अपघातप्रवण रस्त्यांची डागडुजी कधी ?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

राज्यातील अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत, त्या''ची डागडुजी अजूनही झालेली नाही. हे खड्डे अपघातास निमंत्रण ठरत असतानाच गेल्या कित्येक वर्षापासून अपघातप्रवण क्षेत्रे म्हणून निश्‍चित केले गेलेल्या ६५ ठिकाणांचेही अभियांत्रिकीकरण व डागडुजीही निधाअभावी झालेली नाही.

पणजी : राज्यातील अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत, त्या''ची डागडुजी अजूनही झालेली नाही. हे खड्डे अपघातास निमंत्रण ठरत असतानाच गेल्या कित्येक वर्षापासून अपघातप्रवण क्षेत्रे म्हणून निश्‍चित केले गेलेल्या ६५ ठिकाणांचेही अभियांत्रिकीकरण व डागडुजीही निधाअभावी झालेली नाही. या अपघात प्रवण क्षेत्रात वारंवार अपघात होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

राज्यात रस्ता अपघातातील मृत्यूचे प्रमाण दरवर्षी सुमारे ३०० च्या आसपास असते. हे अपघात रोखण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्राचीही वाहतूक खाते, वाहतूक पोलिस तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत तपासणी केली जाते. वारंवार घडणाऱ्या या अपघात प्रवण क्षेत्राचाही पंचनामा होतो. मात्र, त्यानंतर त्याचे पुढे काहीच होत नाही. एका दशकापूर्वी गोवा वाहतूक पोलिसांनी मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकारी पसरिचा यांची मदत घेतली होती. त्यांनी गोव्यातील रस्त्याच्या अभ्यास करून सुमारे १०० अपघात प्रवण क्षेत्रे डागडुजी करण्याची शिफारस केली होती. त्यातील काही अपघात प्रवण क्षेत्रे बगल मार्गामुळे कमी झाली मात्र उर्वरितांच्या डागडुजीबाबतची फाईल निधी नसल्याने ती सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये धूळ खात पडून आहे. पेडणे - मालपे येथील वळणावर अनेकदा अवजड वाहनाच्या चालकांचे उतरणीवर नियंत्रण जाऊन भीषण अपघात घडण्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या हा रस्ता महामार्ग विस्‍तारीकरण कामात असल्याने त्यातील अपघात प्रवण क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. ही अपघात प्रवण क्षेत्राच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आलेले नाही.

उत्तरेत ३४, दक्षिणेत ३१ अपघातप्रवण क्षेत्रे
वाहतूक पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अपघात प्रवण क्षेत्र तसेच वारंवार अपघात घडलेली ठिकाणे मिळून सुमारे ६५ जागा आहेत. त्यातील ३४ ही उत्तर गोव्यात तर ३१ दक्षिण गोव्यात आहेत. त्यातील ३१ ठिकाणे ही वारंवार अपघात घडलेली आहेत. तेथील जागांची तपासणी करून आवश्‍यक असलेली डागडुजी व अभियांत्रिकरणाबाबत निर्णय झाला आहे. मात्र, अजून त्याचे काम सुरू झालेली नाही. सध्या कोविड महामारीमुळे राज्याची अर्थव्यवस्थाच बिकट असल्याने या कामाच्या फाईल्स सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याने बाजूला ठेवल्या आहेत व प्राधान्य असलेली कामेच हाती घेण्यात येत आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने दिली.
 

संबंधित बातम्या