कोल्हापुरातून फक्त 2 तासांत गोव्याला जाणे शक्य..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

६० मीटर रूंदीचा हा महामार्ग होणार असून या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्हा कोकण आणि गोव्याच्या आणखी जवळ येणार आहे. यातून व्यापार, पर्यटन वाढणार आहे. ​

कोल्हापूर- गोव्यात जाण्यासाठी शहरातून दोन तर गडहिंग्लजमधून दीड तासांत पोहचणे शक्य होणार आहे. संकेश्वर-बांदा या राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यावर ‘एनएच ५४८’ म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. ६० मीटर रूंदीचा हा महामार्ग होणार असून या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्हा कोकण आणि गोव्याच्या आणखी जवळ येणार आहे. यातून व्यापार, पर्यटन वाढणार आहे. साधारण ३१मार्चपर्यंत याचा निधी केंद्र शासनाकडून येणार असून दोन अडीच वर्षात हे काम पूर्ण होईल.

संकेश्वर ते बांदा हा महामार्ग होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, रेडी पोर्ट (जि. सिंधूदुर्ग) हा मार्ग पुढे आला. त्यातून हा मार्ग प्राधान्यक्रमात आला. भारतमाता आणि सागरीमाला या केंद्रशासनाच्या दोन्ही योजनांमध्ये या महामार्गाला स्थान मिळाल्याने  त्याचे काम तातडीने सुरु झाले. या संपूर्ण मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याला ‘एनएच ५४८’ हा क्रमांकही देण्यात आला आहे. तसा  प्रस्ताव पुढील महिन्यात पुण्यातून दिल्लीला जाणार आहे. ३१मार्चच्या आत या कामासाठी निधी मंजुर केला जाणार आहे.  हा मार्ग चार- पदरी असणार आहे. या मार्गावरील गती ताशी शंभर किलोमीटर असणार आहे. महामार्गाची लांबी १०८ किलोमीटर असून गडहिंग्लज मधून केवळ दीड तासात गोव्यात पोहोचता येणे शक्य होणार आहे. आंबोली घाटामुळे आणखी वीस-तीस मिनीटांचा जास्त कालावधी गृहीत धरला तर दीड तासात बांद्यामध्ये पोहोचता येणार आहे.

 संकेश्वर-गडहिंग्लज-कवाडे- आजरा-गवसे-आंबोली-केगड-सावंतवाडी-बांदा असा नवीन महामार्ग एशियन हायवे चार पासून सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या