पावसाळ्यानंतर रोजगारांसाठी गोव्यातच येणार

Dainik Gomantak
शनिवार, 30 मे 2020

रेल्वेने गावी निघालेल्या झारखंड, पं. बंगालच्या मजुरांचा निर्धार

संजय घुग्रेटकर
खांडोळा

शासनाने गावी जाण्याची सोय केली आहे. गेले दोन महिने जेवण, राहण्याची चांगली सोय केली. मजुरांची संख्या खूप असल्यामुळे काही वेळेला आमच्यापर्यंत मदत पोचण्यास अडचण आली. परंतु गोवा शासनाचे आमच्यावर खूप उपकार आहेत. येथे चांगला रोजगारही मिळतो, सध्या रोजगारच नाही, त्यामुळे येथे राहण्यात अर्थ नाही, त्यामुळे आम्ही मूळ गावी झारखंड, पं. बंगालला रेल्वेने झारखंड, पं. बंगालला जाणार आहोत. पण पावसाळ्यानंतर गोव्यात पुन्हा रोजगार उपलब्ध होईल, तेव्हा निश्चितपणे आम्ही कर्मभूमी गोव्याला परतणार आहोत, असे मत जुने गोवे रेल्वेस्थानकाकडे जाताना सांगितले.
खास करून उत्तर गोव्यात काम करणारे मजूर झारखंडला जाण्यासाठी जुने गोवे येथील हातकातरो खांब, श्री वडेश्वर मंदिर परिसरात मोठ्या संख्येने मजूर संध्याकाळी रेल्वेने जाण्यासाठी थांबले होते. पोलिसांकडून तपासणी केल्यानंतर सामाजिक अंतराने ते करमळीला जात होते. वडेश्वर मंदिर परिसरात लहान मुलासह महिलावर्ग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी बोलताना झारखंडचा मजूर सुग्रीव आपली कैफियत मांडताना म्हणाले, गोव्यात गेल्या चार वर्षापासून आम्ही काम करतो. आमचा परिवारही येथेच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन आम्ही राहात होतो. सगळीकडे खूप चांगले सहकार्य मिळाले. काम केले तर पैसा मिळतो. येथे चांगला रोजगार मिळतो. झारखंडमध्ये इतकी मजुरीही मिळत नाही. तेथे काम कमी आहे. शेतीत चांगले उत्पन्न मिळत नाही. एका भावाचे जीवन व्यवस्थित चालते. त्यामुळे इतर दोघेजण आम्ही गोव्यात काम करतो. गोव्यात गेल्या दोन महिन्यात काहीच रोजगार मिळाला नाही. परंतु कंत्राटदार व शासनाने आमची चांगली सोय केली. इतर सुविधा दिल्या, त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आता गावाकडे आई-वडिल, नातेवाईक आहेत. त्यांना भेटणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी आम्ही पावसाळ्यात गावाला जातो. त्याप्रमाणे यंदाही जात आहोत. प्रत्येक वर्षी आमच्याकडे रोजगारांतून कमविलेले पैसे असायचे, पण यंदा तेवढे पैसे नाहीत. कारण रोजगारच नाही.
सुरुवातीला आम्हाला खूप भिती वाटली. रोजगार नाही, जेवण नाही, असे काही दिवस काढले. परंतु त्यानंतर गोवा शासनाने चांगली सोय केली. पण रोजगार मिळाला नाही. त्यामुळे येथे कंटाळा आहे. कुठेही काम करायला जायचे तर पोलीस सोडत नव्हते. अनेक ठिकाणी काम विचारले तरीसुद्धा कोणी घरातील, बागेतील कामसुद्धा देत नव्हते. अशा स्थितीत गोव्यात कसे राहणार, आपले, आपल्या मुलांचे काय होणार? अशी भिती वाटू लागली. त्यामुळे अनेक जण गावी निघून गेले. आता काही प्रमाणात रोजगार मिळतो. घरातील कामेही मिळत आहेत. पण आमचे बरेच लोक गावी गेल्यामुळे, तसेच पावसाळा जवळ आल्याने गावी जाणे गरजेचे आहे. गावात शेती आहे, तेथे पावसाळ्यात नेहमी जातो, म्हणून आम्ही श्रमिक रेल्वेने गावी जात आहोत, अशी माहिती रुपरानी नावाच्या महिलेने सांगितले.
जुने गोवे येथे थांबलेल्या मजुरांनी गावी जाण्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे माहिती दिली. बऱ्याच जणांचा सूर मात्र गोवा सुरक्षित असून पावसाळ्यानंतर गोव्यात रोजगार मिळणार आहे. तेव्हा निश्चितपणे गोव्यात येणार असाच होता. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीसुद्धा काम करणाऱ्यांना, कष्ट करणाऱ्यांना त्यापासून धोका नाही, असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. पुन्हा चांगले दिवस येणार, पुन्हा गोव्यात येणार, याच निर्धाराने सर्व मजूर रेल्वेस्थानकाकडे चालले होते.

 

संबंधित बातम्या