Fire in Goa: म्हादई अभयारण्यात वणवा

साट्रे गड, जंगल जळून खाक : वन खाते, ‘अग्‍निशमन’चे प्रयत्‍न तोकडे
Fire in Goa
Fire in GoaDainik Gomantak

म्हादई अभयारण्यातील नगरगाव-सत्तरी पंचायत क्षेत्रातील साट्रे गावामधील क्रांतीवीर दीपाजी राणेंचा गड म्हणून प्रसिद्ध असलेले जंगल वणव्यामुळे आग लागून जळून खाक झाले आहे. शेकडो हेक्टरवर पसरलेल्या या आगीत दुर्मीळ जैवविविधता नष्ट झाल्याची भीती आहे.

तसेच काही बागायतगारांचे काजू पिकही भस्मसात झाले असून लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग कोणी लावली की लागली? याबाबत संशय आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जंगल जळत असताना आगीवर लक्ष ठेवणारे ‘फायर वॉचर’, वनाधिकारी कुठे होते? असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, साट्रे गावापासून काही अंतरावर साट्रे  क्रांतीवीर दीपाजी राणे गड आहे. गडाच्या पायथ्याशी शेतकऱ्यांची काजू पिकाची बाग आहे. शनिवारी संध्याकाळी अचानक गडावर आग लागल्याचे साट्रेवासीयांच्या निदर्शनास आली.

त्यांच्या मते, ही आग कदाचित सकाळी लागली असावी. आग गडावरून पसरत सायंकाळपर्यंत पायथ्याशी असलेल्या काजू पिकापर्यंत आली.

त्यामुळे आगीचे लोट दिसू लागले. आज रविवारी आगीची माहिती समजताच साट्रेचे लोक, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, ट्रेकर्स वर्गाने गडाच्या ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यासाठी धाव घेतली. तसेच वाळपई अग्निशमनच्या दलालाही पाचारण केले. दलाच्या जवांनानी रात्रीपर्यंत मदत कार्य केले.

गत 24 तासांत आगीचे 81कॉल

राज्यात आगीच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीत, असे चित्र आहे. कारण मागील चोवीस तासांचा विचार केला तर 85 कॉल अग्निशमन दलाकडे आले. त्यातील 81 कॉल आगीशी निगडीत, तर इतर 4 तत्काळ कॉल असल्याचे नोंदले आहेत.

त्याशिवाय मागील 56 तासांत म्हणजेच3 मार्च ते 5 मार्च दुपारी 3 पर्यंतच्या एकूण 56 तासांत एकूण १७७ कॉलची नोंद झाली आहे. 177 कॉलपैकी 163 कॉल हे आगीशी निगडीत होते. यामध्ये सर्वाधिक १७ टक्के कॉल हे मडगावमधून आले. या सर्व घटनांमध्ये ३४ लाखांची मालमत्ता हानी झाली आहे.

भूस्खलनाची भीती

साट्रे गावात २०२१ साली पावसाळ्यात डोंगर भागात भुस्खलन होऊन सुमारे दोन किलोमीटरचा भाग गाडला गेला होता. दोन वर्षानंतर आता आगीची नवीन घटना घडली आहे. हा परिसर म्हादई अभयारण्यातील आहे.

चोर्ला घाटातही आग

म्हादई अभयारण्यात लागलेल्या आगी आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असतानाच आज चोर्ला घाटातही आग लागली आहे.

ही आग विझवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वन खात्याचे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी कार्यरत होते. मुख्यालयाकडून अधिकच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आल्याची माहिती आहे. ही आगही आटोक्यात येणे अवघड असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Fire in Goa
World Table Tennis: नव्या दमासमोर अनुभव भारी, लिआंग जिंगकुनला विजेतेपद

800 काजू कलमे खाक

पर्ये : श्री सातेरी देवस्थानची रावण-सत्तरीतील देवसू येथे सर्व्हे क्रमांक १/१ मध्ये शेतजमीन आहे. पैकी ४ एकरमध्ये आग लागून बागायतीमधील ८०० काजू कलमे आणि काजूची झाडे जाळून खाक झालीत. सध्या काजू पिकाला सुरवात झाल्याने उत्पन्न मिळत होते. तसेच रोपे जळाल्याने ती मरून गेली असून काजू लागवड नष्ट झाली आहे. देवस्थानला आर्थिक उत्पन्न देणारे ही बाग एक महत्त्वाची घटक होती.

Fire in Goa
Calangute Crime News: कॅप्टन केबिन शॅक मारहाण प्रकरणी नऊ अल्पवयीन मुलांसह एकाला अटक, हल्ल्याचे हत्यारही केले जप्त

झाडे, दगड घरंगळत खाली

1 सध्या वातावरणात बरीच उष्‍णता वाढली आहे. जंगलात उन्हात कडकडीत सुकलेला पालापाचोळा असल्याने आग वेगाने पसरली. यात दीपाजी राणेंचा उंच उभा गड संपूर्णपणे जळला आहे.

2 माजी पंच सदस्य लक्ष्मण गावस यांनी सांगितले, की साट्रेतील अर्जून केरकर, नरेश केरकर, कृष्णा गावकर, कृष्णा गावस आदींच्या काजू बागायतीत गडावरील आग पसरत पोहोचून प्रचंड नुकसान झाले आहे. 

3 रविवारी गडावरून जळालेली मोठमोठी झाडे, मोठे जळके दगड पायथ्याशी कोसळत होते. त्यामुळे लोकांना पायथ्याथी आणि आग आटोक्‍यात आणण्‍यासाठी जाता आले नाही.

4 ही आग विझली नाही तर जवळील भागातील जंगलात देखील पसरण्याची भीती आहे. इतर हानी होऊ नये म्हणून वेगाने बचावकार्य करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com