गोव्याच्या मंत्रिमंडळात दामू नाईकांना मंत्रिपद मिळणार?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडगावात येऊन आगामी सरकारात दामू मंत्री असतील, असे जाहीर केले होते.
Damu Naik News, Goa Cabinet News
Damu Naik News, Goa Cabinet News Dainik Gomantak

गोवा: भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कुणाला काय पद मिळणार, याची चर्चा रंगू लागली आहे. फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक यांच्या वाढदिनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडगावात येऊन आगामी सरकारात दामू मंत्री असतील, असे जाहीर केले होते. दुर्दैवाने दामू हरले आणि मंत्रिपद हातातून निसटले. आता दामूला काही वजनदार पद मिळणार का? असे त्यांचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. की पुन्हा खिळखिळे झालेले रवींद्र भवनच त्यांच्या वाटेला येणार? ∙∙∙ (Damu Naik news updates)

Damu Naik News, Goa Cabinet News
पर्येतील पाणी प्रश्न तात्काळ सोडवा!

गणेश गावकरांना हुरूप

सुभाष फळदेसाई यांची उपसभापतिपदी वर्णी लागल्यावर सर्वांत खूष कोण झाले असतील तर ते सावर्डे येथील आमदार गणेश गावकर यांचे समर्थक. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळावे, यासाठी सुभाष आणि गणेश या दोघांनीही फिल्डिंग लावली होती. रेजिनाल्ड यांना उपसभापती पदाचा अर्ज भरण्यास लावून सुभाष यांच्यासाठी मार्ग मोकळाही केला होता. पण शेवटी रेजिनाल्ड यांनी सुभाषरावांना कट मारलाच. त्यामुळे आता मंत्रिपदाच्या शर्यतीतून सुभाष गेल्यामुळे आता आमच्या भाऊंचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळाच, असे आता गणेशभाऊंचे समर्थक अगदी छातीवर हात मारून सांगू लागले आहेत. ∙∙∙

अपयशाचे खापर

‘काणकोण जाणा कोण’ हे वाक्य आता मागे पडले आहे. काणकोणकर सर्वच क्षेत्रांत चमकत आहेत. काणकोणची राजधानी असलेल्या पालिकेचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो शुक्रवारी आपल्या नगराध्यक्ष पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. गेल्या वर्षभरात पालिका क्षेत्रात एकही डोळ्यांत भरेल, असे विकासकाम झालेले नाही, हे सत्ताधारी गटही मान्य करत आहे. यशाचे मानकरी सर्वच असतात. मात्र, अपयश कोणीच आपल्या माथी मारून घेत नाहीत. त्यांचेही तसेच झाले आहे. माजी उपसभापतींच्या असहकारामुळेच पालिका क्षेत्राचा विकास अडला, हे तुणतुणे त्यांनी आता लावून धरले आहे. म्हणतात ना, ‘अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी...’ ∙∙∙

वाहन पंक्चरचा कट!

खोर्ली भागातील घाटेश्वरनगर भागात गेल्या सुमारे दोन महिन्यांत रस्त्यालगत उभारलेल्या बेकायदा स्टॉल्सची पाहणी करण्याची तारीख पालिकेने ठरवली होती. परंतु, कोमुनिदादच्या मालकीच्या त्या डोंगराळ भूभागावर बेकायदा बांधकामे उभारण्यास परप्रांतीयांना नेहमीच अभयदान देत असलेल्या तथा ‘डोंगरसम्राट’ म्हणून (कु)विख्यात असलेल्या म्हापशातील एका बलाढ्य राजकारण्याचा पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन आला आणि त्यामुळे पाहणीसाठी जाणार असलेल्या वाहनाचा टायरही नियोजनबद्धरित्या आपोआपच पंक्चर झाला. पालिकेकडे वाहनच उपलब्ध नाही, अशी सबब पुढे करून अखेरीस ती पाहणीच पुढे ढकलण्यात आली. तिकीट घोटाळाप्रकरणी काही वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेले ‘जीसीए-फेम’ विनोद ऊर्फ बाळू फडके यांचे चिरंजीव असलेले स्थानिक नगरसेवक विराज फडके यांचा त्या नियमबाह्य गाळ्यांना पाठिंबा असल्याचा तेथील सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा असून, त्या अनुषंगानेच त्या गाळ्यांच्या विरोधात त्यांनी पालिकेकडे तक्रारही केली होती. ∙∙∙

लोबोंना टोमणे

सोनसोडो प्रश्‍न गेली कित्येक वर्षे विधानसभेत गाजत आहे. बुधवारी विधानसभेत हा प्रश्‍न फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी कचरा व्यवस्थापन मंत्री विरोधकांमध्ये बसला आहेत, आता त्यांचा सल्ला घेऊन सूचना करा, असा टोला हाणला. तेव्हा आमदार मायकल लोबो हे भाजप सरकारमध्ये होते. सोनसोडो कचरा प्रश्‍न सोडवत असतानाच ते आता विरोधी पक्षाच्या गटात सामील झाले. त्यामुळे त्यांचा अनुभव व असलेल्या ‘आयडिया’ विरोधकांच्या समस्या सोडवण्यासाठी कामी पडतील, अशी खोचक टीका त्यांनी केली. लोबो हे आता आमच्यात नाहीत, तर पलीकडे आहेत. त्यामुळे आता ही समस्या आम्हालाच सोडवावी लागणार आहे. मुख्यमंत्री सावंत हे आपल्याला कोपरखळी मारण्याची संधी सोडत नाहीत, हे लोबो यांनाही माहीत झाले. मुख्यमंत्र्यांनी मिश्‍किलपणे मारलेले टोमणे लोबो यांनी मात्र हसत हसत स्वीकारले. ∙∙∙

भाजप संतुष्ट, इतरांचे काय?

