आजपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरु

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

 राज्यातील पालिकेतील पाच वर्षांची सत्ता आज संपुष्टात आली उद्यापासून पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरु होणार असल्याने कुडचडे पालिकेचे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी खास पत्रकार परिषद घेऊन आपल्याला पंधरा महिन्यात ज्या कुणी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार मानले.

कुडचडे : राज्यातील पालिकेतील पाच वर्षांची सत्ता आज संपुष्टात आली उद्यापासून पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरु होणार असल्याने कुडचडे पालिकेचे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी खास पत्रकार परिषद घेऊन आपल्याला पंधरा महिन्यात ज्या कुणी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार मानले. यावेळी त्यांच्या सोबत पालीकाधिकारी अजय गावडे उपस्थित होते. 

    पालिकेची राजवट ५ नोव्हेंबर २०१५ रोजी सुरु झाली अन आज ४ रोजी सत्ता संपुष्टात आली. या पाच वर्षांच्या कालावधीत २७ जुलै २०१९ पासून ते आज पर्यंत पंधरा महिने नगराध्यक्ष म्हणून कार्य करण्यासाठी संधी प्राप्त झाली. या काळात आपल्याला सदैव साथ देणारी आपली पत्नी, आमदार आणी वीजमंत्री निलेश काब्राल, आपल्या आई वडिलां सारखे आणी भाऊ बहिणी प्रमाणे आपल्या प्रभागातील मतदारांनी पाच वर्षात जे सहकार्य दिले त्याला तोड नसून त्यांचे आभार मानण्यास शब्द नाही. 

       पालिका कारभार चालविताना पालिकाधिकारी अजय गावडे यांच्या सारखा निःस्वार्थ आणी भ्रष्टाचारा पासून अलिप्त अश्या अधिकाऱ्याची योग्य साथ आणी सदैव शिकण्या सारखे खूप मार्गदर्शन लाभले. चार ठिकाणी कामाचा ताबा आहे. त्यात कोविडची महामारी यातून वेळ काडीत कोणतेही काम व कुठल्याही नगरसेवकाची तक्रार येऊ न देता कामे हातावेगळी करणारा असा निष्कलंक अधिकारी मिळाला.  नगरसेवक आणी खास करून माजी नगराध्यक्षांनी आपल्याला नेहमीच चांगले मार्गदर्शन केले. पालिका कर्मचारी, अधिकारी, सामान्य कामगार वर्गाने चांगली सेवा दिली म्हणून आज कुडचडे भागात सर्वाना मान सन्मान मिळत आहे. आठवणीत राहण्या सारखे काम म्हणजे मोडकळीस आलेले मासळी मार्केटचे नूतनीकरण करून त्याचे लोकार्पण केले. उघड्यावर, उना, पावसात बसून मासळी विक्री केली जायची आज त्यांना सावली प्राप्त झाल्याचे समाधान मिळत आहे. आगामी दिवाळी आणी नाताळ सणाच्या मतदारांना हार्दिक शुभेच्छा नगराध्यक्षांनी  व्यक्त केल्या. 

 परत निवडणुकीला सामोरे जाणार काय असा प्रश्न विचारले असता जनतेला जर आपल्यापेक्षा चांगला प्रतिनिधी मिळाल्यास त्याची निवड करू शकतात. आपल्या जनतेला आपले कार्य भावले असल्यास जनता ठरविणार पुढे काय करावे ते असे त्यांनी उत्तर दिले  
 यावेळी पालिकाधिकारी अजय गावडे म्हणाले की पालिकेत कार्य करताना आपल्याच विचारांचा नगराध्यक्ष मिळाला. कोणतीही अपेक्षा नसलेली माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा जनतेची कामे करण्यासाठी मदत मिळते. आम्ही दोघेही एकमेकां कडून शिकून घेत असे. एक समाधान मिळाले पालिका मंडळ आणि अधिकारी यांच्यात वादविवाद किंवा तंटे निर्माण झाले नाही. आमदार निलेश काब्राल यांनीही पालिकाधिकारी म्हणून आपल्याला चांगले सहकार्य केल्याचे सांगून  पालिकाधिकाऱ्यानी  पालिका मंडळाला शुभेच्छा दिल्या. 

संबंधित बातम्या