गोव्यात महिला व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू...

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

महिलांवरील अत्याचार तसेच मदतीसाठी महिला व्हॉटस्अॅप हेल्पलाईन सुरू केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करत त्याची माहिती लोकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पणजी : गोव्यात महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. गोवा हे महिलांसाठी सुरक्षित असल्याचा विश्‍वास संपादन करण्यासाठी कोणत्याच प्रकारच्या गुन्ह्याला राज्यात थारा नाही. महिलांवरील अत्याचार तसेच मदतीसाठी महिला व्हॉटस्अॅप हेल्पलाईन सुरू केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करत त्याची माहिती लोकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कोविड काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा करून पुढील आव्हानांना लढा देण्याची भूमिका चोखपणे बजावतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

पणजी पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे अत्याधुनिक रुग्णवाहिका पोलिस खात्यासाठी सुपूर्द केली. त्याचबरोबर महिला व्हॉटस्अप हेल्पलाईनचे (मोबाईल क्रमांक ७८७५७५६१७७) उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले. ही रुग्णवाहिका गोवा शिपयार्ड कंपनीने सामाजिक बांधीलकीतून (सीएसआर) सरकारला दिली. यावेळी व्यासपीठावर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. बी. नागपाल, राज्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार वीणा उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालक दिपाली नाईक तसेच महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते. 
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, यापूर्वीही गोवा शिपयार्डने गोवा पोलिस खात्यासाठी सीएसआर योजनेतून २ वाहने दिली आहेत. या कंपनीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. या अत्याधुनिक सुसज्ज रुग्णवाहिकेचा वापर पोलिसांसाठी होणार
 आहे.
महिलांच्या मदतीसाठी पोलिसांनी प्रसिद्ध केलेला मोबाईल क्रमांक प्रत्येक महिलांनी आपापल्या मोबाईलमध्ये नोंदवून ठेवावा तसेच हा क्रमांक अधिकाधिक महिलांपर्यंत पोचेल यासाठी त्याची प्रसिद्धी करावी. पोलिस स्थानके, रेल्वे, बस स्थानके व विविध कार्यालयात तो प्रसिद्ध करावा. त्यामुळे पर्यटकांनाही गोव्यात आल्यावर मदतीसाठी गरज लागल्यास ते या क्रमांकावर फोन करू शकतील, असे ते म्हणाले. 
कोविड काळात पोलिसांनी चांगले काम केले आहे. काही प्रकरणांचा छडा २४ तासात लावण्याची कामगिरी केली आहे. गोवा ड्रग्जमुक्त करायचे असल्याने राज्यात ड्रग्जला थारा नाही. पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत आहे. यापूर्वीही ड्रग्ज होता मात्र कारवाई होत नव्हती. राज्यात कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका इतर कोविड योद्धांप्रमाणेच महत्त्वाची होती. सर्वात अगोदर पोलिसांनाच सामोरे जावे लागत होते. त्यामुळे अनेकजण कोरोनाबाधित झाले तरी त्यांनी लढा कायम ठेवला असे डॉ. सावंत म्हणाले. 
पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीमुळेच पोलिस खाते हे अत्याधुनिक रुग्णवाहिकेसाठी पात्र आहेत. गोवा शिपयार्ड कंपनीने मदत करून त्यांनी सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्यांच्याकडून यापुढेही अशीच मदत सरकारला होईल अशी अपेक्षा करतो असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. सरकारने नेहमीच खात्याला आवश्‍यक त्या साधनसुविधा दिल्या आहेत व मार्गदर्शन लाभले 
आहे. 

संबंधित बातम्या