भाजप व इतर सहकाऱ्यांचे सरकार स्थापन झाले. सुरुवातीला वाटत होते, की सरकारमध्ये पहिल्याच टप्प्यात सर्वांना सामावून घेणार; पण तसे न करता भाजप वगळता इतरांना कात्रीत पकडण्याचा डाव आखला जात आहे. मुख्यमंत्री, आठ मंत्री, सभापती, उपसभापती मिळून 20 पैकी 11 जण समाविष्ट झाले. आता भाजपमधील नऊजण त्यात तीन अपक्ष आणि दोन मगोपचे आमदार आणि राहिली आहेत केवळ तीन मंत्रिपदे. लोकसभा जवळ असल्यामुळे सर्व जाती-धर्मांची कोष्टके जुळविण्यासाठी कदाचित उशीर लागत असेल; पण दोन लोकसभा जागांसाठी 14 आमदारांना कसे काय समजावणार? त्यातील तीनजणांना मंत्रिपद देणार आणि शिल्लक 11 आमदारांना केवळ महामंडळ देऊन संतुष्ट करावे लागणार. त्यानंतर पक्षातील इतर नेते दावेदारही असतील. हे सर्व होईपर्यंत सर्वांना सांभाळूनही घ्यावे लागेल. सर्वांची मानमरातब सांभाळून लोकसभा हेच लक्ष्य असेल. तेव्हा पाहूया कोण कोण कसे समाधानी होतो ते. ∙∙∙

दिव्या राणेंचा धडाका

पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येण्यामध्ये बाजी मारली आहे आता त्यांनी तर प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर तोलून-मापून बोलण्याचे कसब आत्मसात केले आहे. कुटुंबामधून राजकारणाचे धडे मिळालेल्या दिव्या यांनी पर्ये मतदारसंघ स्वतःच्या हातात घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्यास सुरू केली आहे, असे म्हटले तरी त्यांना सासरे तथा राजकारणातील भीष्म मानले जाणारे प्रतापसिंह राणे यांच्या अनुभवाचे मार्गदर्शन आणि पती विश्‍वजीत राणे यांचे पाठबळ यांमुळे यश मिळत आहे. त्या यापूर्वी राजकारणात होत्या. मात्र, पडद्यामागून मदत करत होत्या. त्या कधीही सोशल मीडियासमोर आल्या नव्हता. मात्र आता त्या सक्रिय झाल्या आहेत. प्रसारमाध्यमे दिसल्यावर त्या खूष होतात आणि विचारलेल्या प्रश्‍नांवर त्या बिनदिक्कत उत्तरे देतात. विश्‍वजीत राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्या राजकारणात यशस्वी होतील, अशी चर्चा पर्ये मतदारसंघात सुरू आहे. ∙∙∙

पैंगीण पंचायतीत एप्रिल फूल

काणकोणातील सुशिक्षितांची पंचायत क्षेत्र गणल्या जाणाऱ्या पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर यांच्या विरोधात नऊपैकी पाच पंचांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. त्या ठरावावर चर्चा करण्यासाठी पंचायत संचालकांनी १ एप्रिलला म्हणजे ‘एप्रिल फूल’ केले जाते, त्यादिवशीच पंचायत मंडळाची बैठक बोलावली आहे. आता अविश्वास ठराव दाखल केलेल्या पंचांना एप्रिल फूल होते, की सरपंचांना याची सध्या चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर पंचायत मंडळाचा कार्यकाल दोन महिन्यांनी संपणार असताना आता अविश्वास ठराव दाखल करून काय साध्य करणार? असाही प्रश्‍न केला जात आहे. सत्ताबदलाचा हा तर परिणाम नव्हे ना? असेही बोलले जात आहे‌.

