्यक्रम बंद केले जातात आणि कसिनोंना परवानगी दिली जात असल्याबाबत आमोणकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

संबंधित बातम्या