‘कोणाच्या स्वार्थासाठी गोव्याला का विकले’

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

कोळसा वाहतुकीचे परिणाम सहन करण्यासाठी आपण स्वतः सहकुटुंब कोळसा वाहतूक लोहमार्गाच्या आवारात अथवा परिसरात राहायला तयार आहात काय, अशी जाहीर विचारणा आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्रकार परिषदेत केली. कोणाच्या स्वार्थासाठी गोव्याला का विकले ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असेही ते म्हणाले.

पणजी : कोळसा वाहतुकीचे परिणाम सहन करण्यासाठी आपण स्वतः सहकुटुंब कोळसा वाहतूक लोहमार्गाच्या आवारात अथवा परिसरात राहायला तयार आहात काय, अशी जाहीर विचारणा आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्रकार परिषदेत केली. कोणाच्या स्वार्थासाठी गोव्याला का विकले ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असेही ते म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पाच प्रश्नांची उत्तरे प्रत्येक गोमंतकीयाला द्यायलाच हवीत. लोहमार्गाचे दुपदरीकरण प्रकल्पाला मान्यता देण्याआधी गोमंतकीयांना का विचारले नाही. लोकांना असे वाटते आहे की या प्रकल्पामुळे गोवेकरांना काहीही फायदा होणार नाही. या प्रकल्पामुळे गोमंतकीय जनतेला होणारा एकतरी फायदा सांगता येईल का. गोमंतकीयांचे गोवेकरांचे हित पायाखाली तुडवून त्यांचा जीव आणि आरोग्य धोक्यात घालून दिल्लीतील भाजप नेत्यांचे आदेश मानण्यात धन्यता का दाखविली?  तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला गोवेकरांची पर्वा नाही, असे म्हणावे का. कोळसा हाताळणी करणाऱ्यांसोबत तुमचा काय संबंध आहे? भाजपचे त्यांच्याबरोबर काय संबंध आहेत? गेल्या पाच वर्षात त्यांनी पक्षाला किती देणग्या दिलेल्या आहेत या प्रश्नाची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत. 

 कालची निदर्शने हा केवळ ट्रेलर होता. आमची चळवळ अजून वाढत जाणार असून काहीही झाले, तरीही "आप"चे स्वयंसेवक म्हणून आमच्या हक्कांसाठी आम्ही कुठल्याही दिशेने प्रयत्न केल्याशिवाय सोडणार नाही. गोवा हा गोमंतकीयांसाठी आहे आणि आम्ही सरकारला याची निरंतर आठवण करून देत राहणार आहोत. आम आदमी पक्ष गोव्याच्या लोकांबरोबर सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये व कठीण प्रसंगांमध्ये खंबीरपणे उभा राहणार आहे आणि यापुढेही खंबीरपणे गोमंतकीयांच्या पाठीशी उभा असेल असेही ते बोलले.

संबंधित बातम्या