विरोधकांना नेमके कुणाचे बळ?

Screen-Shot
Screen-Shot

अवित बगळे

पणजी :

सत्तरीतील ‘आयआयटी’ला विरोध होऊ लागला आहे. त्या विरोधाला काँग्रेस, आम आदमी पक्ष या विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळणे साहजिक आहे. पण, या आंदोलनाला सत्ताधारी भाजपमधील एका मोठ्या गटाचा सुप्त, पाठिंबा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यापैकी एका नेत्याने या आंदोलनाला पाठिंबा वा विरोध न करता केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावलेल्या एका उच्चशिक्षित युवकाची भेट घेऊन आम्ही आपल्यासोबत आहोत, असा ठाम ‘शब्द’ दिला आहे.
सरकारने कष्टकरी समाजाची जमीन सरकारी प्रकल्पांसाठी ताब्यात घेता कामा नये. सरकारला शक्य असेल, तर सरकारने जनतेला जमीन द्यावी. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय तत्वानुसार या समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात कसे सामावून घेता येईल, याची उपाययोजना सरकारने करणे जरुरीचे आहे. सरकारने त्यांच्यावर बळाचा प्रयोग करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये, असे या गटाला वाटते. सध्या हा गट सत्ताधारी पक्षात सुप्तावस्थेत असून योग्यवेळी आपली ताकद दाखवून देण्याचा त्याचा इरादा आहे.

‘निष्‍ठे’वरच आला
संशय आणि...
सत्तरीतील राजकीय समीकरणे विधानसभा निवडणुकीआधी बदलतील. भाजपसोबत आज असलेल्यांच्या निष्ठा त्यावेळी नसतील, असे गृहित धरून पर्यायी नेतृत्वाचा शोध ‘शब्‍द’ देणाऱ्या या गटाकडून घेतला जात आहे. सरकारमध्ये आमचे कोणीही असू, पक्ष आम्हाला राखला पाहिजे, अशी भूमिका घेत या गटातील काही ज्येष्ठांनी ही पर्यायी नेतृत्वाची चाचपणी आपल्याच पातळीवर सुरू केली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले १० आमदार परत जातील वा भाजपच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवणे नाकारतील, असे या गटाला वाटते. त्याशिवाय भाजपमधील एक मोठा गट सत्तेच्या महत्त्वाकांक्षेमुळे भाजपपासून दूर जाईल, अशी शक्यता गृहित धरून हा गट वावरू लागला आहे.

अन्‍यायाविरोधात आवाज उठवा...
या गटातील एका नेत्यानेच सत्तरीतील युवकांना अन्यायाविरोधात आवाज उठवायलाच हवा, असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच सरकारी प्रकल्पाविरोधात सत्तरीत आवाज उठू लागला आहे. येत्या काही दिवसांत त्या आंदोलनाला आणखी बाह्य बळ प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत पाठिंबा व्यक्त केला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पोलिस दडपशाहीचा जाब विचारला यामुळे आता सरकारविरोधाचे प्रतीक म्हणून शेळ - मेळावलीच्या आंदोलनाकडे पाहिले जाणार आहे. जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणूक जवळ आली की त्याची तीव्रता जाणवणार आहे.

लोबोंचे साळगावकर यांना आव्‍हान
एकाबाजूने सत्तरीत शह काटशहाचे राजकारण सुरू असतानाच ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी शरसंधान सुरू ठेवले आहे. साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पास आपण मंत्रिपदी असताना केलेला विरोध दाबला गेला, असे साळगावकर यांनी म्हणताच लोबो यांनी त्यांना पुन्हा साळगावमधून निवडून येण्याचे आव्हान दिले आहे. आपणच आमदार विनोद पालयेकर व साळगावकर यांचा भाजप प्रवेश रोखल्याचे सांगणाऱ्या लोबो यांनीच आम्हाला निवडून येण्यास मदत केली होती, असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर लोबो यांनी साळगावकर यांना लक्ष्य करणे सुरू केले आहे.

गोवा फॉरवर्डच्‍या भूमिकेकडे लक्ष
या साऱ्यामागे केवळ मूळ भाजपच्याच आमदारांना मंत्री करा, याबाबतची जाहीर वाच्यता न केलेल्या काही आमदारांच्या मागणीचे कारण असल्याचे सांगण्यात येते. मंत्रिमंडळ फेररचना केली तर स्थैर्यासाठी गोवा फॉरवर्डचे दोन आमदार दिमतीला घ्यावेत, असा भाजपमधील काहींचे म्हणणे आहे. त्याला लोबो विरोध करीत आहेत. अखेर पक्षाकडून त्याची दखल घेतली गेल्यानंतर लोबो यांनी पक्षात कोणाला घेणारा, न घेणारा मी नव्हे, तो निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि संघटनमंत्री सतीश धोंड घेतात, असे सांगितले होते. लोबो यांची राजकीय खेळ्यांपासून नामानिराळे राहण्याची ही खेळी यशस्वी होणार का? की गोवा फॉरवर्डकडून त्यांचा पोलखोल होणार हे लवकरच समजणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com