गोवा: सत्तरीतील बंधारे शेतकऱ्यांसाठी ठरताय वरदान

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

वाळपईतील जलसिंचन विभागातर्फे बंधारे बांधून बागायतींसाठी पाण्याची उत्कृष्ट सोय उपलब्ध करून दिली आहे.

वाळपई: सत्तरी तालुका नेहमीच बागायती पिकांनी बहरलेला असतो. सत्तरी तालुक्यातील काजू, तसेच बागायती पिके सुपारी, केळी, मिरी, जायफळ, अननस, फणस, नारळ इत्यादी पिकांचा सहवास राहिला आहे. या बागायती पिकांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाळी पाळीने पाणीपुरवठ्याची फार आवश्यकता असते. हे पाणी नियमीत पिकांना मिळण्यासाठी नियोजनबध्द काम करावे लागते. त्यासाठी वाळपईतील जलसिंचन विभागातर्फे बंधारे बांधून बागायतींसाठी पाण्याची उत्कृष्ट सोय उपलब्ध करून दिली आहे. (The work done by the Irrigation Department in sattari is beneficial for the farmers)

पूर्वी लोक पारंपरिक पध्दतीने ओहळात बांध घालून पाणी अडून ते पाणी बागायतीत पुरविले जायचे. आजही ती पध्दत आहे, पण गेल्या काही वर्षांपासून गोवा सरकारच्या जलसिंचन विभागातर्फे सत्तरीतील अनेक गावात प्रकल्प राबवून सिंचनासाठी सदोदित कार्य केले आहे. गावोगावात बंधारे बांधणे, लहान लहान तळी बांधणे, नदीच्या पात्रात लहान बंधारे बांधणे अशी कामे करून पाणी संवर्धन करून ते पाणी बागायती पिकांना पुरविण्यासाठी वाळपईच्या जलसिंचन (जलस्त्रोत) विभागाने सत्तरीत मोठी क्रांती करून किमया साधली आहे. 

इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गोव्यातील 'या' 5 चर्चला नक्की भेटी द्या

अशा कामातून पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना पूर्णत्वास नेत आहे. पावसाळा संपला की लोखंडी फळ्या नदीच्या नियोजित बांधलेल्या ठिकाणी बसवून बंधारा पाण्याने भरून येतो. अशा नदीच्या पाण्यात बागायतदार पंप बसवून बागायतींना सिंचनासाठी वापरत आहेत. सध्या उन्हाळ्यात त्याची फार जरूरी असते. पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेमुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी संवर्धन हा विषय सत्तरी तालुक्यात यशस्वी होत आहे. या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकास साधला जातो आहे.

डोंगराच्या पायथ्यांशी जी बागायतींची मांडणी केली आहे. अशा बागायतीत सिंचनासाठी पाणी पुरविण्याची संकल्पना सरकारी पातळीवर पुढे आली आहे. ती खरोखरच बागायतदारांसाठी वरदान ठरली आहे. क्राँकीटच्या माध्यमातून बांधलेल्या तळीत पाटाचे पाणी साठवून नंतर साठलेले पाणी पुन्हा पाटाव्दारे विहिरीत सोडून तसेच थेट तुषार सिंचनाच्या माध्यमातून बागायती पिकांना पुरविण्याची मोठी किमया जलसिंचन विभागाने पूर्ण केली आहे.
 

संबंधित बातम्या