Ponda Bus Stand: फोंड्यातील कदंब बसस्थानकाचे काम अद्याप रखडलेलेच, सर्व भार जुन्या बस स्टॅन्डवर

प्रवाशांची प्रचंड गैरसोय ः नूतनीकरणाचे काम संथगतीने, पावसाळ्यापूर्वी कार्यान्वित होणे आवश्‍यक
Ponda Bus Stand
Ponda Bus StandDainik Gomantak

Ponda Bus Stand फोंडा येथील कदंब बसस्थानकाचे गेले वर्षभर झाले नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे.

पावसाळ्यापूर्वी बसस्थानक पूर्णपणे सुरू होईल, अशी आशा वाटत होती. पण नूतनीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने पुढील वर्षभर तरी हे काम पूर्णत्वास जाईल, असे वाटत नाही.

फोंड्यातून राज्यभरासह आंतरराज्य बसेसची सुविधा आहे. १९९२ साली तत्कालीन मुख्यमंत्री रवी नाईक यांनी या बसस्थानकाचे उद्घाटन केले होते. स्थानक अस्तित्वात येण्यापूर्वी दादा वैद्य चौकातील इंदिरा मार्केटजवळील बस स्थानकावरून बसेस सुटत होत्या.

त्यामुळे नवीन स्थानक सुरू झाल्यावर जुने बस स्टॅन्ड बंद होईल, अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली. नवीन स्थानक सुरू होऊनही बहुतांश बसेस जुन्या बस स्टॅन्डवर थांबा घेत असत. त्यामुळे इंदिरा मार्केट भागात वाहतूक कोंडी जाणवायची. सध्या तर कदंब बसस्थानक बंदच आहे. त्यामुळे सर्व भार जुने बस स्टॅन्डवरच आला आहे.

Ponda Bus Stand
Goa Crime News: पाटबंधारे खात्यातील कनिष्ठ अभियंत्याची आत्महत्या

आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या काही बसेस कदंब बस स्थानकावर थांबत असल्या तरी तिथे शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात थांबावे लागते. आता पावसाळ्यात तर प्रवाशांची हालत अधिकच बिकट होणार आहे. वास्तविक हे काम सहा महिन्यांत पूर्ण होणार, असे सांगितले गेले होते.

पण वर्ष झाले तरी ‘धीरे धीरे चल’ या पद्धतीने हे काम सुरू आहे. फोंड्याच्या या महत्त्वाच्या स्थानकाची आजपर्यंत उपेक्षाच होत आली आहे. नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर संपवून हे बस स्थानक परत एकदा पूर्णपणे प्रवाशांच्या सेवेस उपलब्ध करावा, या प्रवाशांच्या मागणीची संबंधित अधिकारी, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दखल घ्यायला हवी, अशी अपेक्षा आहे.

Ponda Bus Stand
Sexual Abuse in Flight: गोवा जाणाऱ्या प्रवाशाकडून विमानात एअर होस्टेसचा विनयभंग, कोची - बंगळुरू फ्लाईटमधील घटना

बगल रस्ते होऊनही वाहतूक शहरातूनच

रवी नाईक राज्याचे उपमुख्यमंत्री असताना 2002 साली फोंड्यातील बगल रस्ते कार्यान्वित झाले. बसेस शहराबाहेरून गेल्यावर शहरात लोकल बस सेवा सुरू होण्याच्या दृष्टीनेही विचार विनिमय सुरू होता. पण 21 वर्षे झाली तरी ही वाहतूक शहरातूनच जात आहे.

आधीच फोफावलेल्या शहरातील वाहतुकीला अधिकच त्रास होताना दिसत आहे. आता कदंब बस स्थानकाचे नूतनीकरण झाल्यानंतर तरी बस वाहतूक बगल रस्त्यातून न्यावी, अशीही एक मागणी होत आहे.

प्रवाशांची ससेहोलपट

कदंब बसस्थानक कार्यरत नसले तरी अनेक प्रवाशांना याची जाणीव नाही. त्यामुळे ते बस पकडायला कदंब बसस्थानकवर जातात.

आणि तिथे परिस्थितीची जाणीव झाल्यावर त्यांना जुन्या बसस्थानकावर यावे लागते. यातून या प्रवाशांचा वेळ वाया जाऊन खास करून महिला व लहान मुलांची चांगलीच ससेहोलपट होते.

Ponda Bus Stand
Goa Crime: कुर्टी - खांडेपार बगलरस्त्यावर भरतेय तळीरामांची जत्रा !

उद्‍घाटन ‘फेम’ बसस्थानक

फोंड्याचा हा कदंब बस स्थानक उद्‍घाटन फेम बसस्थानक म्हणून ओळखला जातो. रवी नाईक मुख्यमंत्री असताना 1992 साली या बस स्थानकाचे पहिले उद्‍घाटन झाले होते.

त्यानंतरही या बस स्थानकाची अनेक वेळा उद्‍घाटने करण्यात आली. त्यामुळे उद्‍घाटनाबाबत तरी या स्थानकाने राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे, एवढे निश्चित.

तारीख जाहीर करणे गरजेचे

कदंब बसस्थानक गेले वर्षभर झाले पूर्ण ताकदीनिशी कार्यरत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत .

याकरिता हे नूतनीकरणाचे काम कधी पूर्ण होणार, याची तारीख सरकारने जाहीर करायला हवी. अजून तरी या बस स्थानकाबाबत सरकारी पातळीवर ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी स्थिती दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com