कायद्याचे रक्षकच कायदा मोडतात तेव्हा....

dainik gomantak
रविवार, 31 मे 2020

युवकाच्या खून प्रकरणात पोलिसच संशयित असणे ही राज्यातील आणि पेडणे तालुक्यातील पहिलीच घटना आहे.

मोरजी,

पोलिस आणि जनता यांचे संबंध चांगले राहिले, तर खाकी वर्दीतील पोलिसाला देखील जनता देवमाणूस मानते. पोलिसाविषयी जनता आपुलकीने आशेने पाहत असते. अनेक खाकी वर्दीतले पोलिस देवदूतासारखे ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या मदतीसाठी धावून येतात आणि न्याय मिळवून देतात. खाकी वर्दीतील देवमाणूस आणि माणसुकी जागृत होते अशी उदाहरणे आहेत. परंतु कायद्याचे रक्षकच जेव्हा कायदा मोडतात, तेव्हा सर्वसामान्यांनी पोलिसांकडून अपेक्षा ती काय ठेवावी असा प्रश्न सध्या दिलीप पायाजी याच्या खून प्रकरणाने उपस्थित झाला आहे.
भटवाडी - कोरेगाव येथील पाच युवकांनी मिळून मायणवाडा - कोरगाव येथील दिलीप अरविंद पायाजी या युवकावर खुनी हल्ला करून त्याला ठार मारण्यात आले. विशेष म्हणजे या खून प्रकरणात खाकी वर्दीतील कायद्याचा रक्षक समजला जाणारा सतीश नर्से हा पोलिस देखील मुख्य संशयित असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सतीश नर्से याला पेडणे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मुख्य गोष्ट म्हणजे खाकी वर्दीतील पोलिस या खुनात सहभागी होणे हे आश्चर्य आहे. एरवी पोलिस मग ते कुणीही असो रस्त्यात भांडण झाले तर ते सोडवतात. दोन्ही बाजूने समज देतात व कायद्याची भाषा सांगतात. हरमल किनारी मात्र भलतेच घडलेले पहावयास मिळाले. गावातीलच एका युवकाच्या खुनात खुद्द पोलिसाचा सहभाग असल्याने गावात खळबळ माजली आहे. शिवाय खाकी वर्दीलाही डाग लागला आहे.
पोलिस सतीश नर्से यांनी खाकी वर्दीतील पोलिसाला त्यावेळी जागृत केले असते, तर ही खुनाची घटनाच घडली नसती. उलट दोन्ही गटातील युवकांना बसवून समझोता केला असता, तर पोलिसांची शान आणखी वाढली असती. परंतु कालच्या खुनाच्या घटनेने संशयित पोलिसाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

 

संबंधित बातम्या