Damu Naik News, Goa Cabinet News
आमदार वीरेश बोरकरांचा मंडूर पंचायत सचिवांना दणका

कचऱ्याच्या आगीचे रहस्य

मडगावात कचऱ्याला वारंवार लागणारी आग दुर्घटना आता नित्याचीच झाली आहे. पण सोनसोडोवर तशी आग लागली की त्याची बातमी होते. सोनसोडोवर आगीचा भडका उडाला, की मागचा-पुढचा विचार न करता ‘शॉर्ट सर्किटमुळे आग’ असे सांगून जबाबदारी झटकली जाते. मात्र, रस्त्याच्या कडेला एकत्र केलेल्या कचऱ्याच्या आगीला ते समीकरण लागू होत नाही. मग ही आग कशी लागते? शॅडो कौन्सिल म्हणते, की दारोदार कचरा गोळा करणारेच वर्गीकरण टाळण्यासाठी त्याला आग लावतात. खरे काय ते पालिका प्रशासन आणि कचरा गोळा करणारेच जाणोत. ∙∙∙

‘हाती आले धुपाटणे’

राज्यातील खनिज खाणींनी गोव्याला आणि केंद्राला अर्थातच भरभक्कम निधी उपलब्ध करून दिला; पण खरे म्हणजे खाणव्याप्त भागातील लोकांची अक्षरशः परवड झाली. पैसा कमावणारे कमवून गेले; पण खाण भागात राहणाऱ्या लोकांच्या ‘हाती आले धुपाटणे’ असा प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे खाण अवलंबितांनी पोटाला चिमटा लावून मुलांना उच्चशिक्षित केले, पण या उच्चशिक्षित मुलांना रोजगार मिळत नसल्याने पालक मेटाकुटीला आले आहेत. खाण कंपन्या काही या उच्चशिक्षितांना नोकरी घ्यायला तयार नाहीत. सरकारी नोकऱ्यांबाबत तर उच्चशिक्षितांची परवडच सुरू आहे. त्यामुळे मुलांना एवढे शिकवले खरे; पण घरी बसवण्यासाठी काय, असा सवाल गरीब खाण अवलंबित पालक विचारत आहेत. ∙∙∙

आवळा देऊन कोहळा...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 29 मार्च रोजी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात कोणत्याही करात वाढ केली नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी स्तुतिसुमने उधळली. मात्र, आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे दंडाची रक्कम वाढली आहे. त्याचसोबत सध्या रोजच पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ होत आहे. त्यामुळे एका बाजूने सरकारने दिलासा दिला असला, तरी दुसऱ्या बाजूने लोकांचा नकळत खिसा कापण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, अशी येथील जनतेची अवस्था झाली आहे. ‘आवळा देऊन कोहळा काढून घेणे’, ही म्हण येथे चपखल लागू होत आहे. ∙∙∙

साबांखाच वरचढ

गोव्याच्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक वाटा साबांखाकडे जातो; तरीही कामे रेंगाळतात आणि ती दर्जेदार होत नाहीत, अशा वाढत्या तक्रारी आल्याने २००२ मध्ये प्रथम सत्तेवर आल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाची स्थापना करून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्याकडे वळविले. त्यामुळे बरीच मंडळी नाराजही झाली होती. त्या नाराजीला तसे काही कारण नव्हते. ताज्या अर्थसंकल्पावरून नजर फिरविली तर त्यात ‘साबांखा’साठी सुमारे 2099 कोटी तर साधनसुविधा मंडळासाठी ३७२ कोटींची तरतूद केल्याचे दिसते. म्हणजेच साबांखावाल्यांनी नाराज होण्याचे काहीच कारण नाही. ∙∙∙

दुधात साखर...

पर्ये मतदारसंघ हा राणे कुटुंबीयांचा बालेकिल्ला. या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुलले. या मतदारसंघातून पहिल्यांदाच डॉ. दिव्या राणे या महिला आमदार निवडून आल्या. पर्ये मतदारसंघातील जनतेने सर्वाधिक मताधिक्क्याची आघाडी देऊन दिव्या यांना विधानसभेत पाठविले. मात्र, या सर्वांची बक्षिसी म्हणून त्यांना मंत्रिपद मिळणार की नाही, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. बाबांना पहिल्या क्रमांकाचे मंत्रिपद मिळाले. मात्र, भाभीलाही मंत्रिपद दिले असते तर दुधात साखर पडल्यासारखे झाले असते, असे लोक म्हणत आहेत. ∙∙∙

Damu Naik News, Goa Cabinet News
‘गोवा माईल्स’वरून टॅक्सीचालक आमने-सामने

केपे बायपास

कण्वपूर (सध्याचे काणकोण) आणि संगमपूर (सांगे) या तालुक्यांचे भावनिक नाते सर्वश्रुत आहे. मात्र, हे नाते आता राज्यपटलावर अधिक दृढ झाले आहे. काणकोणच्या वाट्याला सभापतिपद, तर सांगेला उपसभापतिपद. ‘हम भी खूष और तुम भी खूष’ अशी सध्या स्थिती निर्माण झाली आहे. सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी रमेश तवडकरांचा एकही लोकोत्सव सोडला नाही. स्तुतिपर भाषण करण्यात सुभाष फळदेसाई यांचा हात धरणारा कोणीच नाही. असे असले, तरी सध्या केपे तालुक्याला फाटा देऊन या दोन तालुक्यांचे सख्य चांगलेच जुळल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सांगे व काणकोण यांच्यामध्ये सरळ रस्त्याने गेल्यास केपे मतदारसंघाचा काही भाग लागतो. मात्र, काणकोणवासीयांना गुपचूप केपे डावलून थेट सांगे तालुक्यात जाण्यासाठी आंबेघाट आहेच, अशीही मार्मिक टीका केपे तालुक्याविषयी केली जात आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com