मजूर नसल्याने गोव्यातील कामे खोळंबली

Labour shores in goa
Labour shores in goa

शिरोडा   :  कोविड-१९ टाळेबंदीमुळे गोव्यातील बोरी, शिरोडा, पंचवाडी, बेतोडा, लोटली आणि जवळपासच्या भागातील लहानमोठे उद्योगव्यवसाय बंद झाले. या उद्योग व्यवसायात आणि आस्थापनात काम करणारे कामगार बहुतांश परराज्यातील बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, राजस्थान आणि कर्नाटक राज्यातील होते. सर्वच उद्योग व्यवसाय बंद झाल्याने या कामगाराच्या हाताना काम राहिले नाही. भाड्याच्या खोल्यात बेरोजगार राहून जवळजवळ दोन महिने या कामगारांनी घालवले. हातात होते नव्हते तेव्हढे पैसे खर्च केले. बऱ्याचजणांवर उपासमारीची वेळ आली. शेवटी या कामगारांनी आपल्या गावी जाणे पसंत केले. हे परराज्यातील मजूर नसल्याने या गावातील नागरिकांची घरे शाकारण्याची शेतीची, तसेच गटारे स्वच्छतेबरोबर अन्य लहान मोठी कामे खोळंबली आहेत. 
शिरोडा ग्रामपंचायतीचे सरपंच अमित शिरोडकर यांनी मात्र या बेरोजगार मजुरांकडून मान्सूनपूर्व कामे पावसाळा सुरवात होण्याअगोदरच करून घेतली. गावातील अंतर्गतरस्त्याशेजारची गटारे स्वच्छ करून घेऊन या मजुरांना काम देऊन त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न काहीअंशी सोडवला. शिरोडा गावात झुवारी नदी शेजारी मोठी खाजनशेती आहे. या शेतीचे भौस शेतकरी या मजुरांकडून शेती खणणी करून मशागत करून घेत होते. परंतु टाळेबंदीच्या काळात मजूर न मिळाल्याने ही शेतीची कामे राहून गेली आहेत. आता मान्सूनपूर्व पावसाला प्रारंभ झाल्यामुळे या खाजन शेतीत पाणी साठून राहिल्यामुळे शेतीची मशागत करणे कठीण होऊन बसले आहे. शिरोडा भागातील अनेक नागरिकांची घरांची शाकारण्याची कामे मजुराअभावी राहिली आहेत. तसेच बोरी गावात अनेक सार्वजनिक ठिकाणची कामे चालू होती. टाळेबंदीच्या या काळात मजुराअभावी ही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. तिशे येथील पडणावर गणपती मूर्ती विसर्जनासाठी शासकीय योजनेमार्फत आमदार सुभाष शिरोडकर यांनी तलाव बांधून देण्याची योजना आखली होती. मजूरा अभावी हे काम राहून गेले आहे. बोरी ग्रामपंचायत इमारतीवर जे सभागृह आहे या सभागृहाचे छप्पराचे काम पंचायतीने करण्याचे ठरवले होते. हे काम चालू असतानाच टाळेबंदी जाहीर केल्याने ठेकेदाराला मजूर मिळू शकले नाहीत. त्यामुळे छप्पराचे काम अर्धवट राहिले या इमारतीत आता थेट पाऊस पडत आहे. मजुराअभावी बोरी गावातील अंतर्गत भागातील गटारे स्वच्छ करण्यास मजूर उपलब्ध नाहीत. त्यामुळे अंतर्गत भागातील गटारांची स्वच्छता होण्यास विलंब लागणार आहे. बेतोडा येथील सरकारी शाळा इमारतीचे दुरुस्तीकामही मजुराअभावी अडून पडले आहे.
बोरी आणि बेतोडा तसेच शिरोडा पंचवाडी गावात अनेक नागरिकांनी आपली नवीन घरे बांधण्याचे काम हाती घेतले होते. काहींनी घराना स्लॅब घालण्याचे काम हाती घेतले होते. परंतु या घराचे आणि इमारतीचे काम करणारे मजूरच नसल्याने ही कामे अर्धवट राहिली आहेत. शेती बागायतीची सर्वच कामे ही परराज्यातील मजूर करतात त्यामुळे नागरिकांसमोर मोठाच मजुरांचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
परराज्यातील मजूरांना शिरोडा ग्रामपंचायतीने धान्य आणि कडधान्य दिले. आमदार सुभाष शिरोडकरांनी फोंडा उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिरोडा मतदारसंघात राहणाऱ्या सर्व मजुरांना सुमारे दीड हजारपेक्षा जास्त किमतीचे अन्नधान्य वितरित केले. परंतु हाताना कामच नसल्याने या मजुरांनी आपल्या गावी जाणे पसंत केल्याने लोकांची सर्वच कामे खोळंबून राहिली आहेत.
..........................................................
परराज्यातील मजूरांकरवी गावात लहानमोठी कामे केली जातात.परंतु मजूर टाळेबंदीच्या काळात आपल्या गावाला गेल्याने आता लहानमोठी कामे अडून पडली आहेत. घरशाकारणी, स्वच्छता आदी कामे करणारे मजूर नसल्याने मोठीच गैरसोय झालेली आहे. 
प्रकाश नाईक बोरी, 
...................
शिरोडा बोरी, पंचवाडी लोटली राशोल आदी भागातील शेतीची बहुतांश कामे ही परराज्यातील मजुरांमार्फत करून घेतली जायची परंतु टाळेबंदीच्या काळात मजूरामार्फत करून घेतली जायची. परंतु टाळेबंदीच्या काळात मजूर आपल्या गावाला गेल्याने शेतकरी वर्गाची कुचंबणा झालेली आहे. गावातील लोक बेकार बसून गप्पा करतील परंतु कामे करायला कोणी शेतीत उतरत नसल्याने मोठा बाका प्रश्‍न पडला आहे.
नारायण नाईक, शिरोडा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com