खंडित वीजपुरवठ्याचा ऑनलाईन शिक्षणाला ब्रेक!

प्रतिनिधी
रविवार, 16 ऑगस्ट 2020

कालेवासीय त्रस्‍त : वीज अभियंत्‍यांवर प्रश्‍नांचा भडिमार : कर्मचाऱ्यांची बदली करण्‍याची मागणी

कुडचडे: काले पंचायत क्षेत्रातील दररोजच्या विजेच्या लपंडाव समस्येला वीज खात्याचे कर्मचारी जबाबदार असून त्‍यांची अन्‍य ठिकाणी बदली करावी, अशी मागणी काले ग्रामस्थांनी पंचायतीत घेतलेल्या बैठकीत केली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, कालेचे सरपंच किशोर गांवस देसाई, उपसरपंच बाबलो खरात पंच सदस्य सुरज नाईक, विराज वेरेकर, बापू शेळको, जिमी रेकडो, श्रद्धा बोरकर, वीज खात्याचे अभियंता दिनेश गोम्स व स्थानिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

या बैठकीला मोठ्या संख्येने विद्यार्थीही उपस्थित होते. त्यांनी विजेच्या समस्येवर मंत्री पाऊसकर यांना निवेदन दिले. ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित वीज अभियंत्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

 सरपंच किशोर गावस देसाई यांनी सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू केली असून काले गावात वीज पुररवठा खंडित झाल्यावर मोबाईलचे नेटवर्कही (रेंज) जात असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा लाभ कसा घ्यावा, असा मुद्दा मांडला. वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार हे नित्याचेच झाले असून यामुळे पंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे गावस देसाई म्हणाले. वीजमंत्री निलेश काब्राल यांनी लक्ष घालून समस्‍या सोडवावी, अशी मागणी केली. 

काले वीज केंद्रात सध्या ११ वीज कामगार असून यापूर्वी या केंद्रात केवळ तीनच वीज कामगार होते. त्यावेळी योग्य पद्धतीने काम होत होते. आता ११ कामगार असूनदेखील खंडित वीज समस्‍या सोडवू शकत नाही, असे सरपंच गावस देसाई यांनी सांगितले. 

काले पंचायत क्षेत्राला शेळपे सांगे फिडर वरून वीजपुरवठा होत असतो. त्यामुळे कालेत वीज पुरवठा खंडित झाल्यावर दाभाळ किंवा पंटेमळ फिडरवरून वीज देउन कालेतील वीजपुरवठा सुरळीत करण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. गणेश चतुर्थी उत्सव जवळ आला असून यावेळी तरी सुरळीत वीजपुरवठा व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

मंत्री दीपक पाऊसकर यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाइल नेटवर्कही जात असल्याच्या मुद्द्यावर येत्या आठवड्यात बीएसएनएलच्या व्यवस्थापकांशी बोलणी करून जनरेटरची व्यवस्था करू असे सांगितले. काले गावात एकूण २८ ट्रान्सफॉर्मर असून त्यातील ३ मध्ये बिघाड झाला असून लवकरच हे तिन्ही ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येतील, असे पाऊसकर म्हणाले. राज्यात ९० टक्के बंच केबल या नवीन वीजपुरवठा यंत्रणेचे काम पूर्ण झाले असून काले पंचायत क्षेत्रात घातलेल्या बंच केबलमध्ये काही ठिकाणी बिघाड झाला असून त्याठिकाणी भूमीगत केबल टाकण्यात येईल पण त्यासाठी १० महिन्याचा अवधी लागेल असे पाऊसकर म्हणाले. येत्या आठवड्यात वीज मंत्री काब्राल यांना घेऊन सावर्डे मतदारसंघातील सातही पंचायतीना भेट देणार असून यावेळी कालेवासीयांनी सर्व वीजसमस्या थेट त्यांच्यापुढे मांडाव्या असे सांगितले. कामचुकार वीज कामगारांबद्दल बोलताना ते म्हणाले की काले वीज केंद्रातील ११ वीज कामगारांविषयी तक्रार असल्याने त्यांची बदली इतरत्र करण्यावरही मंत्री काब्राल याच्यांकडे आपण बोलणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या