विद्यार्थी, पालक संभ्रमात; प्रवेश परीक्षांचं काय?

विद्यार्थी, पालक संभ्रमात; प्रवेश परीक्षांचं काय?
Goa Exam

कुंकळ्ळी: ‘सीबीएसई’सह(CBSE) अनेक राज्य शिक्षण मंडळांना कोरोना महामारीमुळे(COVID-19) दहावीच्या परीक्षा(10th Exam) रद्ध करण्याची पाळी आली. गोवा शालान्‍त(Goa Board) मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, तरी बारावीच्या(12th) परीक्षा व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षांचे काय होणार? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांपुढे उभा राहिला आहे. 

बारावी नंतर विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विविध प्रवेश परीक्षांची गरज आहे. या प्रवेश परीक्षा कशा घ्याव्यात, हा मोठा यक्षप्रश्न आहे. बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रम एमबीबीएस, आयुर्वेदिक, होमिओपथी, दंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी व एन्‍ट्रन्‍स टेस्ट) ही प्रवेश परीक्षा उच्च गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) ‘नीट’ परीक्षा घेतली जाते. त्याशिवाय आयआयटी व एनआयटी या जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ‘जेईई मेन्स’ व ‘जेईई ॲडव्हान्स’ या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांना स्थापथ्य शास्त्र (आर्किटेक्चर) महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल त्यांना ‘नाटा’ (एनएटीए) ही प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी फार्मसी व राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक आहे, त्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावरील गोवा समान प्रवेश परीक्षा (GCET) देणे गरजेचे असते. बारावी विज्ञान शाखेत शिक्षणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेबरोबरच प्रवेश परीक्षेची तयारी केली आहे. मात्र, कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही? या विवंचनेत विद्यार्थी व पालक पडले आहेत. 

विद्यार्थी, पालक संभ्रमात
उपलब्ध माहितीनुसार नीट परीक्षा 1 ऑगस्‍टला घेण्याचे ठरविले आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यास ‘नीट’ परीक्षा देशभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. देशातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. गोव्यातून सुमार तीन हजार विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा देतात. ‘नीट’ परीक्षा सद्यस्थितीत घेणे शक्य होणार, असे दिसत नाही. ‘जेईई’ परीक्षा दोन टप्‍प्यांतून घेतल्या जातात. पहिला टप्पा पूर्ण झाला असून एप्रिल मध्ये होणार असलेली ‘जेईई’ प्रवेश परीक्षा बेमुदत पुढे ढकलण्यात आली आहे, तर ‘नाटा’ प्रवेश परीक्षा 11 जुलैला घेण्याचे ठरविले आहे.

गोवा समान प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक अजून ठरलेले नाही. काही विद्यार्थी गेल्या पाच वर्षांपासून, तर काही विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून प्रवेश परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र, परीक्षा पुढे गेल्यामुळे व परीक्षांचे वेळापत्रक ठरले नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांवर व पालकांवर मानसिक दबाव वाढत आहे. एका बाजूने कोरोना महामारीची भीती व दुसऱ्या बाजूने भवितव्याची चिंता अशा स्थितीत विद्यार्थी भरडत चालला आहे. परीक्षा लवकर होवो, ताटकळत ठेवू नका, अशी याचना देवापुढे करण्याशिवाय विद्यार्थी व पालकांपुढे दुसरा पर्याय नाही.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com