तृणमूल गोव्यात मूळ धरेल का?

तृणमूलने काँग्रेस नेत्याला नटवून सजवून घोड्यावर बसवले
Will Trinamool Congress stay in Goa
Will Trinamool Congress stay in GoaDainik Gomantak

पणजी: पश्‍चिम बंगालमधील (West Bangal) विधानसभा निवडणुकांत (Assembly Election) मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा (Mamata Banerjee's Trinamool Congress) उत्साह दुणावल्याचे स्पष्ट संकेत दिसतात. एका बाजूने निवडणुकांआधी पक्षाची साथ सोडलेल्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घरवापसीसाठी लागलेली रांग, तर दुसऱ्या बाजूने आपण बंगाल व्यतिरिक्त इतर राज्यांतूनही आपण प्रभाव पडू शकतो, असा पक्ष नेतृत्वाला वाटणारा आत्मविश्वास, यामुळे प्रसारमाध्यमांतून या पक्षाला व्यापक प्रसिद्धी मिळाली.

आसाम, त्रिपुरा यासारख्या ईशान्य भारतातील राज्यातले बडे काँग्रेसचे नेते गळाला लागल्यानंतर तृणमूलने दूरवरच्या गोव्यासारख्या छोट्या राज्याकडे आपले लक्ष वळवले आणि लुईझिन फालेरो यांच्‍यासारख्‍या सूर्यास्तात विरून जाण्याच्या स्थितीत असलेल्या काँग्रेस नेत्याला नटवून सजवून घोड्यावर बसवले. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याशी लुईझिन फालेरो यांचे ‘विळ्या भोपळ्याचे सख्य’ तर सर्वश्रुतच होते. अशावेळी तृणमूलकडून दाखवण्यात आलेले राज्यसभेतील नियुक्तीचे आमिष म्हणजे त्यांच्यासाठी मोठे घबाड आहे. परंतु, त्यांचे झेंडे खांद्यावर घेऊन नाचणारे बहुतेक उपनेते- कार्यकर्ते यांचे राजकीय वजन फारसे नाही व अनेकांना तर व्यापक जनमान्यताही नाही. अशा परिस्थतीत ते आपापल्या पदरात काय पाडून घेतात, हे पाहणे संयुक्तिक ठरेल. कारण असंतुष्टांच्या समोर कसले तरी गाजर असल्याशिवाय ते तृणमूलच्या गोठ्यात का सामील होतील?

Will Trinamool Congress stay in Goa
डोकेदुखी वाढली : बिगर गोमंतकीय मतपेढीवर विसंबणाऱ्यांना धक्का

सत्तेसाठी शिडीसारखा वापर : डॉ. ब्‍यूला परेरा

समाजशास्त्राच्या व्याख्यात्या डॉ. ब्यूला परेरा यांच्या मते येत्या निवडणुकांत तृणमूलचा प्रभाव शून्य असेल. एक तर ते उशिराने रिंगणात उतरले आहेत व दुसरी बाब म्हणजे राजकीयदृष्ट्या विझत चाललेल्या नेत्यांपेक्षा युवा वर्गाला पुढे केले तरच नवीन पक्षाकडे जनता विश्वास टाकेल. राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात पाय रोवण्यास अपयशी ठरला, लोकांना आकर्षित करणाऱ्या अनेक घोषणा करूनही ‘आप’ अजून चाचपडत आहे. गोवा ही अनेक पक्षांसाठी एक प्रयोगशाळा बनली आहे.

तगडे उमेदवार जिंकतील, पण...

केवळ ख्रिस्तीबहुल मतदारसंघांत तृणमूलच्या प्रवेशाने फरक पडू शकतो. परंतु, फारच नगण्य असेल, असे ॲड. जतीन नाईक यांना वाटते. त्यांच्यामते हिंदुबहुल मतदारसंघांतील जातीय समीकरणांचे जोपर्यंत त्यांना संपूर्ण आकलन होत नाही, तोपर्यंत त्यांचा प्रभाव मर्यादित आहे. शिवाय व्यक्तिगत पातळीवर ज्यांची हजारभर मते घेण्याची कुवत नाही, अशा नगण्य नेत्यांच्या आधाराने पक्ष वाढू शकत नाही, असे ॲड. नाईक म्हणाले. परंतु, भाजपवर याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो असेही त्यांना वाटते. भाजपमध्ये सध्‍या सात ख्रिस्ती आमदार आहेत. तृणमूल काँग्रेसने त्यांच्यासमोर तगडे उमेदवार ठेवल्यास त्यांना मतदारांची पसंती मिळू शकते. मात्र, ते फुटून भाजपच्या कळपात सामील होणार नाहीत, याची खात्री मतदारांना हवी.

Will Trinamool Congress stay in Goa
Goa: पं. दीनदयाळ उपाध्याय यांना डिचोलीत भाजपकडून आदरांजली

बडे नेते गळाला लागले, तर..!

राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने ज्या प्रकारे स्थानिक मगोला पोखरून आपले अस्तित्व निर्माण केले. त्याचप्रमाणे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला पोखरून तृणमूल आपले बस्तान गोव्यात बसवू शकते, असेही डॉ. गोवेकर यांना वाटते. फक्त त्यांच्या गळाला जनमानसात स्थान असलेले कोणते बडे नेते लागतात हे महत्त्‍वाचे ठरेल.

असंतुष्ट वळतील का?‍

काँग्रेसमधील असंतुष्टांशिवाय अजून कुणी तृणमूलच्या गळाला लागतील, हे निवडणुका नजीक येता येता स्पष्ट होत जाईल. राज्यशास्त्राचे माजी प्राध्यापक व राजकीय विश्लेषक डॉ. केतन गोवेकर यांच्यामते सध्‍याच्या राजकीय परिस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रवेश एक वेगळा राजकीय संकेत संकेत देऊ शकतो. या आधी ‘आप’ने असा प्रयत्न नक्कीच केला. परंतु, दिल्लीसारख्या बहुसांस्कृतिक नागरी मतदारांपलीकडे स्थानिक अस्मिता जोपासणाऱ्या छोट्या राज्यांतील मतदारांना तो आकृष्ट करू शकला नाही. ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा, प्रशांत किशोर यांच्या अभ्यासपूर्ण राजनीतीचा त्यांना नक्कीच होईल, असेही डॉ. गोवेकर म्हणतात.

-शैलेंद्र मेहता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com