वास्कोतील नागरिकांचा पालिका मंडळाला सवाल: तीन प्रकल्प साकारण्यात तरी यश येईल का?

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

वास्कोतील नागरिकांचा पालिका मंडळाला सवाल; बहुचर्चित सिग्नेचर प्रकल्प रखडला

मुरगाव: लालफितीत अडकलेल्या बहुचर्चित सिग्नेचर प्रकल्पासाठी कोणताही प्रयत्न न करता मुरगाव नगरपालिका मंडळाने आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी तीन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी पावले उचलली आहेत, पण याला यश येईल का? असा सवाल जनता जनार्दन विचारीत आहे.

नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्याकडे पालिका कारभाराची सूत्रे असल्याने ते मुरगाव पालिकेच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देतील असे सुरवातीला वाटत होते, तेच नियोजित सिग्नेचर प्रकल्पाला चालना देतील अशी आशा निर्माण झाली होती, पण सर्व अपेक्षा फोल ठरल्या. परिणामी घोषित केलेले प्रकल्प अजूनही लालफितीत अडकलेले आहेत. सिग्नेचर प्रकल्प अडकून ठेवण्यामागे मोठे राजकारण असल्याचीही चर्चा आहे. सरकारने प्रकल्पासाठी दिलेले तीन कोटी रुपये अन्य कामांसाठी खर्च केल्यानेच सिग्नेचर प्रकल्पाचे फक्त तुणतुणे वाजविले जात आहे. 

२०११ साली गोव्याने मुक्तीदिनाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले, तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकारने मुरगाव पालिकेला ‘सुवर्णमहोत्सवी प्रकल्प’ उभारण्यासाठी तीन कोटी रुपये दिले होते. त्यातून सिग्नेचर प्रकल्प उभारण्याची घोषणा केली, पण आज पर्यंत हा प्रकल्प साकार होत नाही, तसेच सरकारने दिलेल्या तीन कोटी रुपयांचे पुढे काय झाले याचाही थांगपत्ता लागत नाही.

मुरगाव पालिकेने सिग्नेचर प्रकल्प उभारण्यासाठी स्वातंत्रपथ मार्गावरील बडोदा बॅंकेसमोर असलेल्या पालिका मुख्याधिकारी बंगल्याची निवड केली. हा जुना बंगला पाडून महत्त्वाकांक्षी सहा मजली व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला. त्यानुसार आराखडा तयार करून आठ वर्षांपूर्वी मोठ्या समारंभपूर्वक तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पायाभरणी केली. हा सिग्नेचर प्रकल्प अवघ्या सहा महिन्यांत उभारण्यात येईल अशी घोषणाही करण्यात आली होती, पण आजपावेतो प्रकल्पासाठी साधी एक वीटसुद्धा लावलेली नाही. या प्रकल्पाच्या पायाभरणीपासून पालिका मंडळावर आतापर्यंत गेल्या आठ वर्षांत दहा नगराध्यक्ष बनले, पण कोणीच सिग्नेचर प्रकल्प मार्गी लावण्याचे सौजन्य दाखवले नाही.

विद्यमान पालिका मंडळाकडून सिग्नेचर प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला जाईल अशी आशा पल्लवित झाली होती. दीपक नागडे यांनी आपल्या तीन वर्षांच्या काळात मुख्याधिकारी बंगला पाडून नियोजित प्रकल्पासाठी जमीन सपाट करून दिली, पण प्रकल्पाचे काम काही सुरू केले नाही. पाडलेल्या बंगल्याचे साहित्य कुठे गेले याचाही थांगपत्ता नाही. यात मोठा घोटाळा झाल्याची चर्चा आहे, पण चौकशी कोणी केली नाही. त्यामुळे सिग्नेचर प्रकल्प न होणे हाही काहीजणांसाठी फायद्याचे झाले आहे.
सिग्नेचर प्रकल्पासाठी तब्बल सातवेळा ई टेंडरींग केले. त्यानंतर सांगली येथील एका कंत्राटदाराने टेंडर स्वीकारून प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली. त्या कंत्राटदाराने भू चाचणीचे काम हाती घेऊन प्रकल्प साकार करण्याच्या बाबतीत वास्कोकरांमध्ये आशा निर्माण केली होती, पण भू चाचणी केल्यानंतर तो कंत्राटदार जो गायब झाला, तो आजपावेतो प्रकल्प उभारण्यासाठी वास्कोत अवतरला नाही. प्रकल्प बांधणीचा खर्च वाढल्याने नियोजित खर्चात प्रकल्प उभारणे शक्य नसल्याने सांगली येथील त्या कंत्राटदाराने आपले अंग काढून घेतल्याचे सांगितले जाते. पालिकेने वाढीव खर्च देण्याचीही तयारी दर्शवली तरीही तो कंत्राटदार प्रकल्प उभारण्यास राजी नाही याचे कारण गुलदस्त्यात आहे.

विद्यमान पालिका मंडळाची कारकीर्द  ऑक्टोबरमध्ये संपुष्टात येत आहे,  नजीकच्या काळात सिग्नेचर प्रकल्पाचे अडलेले घोडे पुढे दामटले जाईल याची सुतराम शक्यता नाही. त्यातच पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने सहा - सात कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उभारण्याचे धाडस पालिका करणार नाही हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे सिग्नेचर प्रकल्पाची न संपलेली कथा पुढेही काही वर्षे चालूच राहणार यात दुमत नाही.

दरम्यान, मुरगाव पालिकेने सिग्नेचर प्रकल्पाकडे दुर्लक्ष करून आता १४ व्या वित्त आयोगाचे २३ कोटी रुपये खर्चून नवीन तीन प्रकल्प उभारण्याची हालचाल सुरू केली आहे. निदान यात तरी विद्यमान पालिका मंडळ यशस्वी होईल का? हा प्रश्नच आहे.

संबंधित बातम्या