माशेल बसस्थानक बहुउद्देशीय कधी होणार?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

माशेल यथील बहुउद्देशीय बसस्थानकाचे दोन वेळा उद्‍घाटन झाले, पण अद्याप या बसस्थानकाचा बहुउद्देश साध्य झाला नाही. बसस्थानकाचे ग्रामस्थांतर्फे एकदा उद्‍घाटन झाले, त्यानंतर शासकीय पातळीवर दुसऱ्यांदा उद्‍घाटन झाले. त्यानंतर बसस्थानकावरून काही बसेस-ये-जा करतात. याशिवाय या बसस्थानकात इतर कोणत्याही सुविधांचा लाभ प्रवाशांना होत नाही. कारण सर्व कार्यालये, दुकाने बंद आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ या बसस्थानकाच्या इतर सुविधांपासून वंचित आहेत.

खांडोळा:   माशेल यथील बहुउद्देशीय बसस्थानकाचे दोन वेळा उद्‍घाटन झाले, पण अद्याप या बसस्थानकाचा बहुउद्देश साध्य झाला नाही. बसस्थानकाचे ग्रामस्थांतर्फे एकदा उद्‍घाटन झाले, त्यानंतर शासकीय पातळीवर दुसऱ्यांदा उद्‍घाटन झाले. त्यानंतर बसस्थानकावरून काही बसेस-ये-जा करतात. याशिवाय या बसस्थानकात इतर कोणत्याही सुविधांचा लाभ प्रवाशांना होत नाही. कारण सर्व कार्यालये, दुकाने बंद आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ या बसस्थानकाच्या इतर सुविधांपासून वंचित आहेत.

माशेल बसस्थानक मध्यवर्ती असल्यामुळे साखळी, वाळपई, पणजी, फोंडा, मडगाव, वास्कोपर्यंत धावणाऱ्या बसेस येतात-जातात. परंतु अद्याप येथून आंतरराज्य बसेस धावत नाहीत. अपवाद म्हणून मडगावहून बेळगावला दोन बसेस धावत होत्या. टाळेबंदीनंतर ही सुविधाही बंदच आहे. अनमोड घाट रस्ता बंद असल्यामुळे हुबळी, धारवाड, बेळगावला जाणाऱ्या बऱ्याच गाड्या माशेलातून जातात. पण त्यापैकी एकही गाडी बसस्थानकात येत नाही. त्यामुळे प्रवाशांना गोव्याबाहेर जाण्यासाठीसुद्धा बसस्थानकाबाहेरच बसची वाट पाहत उभे राहावे लागते. माशेल बसस्थानकाबाहेरच्या एकाही बस थांब्यावर विशेष शेडची व्यवस्था नाही.

बसस्थानक प्रकल्पात पार्किंगची  सोय झाल्याने काही प्रमाणात माशेलातील पार्किंगचा प्रश्न निकालात निघाला आहे. परंतु मासळी मार्केट मूळ ठिकाणी असल्यामुळे तेथे काही लोक  सकाळच्या वेळी वाहने ठेवतात, त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होते. या प्रकाराकडे पोलिसांचेही दुर्लक्ष 
होते.

बसस्थानकावर बेळगाव, हुबळी, सावंतवाडी, बेंगळूर, मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या बसेससाठी खास व्यवस्था केली आहे. तशा प्रकारचा फलकही लावला आहे. परंतु अद्याप ही व्यवस्था बंदच आहे. शिवाय गोव्यातील इतर ठिकाणीही जातानासुद्धा बसेस बदलत जावे लागते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रंथालयाची प्रतीक्षा
या बसस्थानकावर ग्रंथालय सुरू करण्यात येणार होते. पण अद्याप कोणतीही सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. माशेलात असलेल्या दोन्ही छोट्या ग्रंथालयात जागा अपुरी असल्यामुळे वाचकांना बसणे, वाचन करणे अडचणीचे होते. त्यामुळे माशेल पंचक्रोशीतील वाचकांना प्रशस्त ग्रंथालयाची आवश्यकता आहे. बसस्थानक प्रकल्पात सध्या जागा उपलब्ध आहे. ग्रंथालयासाठी राखीव जागा ठेवूनही अद्याप ग्रंथालयाचा प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आले आहे.

आरक्षण सुविधा
मडगाव, फोंडा, पणजी, वास्को, वेर्णा, साखळी, वाळपई, बेळगाव, कोल्हापूरला थेट जाण्यासाठी येथून थेट गाड्या सुरू करणे शक्य आहे. त्यासंदर्भात फलकही लावले आहेत. पण अद्याप आरक्षण सुविधा उपलब्ध नाही. कार्यालयही पूर्ण क्षमतेने सुरू केले नाही. त्यामुळे प्रवाशांना या सोयीसाठी पणजी, फोंड्याला जावे लागते.

मासळी मार्केट बंदच
भाजी मार्केटचे उद्‍घाटन करण्यात आले. तेथे स्थानिक भाजी विक्रेते बसतात. त्यामुळे भाजी बाजार चांगल्या प्रकारे सुरू आहे. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. बाजारात इतरत्र बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात बाजार रस्त्यावरची गर्दी कमी झाली. परंतु मासळी मार्केटचे स्थलांतर न झाल्यामुळे तेथे सकाळी गर्दी कायम आहे. मासळी मार्केटमधील विक्रेत्यांच्या काही समस्या आहेत. त्या सोडविल्यास बाजारातील गर्दीचा प्रश्न निकालात निघेल. त्यासाठी पंचायत मंडळाने कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

दुकांनासाठी लिलाव
बहुउद्देशीय बसस्थानक प्रकल्पात दुकानांची संख्याही मोठी आहे. पण अद्याप या दुकानांचे वाटप केले नसल्याने तेथे कोणालाही व्यवसाय सुरू करता येत नाही. गेल्या चार दिवसापूर्वी या दुकाने लिलावाद्वारे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु या दुकानासंदर्भात विविध अटी व नियम आहेत. त्यानुसार किती स्थानिकांना दुकान मिळतील व ती पुढे कशी चालतील हा प्रश्नच आहे

 

संबंधित बातम्या