कार्यकर्त्यांसह गोवा फॉरवर्डमध्ये जाणार

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

थिवी मतदारसंघाचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात अनेक कार्यकर्त्यांसह जाण्याचा निर्णय घेतला असून २६ ऑक्टोबर रोजी अस्नोडा येथे भव्य कार्यक्रमात ते त्या पक्षात रीतसर प्रवेश करणार आहेत.

म्हापसा : थिवी मतदारसंघाचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात अनेक कार्यकर्त्यांसह जाण्याचा निर्णय घेतला असून २६ ऑक्टोबर रोजी अस्नोडा येथे भव्य कार्यक्रमात ते त्या पक्षात रीतसर प्रवेश करणार आहेत.

आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेण्यास खूपच उशीर केला. थिवी मतदारसंघातील असंख्य सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य व भाजपच्या कार्यकर्त्यांसह येत्या सोमवार २६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अस्नोडा कदंब बसस्थानकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गोवा फॉरवर्ड पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप सरकारच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळल्याचे स्पष्ट करून त्यामुळेच आपण भाजपाचा त्याग करणार असल्याचे म्हापसा येथील इंद्रधनुष्य सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कांदोळकर यांनी जाहीर केले.
यावेळी ते म्हणाले, की भाजपामध्ये आता राम राहिला नसून मूळ भारतीय जनता पार्टी आता काँग्रेसमय झालेली आहे. काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाच्या नेत्यांनी केले व त्याच काँग्रेसच्या आमदारांना भाजपात प्रवेश देऊन काहींना मंत्रीही केले. आता त्यांचे शुद्धीकरण झाले का? असा सवाल त्यांनी केला.

भाजपला सोडचिट्टी देण्याची कारणे विशद करताना कांदोळकर म्हणाले, भाजपाच्या भ्रष्टाचाराची माहिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती व २ ऑक्टोबरपर्यंत भाजपातील भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करण्याची विनंती केली होती; परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने व स्थानिक नेत्यांनीही माझ्या आरोपांची खिल्ली उडवल्याने आपणाला पक्ष सोडण्याचा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांच्या संमतीने  घ्यावा लागला. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारीं वाजपेयी, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परिकर यांची विचारसरणी घेऊन आम्ही पुढे आलो. पण, सध्याचे गोव्यातील भारतीय जनता पार्टीने मला मजबूर केले. सध्या भाजपा पार्टी राहिली नाही, तर ती काँग्रेस पार्टी झाली आहे. काँग्रेसचे लोक घेऊन भाजपा सरकार चालते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार भ्रष्टाचारी सरकार झाले आहे.
पुढे बोलताना कांदोळकर म्हणाले, की म्हादई नदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटककडे गहाण ठेवलेली नाही, तर चक्क विकून टाकलेली आहे. आयआयटीच्या संदर्भात आंदोलन करणाऱ्यांवर मुख्यमंत्री सावंत ‘सेटिंग’चा आरोप करतात, हे शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाहीत, असेही ते म्हणाले.

डॉ. प्रमोद सावंत सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे, असे नमूद करून भाजपने काँग्रेसमधले आमदार आणले व भ्रष्टाचार वाढविला असा आरोप कांदोळकर यांनी केला. त्यामुळे या सरकारला घरी पाठवायलाच हवे, असेही ते म्हणाले.
आपण यापूर्वी विविध मतदारसंघांतील आजी-माजी आमदारांना, मंत्र्यांना घेऊन स्वतःचा पक्ष काढण्याचे सुतोवाच या पूर्वी केले होते. परंतु यातील अनेक जण भाजपा पार्टी आणि त्यांच्या सरकारावर नाराज असल्याने सर्वांनी एका विचाराने गोवा फॉरवर्ड पार्टीमध्ये येऊन भाजपा सरकारला घरी पाठवण्याचा निर्णय झाला. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई चांगले काम करतात. त्यामुळे आम्ही भाजपाला सोडचिट्टी देऊन गोवा फॉरवर्डमध्ये रीतसर प्रवेश करणार असल्याचे कांदोळकर म्हणाले.

संबंधित बातम्या