महिलांनी आत्मनिर्भर, सक्षम होणे गरजेचे: हर्षला पाटील बोरकर

प्रतिनिधी
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

‘रेजिस्ट’च्या निर्माती हर्षला पाटील बोरकर हिचे प्रतिपादन

फातोर्डा: महिलांनी आत्मनिर्भर आणि सक्षम होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन "रेजिस्ट" या लघुपटाची निर्माती व कलाकार हर्षला पाटील बोरकर हिने सांगितले.  "रेजिस्ट" या सात मिनिटांच्या लघुपटाचे दोन दिवसापूर्वी पहिल्यांदाच प्रदर्शन झाले. हा लघुपट युट्युब माध्यमातून पाहता येतो.

आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता महिलांनी केली पाहिजे. अन्यायावर  सहनशक्ती बाळगणे महिलांच्या हिताचे मुळीच नाही असेही हर्षलाने सांगितले.

हा लघुपट कुणहर्ष प्रोडक्शनने तयार केला असून श्रृती ही मुलगी नोकरी निमित्त बसने प्रवास करीत असता त्या बसमध्ये एक युवक युवतीला छेडतो असे दृश्य दाखविण्यात आले आहे. ते बघून श्रृतीला लहानपणी आपल्यावर एका वडील माणसाने चॉकलेटचे आमिष दाखवून  केलेल्या अन्यायाची आठवण होते. तेव्हा ती सहन करुन त्याची वाच्यता करीत नाही. शेवटी बसमध्ये जेव्हा ती युवती त्या युवकाच्या थोबाडीत देते त्या आवाजाने ती जुन्या आठवणीतून जागी होते. 

या बसमधील युवतीने सहनशक्ती भंग झाल्यावर काय करावे याचे उत्तम उदाहरण  इतर महिलांना दिले आहे.

या लघुपटाचे दिग्दर्शन कुणाल बोरकर यानी केले असून प्रितम पागी यांनी त्याला सहकार्य केले आहे. पार्श्र्वसंगीताची बाजू साईश म्हामल यांनी सांभाळली असून स्वतः कुणालसह हर्षला बोरकर, आद्या गांगुली, लता पाटील, तानिया शिरोडकर, विक्रम गावडे, प्रदोश प्रभू, श्रृद्धा पागी, स्वयम पागी, सिधाथ सालसकर, अनंत सावंत, राहुल बांदेकर, अनिकेत नाईक, साहील नाईक यांच्या भूमिका आहेत.

संबंधित बातम्या