घरोघरी फराळ बनविण्यात महिलावर्ग व्यस्त; पसंती तयार फराळाला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

महिला वर्गही फराळाचे साहित्य बनविण्यात व्यस्त राहत असल्याने लहानग्‍यांचा या उत्सवामुळे हुरूप वाढल्याचे चित्र दिसत आहेत. 

पणजी: गणेशोत्सवात मिठाईंच्या दुकानांतून मिळणाऱ्या विविध तयार पदार्थ फराळ म्हणून नेण्यासाठी अनेक गणेशभक्तांची पसंती असते. त्यानुसार सध्या मिठाईच्या दुकानांतून विविध पदार्थ तयार करण्याची आणि माव्याचे विविध प्रकारचे आकाराचे व रंगाचे मोदक तयार करण्यावर मिठाईच्या कारखान्यात लगबग सुरू आहे. याशिवाय दुसऱ्या बाजूला महिला वर्गही फराळाचे साहित्य बनविण्यात व्यस्त राहत असल्याने लहानग्‍यांचा या उत्सवामुळे हुरूप वाढल्याचे चित्र दिसत आहेत. 

राज्यात अनेकांचा एकत्र कुटुंबपद्धतीनुसार गणपती पूजन असते. कोरोनामुळे अनेकजण पाच दिवसांऐवजी दीड दिवसाचा गणेशोत्सव करण्याच्या तयारीत आहेत. परंतु, काहीजण पाच दिवसांचा गणपती पूजनावर अधिक भर देत आहेत. त्यासाठी गावी गेलो तरी त्या वाड्यावरील कोणालाही आपल्या घरी बोलवायचे नाही किंवा कोणाच्याही घरी जायचे नाही, असे नियम घालून घेतले जात आहेत. शिवाय अशा ठिकाणी सध्या घरातील व्यक्तींसाठी पाच ते दहा दिवस पुरेल असे फराळाचे पदार्थ करण्यात महिलावर्ग कामाला लागल्याचे चित्र आहे. 

पणजी शहरातून अनेक ठिकाणी कौटुंबिक गणेशोत्सवासाठी मंडळी जात असून, ते आता तयार फराळ नेण्यावर भर देत आहेत. दीड दिवसाच्या गणपतीसाठी मोदक किंवा इतर मिठाई नेण्यासाठी बाजारातील मिठाई दुकानात येत असल्याचे सांगण्यात आले. 

मिठाई दुकानांवरही खरेदीसाठी गर्दी
राजपुरोहित यांच्या दुकानातही सध्या मोदकांची विचारणा होत असल्याचे दुकानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु सध्या काही प्रमाणात ग्राहक मिठाई घेऊन जात असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. याशिवाय शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मिश्र पेढा या मिठाईच्या दुकानात सध्या मिठाई खरेदीला ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. विविध पेढ्यांची मागणी ग्राहक करीत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. बाजारातील फरसाण विक्रेते विराज परब यांच्या दुकानातही गणेशोत्सवासाठी फरसाण, पापडी, शेव, चकली असे तिखट पदार्थ खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून आले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या