बसवाल्यांसाठीची करमाफीची योजना कुठे?

प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

वाहतूक खात्याने हात झटकले : सरकारने भूमिका स्पष्‍ट करावी; व्‍यावसायिक संकटात

फोंडा: कोरोनाच्या महामारीमुळे टाळेबंदीचे शुक्‍लकाष्ट सर्वच व्यवहारांच्या मागे लागल्याने अजूनही बऱ्याच व्यावसायिकांना रोजीरोटी कमावणे शक्‍य झालेले नाही. अनेक उद्योगांबरोबरच स्वयंरोजगार करणाऱ्यांनाही सध्या कुटुंब चालवणे कठीण बनले आहे. रोजगारच नाही, तर खायचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनामुळे बुडीत गेलेल्या व्यवसायात खासगी बसवाहतुकीचा समावेश असून बसमालक, बसचालक व बसवाहक सध्या डोक्‍याला हात लावून बसले आहेत. राज्यात प्रवासी वाहतूक सुरू झाली असली तरी फक्त तीस टक्केच बसगाड्या रस्त्यांवर आहेत, उर्वरित बंदच आहेत. दरम्यान, प्रवासी बसगाड्यांचा कोरोना काळातील कर माफ करण्याचे सरकारने जाहीर केले, तरी अजून प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे सरकारच्या घोषणा काय हवेतच असा सवाल करण्यात येत आहे.

फोंडा बसस्थानकावरून मडगाव, सावर्डे, पाळी, साखळी, तिस्क उसगाव, धारबांदोडा तसेच मडकई, वळवई, केरी, माशेल आदी भागात खाजगी प्रवासी बसगाड्या चालतात. या मार्गावर कदंबच्या बसगाड्या असल्या तरी त्या कमी असल्याने खाजगी बसगाड्यांवरच प्रवाशांना विसंबून रहावे लागते. कोरोनाच्या महामारीमुळे प्रवासी बसगाड्यांवर बरेच निर्बंध आले आहेत. प्रवाशांकडून एकमेकाला संसर्गाची बाधा पोचू नये यासाठी प्रवाशांची संख्याही निर्धारित करण्यात आली आहे. 

मात्र पुरेसे प्रवासी नसल्याने बसचालकांना इंधनाचा खर्चही मिळत नसल्याच्या तक्रारी बसवाल्यांकडून करण्यात येत आहेत. 

काही जणांनी तर नोकऱ्या नसल्याने स्वयंरोजगार म्हणून प्रवासी वाहतुकीचा धंदा स्विकारला होता. त्यासाठी बॅंकांकडून कर्ज घेऊन बसगाड्या आणल्या, मात्र आता कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, या विवंचनेत हे लोक असून बॅंकांकडे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तगादा लावला जात असल्याचे समजते. 

फोंडा तालुक्‍यात बहुतांश बसगाड्या बंदच आहेत. इंधन खर्च त्यातच चालक व वाहकाचा पगार भागवणे आणि मुख्य म्हणजे वाहतूक खात्याचे प्रवासी, रस्ता, विमा तसेच इतर कर भरणे शक्‍यच नाही. गाडीचा खर्चही त्यातून भागणे कठीण बनल्याने बसगाड्या बंदच ठेवल्या गेल्याची प्रतिक्रिया अनेक बसवाल्यांनी व्यक्त केल्या. 
दरम्यान, राज्य सरकारने कोरोना काळात बसवाल्यांसाठी करमाफी तसेच इंधनाच्या खर्चात अनुदान आदी अनेक घोषणा केल्या होत्या, मात्र त्या हवेतच विरल्या असल्याचीही कडवट प्रतिक्रिया बसवाल्यांनी व्यक्त केली आहे.

आश्‍वासनाची पूर्तता करावी...
कोरोना काळात प्रवासी बसगाड्या बंदच ठेवण्यात आल्या होत्या. प्रवासी वाहतूक सरकारने बंद केल्याने बसचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला, त्यावेळेला सरकारने वाहतूक खात्याच्या माध्यमातून बसवाल्यांना दिलासा देण्यासाठी करमाफीची घोषणा केली होती. मार्चनंतर सप्टेंबरपर्यंत प्रवासी व इतर करात माफ केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले असले तरी अजून वाहतूक खात्याकडून त्यासंबंधीचे कोणतेच परिपत्रक काढण्यात आलेले नाही. वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, ते फक्त तोंडी आश्‍वासन, लेखी काहीच नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे बसवाले धास्तावले आहेत. काही बसवाले त्याही स्थितीत प्रवासी व इतर कर भरत आहे, तर काही बसवाल्यांनी या काळातील प्रवासी व इतर कर भरलेला नाही, त्यामुळे वाहतूक खात्याच्या संचालकांनी याप्रकरणी काय ते स्पष्ट करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

 

संबंधित बातम्या